खामगाव येथे एक महिन्याच्या प्रशिक्षणाचा उत्साहात समारोप

 

ब्युटी पार्लर प्रशिक्षणातून महिलांना स्वावलंबनाची दिशा;

खामगाव येथे एक महिन्याच्या प्रशिक्षणाचा उत्साहात समारोप

 

बुलढाणा, दि. 03 (जिमाका):  महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने लक्षित घटकातील महिलांसाठी खामगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या एक महिन्याच्या ब्युटी पार्लर प्रशिक्षण बॅचचा समारोप दि. 25 ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

 

या समारोप कार्यक्रमास अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीणजी कोळेश्वर, बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमानी, एमसीईडचे प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता, सपना मखेजा तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना ब्युटी पार्लर व्यवसायाशी संबंधित विविध व्यावसायिक व कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात आले. एक महिन्याचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी महिलांनी आता स्वतःचा ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगार मिळविण्यासोबतच इतरांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

 

यावेळी अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीणजी कोळेश्वर यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना मार्गदर्शन करताना, प्रशिक्षणातून मिळालेल्या कौशल्याचा उपयोग केवळ नोकरीच्या संधी शोधण्यासाठी न करता स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी करावा, असे आवाहन केले. ब्युटी पार्लर व्यवसायामध्ये मोठ्या संधी असून योग्य नियोजन, गुणवत्तापूर्ण सेवा आणि ग्राहकांशी चांगला संवाद यांच्या माध्यमातून महिला यशस्वी व्यवसाय उभारू शकतात, असे त्यांनी सांगितले.

 

बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमानी यांनी अमृतच्या विविध उपक्रमांची तसेच महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास, उद्योजकता विकास, प्रशिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती दिली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अमृतच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता यांनी महिलांना उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना, अनुदान व सबसिडी योजनांची माहिती देत प्रशिक्षणानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी उपलब्ध आर्थिक सहाय्याचा योग्य प्रकारे लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रशिक्षणार्थी महिलांनी प्रशिक्षणादरम्यान आलेले अनुभव व्यक्त केले. या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढण्यासोबतच नवीन कौशल्य आत्मसात झाले असून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

 

या प्रशिक्षणाच्या यशस्वी समारोपामुळे खामगाव परिसरातील महिलांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वावलंबन व स्वयंरोजगाराच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकता आले आहे. महिलांनी प्रशिक्षणाचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमानी ९११२२२७६३७, ८३०८९९८९२२ यांच्याशी किंवा अमृत जिल्हा कार्यालय, फ्लॅट क्र. ३०५, तिसरा मजला, बुलढाणा प्राइड बिल्डिंग, तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा ४४३००१ येथे संपर्क साधावा.

00000

Comments