Wednesday 6 October 2021

DIO BULDANA NEWS 6.10.2021

 


अनुसूचित जाती कल्याण समितीने पोलीस, एसटी व उत्पादन शुल्क विभागांचा घेतला आढावा

  • विभागातील अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आस्थापना बाबींवर चर्चा
  • अनुसूचित जाती कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : महाराष्ट्र विधीमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समितीने आज 6 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत विविध विभागांचा आढावा घेतला. यामध्ये उद्योग व एमआयडीसी, उत्पादन शुल्क, पोलीस, परिवहन विभागांचा समावेश आहे. यावेळी व्यासपीठावर विधानसभा सदस्य तथा समितीप्रमुख कु. प्रणितीताई शिंदे, विधानसभा सदस्य तथा समिती सदस्य सर्वश्री यशवंत माने, लहू कानडे, लखन मलिक, सुनील कांबळे, नामदेव ससाणे, अरूण लाड, राजेश राठोड आदी उपस्थित होते. तसेच विधानमंडळ सचिवालयातील अवर सचिव प्र. श्री. खोंदले, कक्ष अधिकारी विनोद राठोड, सहा. कक्ष अधिकारी दत्तात्रय बेंगलवार आदीही उपस्थित होते. सभागृहात जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते व विभागप्रमुख उपस्थित होते.

   समितीने सर्वप्रथम पोलीस अधिक्षक कार्यालयातंर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची बढती, पदोन्नती, अनुशेष, रिक्त पदे, बिंदुनामावली आदींचा आढावा घेतला. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गाच्या व्यक्तींवर होणाऱ्या अन्याय विरोधात ॲट्रासिटी कायद्याची अंमलबजावणी, या कायद्यान्वये पिडीतांना देण्यात येणारी आर्थिक मदत, दक्षता समित्यांच्या बैठका, दोषारोपपत्र, गुन्हा सिद्धी प्रमाण आदींचाही आढावा घेतला. तसेच संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुचना दिल्या. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागातील अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती, अनुशेष, पदोन्नतीचा आढावा घेतला. समितीने राज्य परिवहन महामंडळातील अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती, अनुशेष, पदोन्नतीचा आढावा घेतला.  उद्योग व एमआयडीसी विभागातंर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती – जमाती उद्योग प्रोत्साहन योजनेचा आढावा घेत  योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना देण्याच्या सूचना दिल्या.    बैठकीला सर्व विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                            ************* 

                  7 व 14 ऑक्टोंबर रोजी कर्ज मेळाव्यांचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण देशात 7 ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोंबर 2021 पर्यंत क्रेडिट आऊटरिच अभियान राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये दिनांक 7 ऑक्टोंबर 2021 रोजी बुलडाणा येथे नगर पालिका हॉलमध्ये दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली भव्य कर्ज मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. यामध्ये बुलडाणा येथील सर्व सरकारी व खाजगी बँकेद्वारे विविध सरकारी योजनांमध्ये कर्ज वाटप केले जाणार आहे.  तसेच दिनांक 14 ऑक्टोंबर 2021 रोजी  संत रुपलाल महाराज मंगल कार्यालय, जळगाव जामोद येथे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली कर्ज मेळावा  दुपारी 12 वाजता पार पडणार आहे. या ठिकाणी सुद्धा सर्व शासकीय व खाजगी बँक प्रतिनिधी उपस्थित राहून कर्ज प्रकरणे निकाली काढणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कर्ज मेळाव्यांचा लाभ घ्यावा,  असे आवाहन अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक श्री. हेडाऊ यांनी केले आहे.

********

मध केंद्र योजनेतंर्गत पात्र व्यक्ती व संस्थाकडून अर्ज आमंत्रित

  • जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावे

बुलडाणा,(जिमाका) दि. 6 : राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. या योजनेतंर्गत पात्र व्यक्ती व संस्थांकडून प्रशिक्षणासाठी व उद्योगासाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. योजनेतंर्गत वैयक्तिक मधपाळांसाठी प्रशिक्षण जिल्ह्यामध्ये कुठेही मिळणार आहे. पात्र अर्जदारांना 10 मधपेट्या देण्यात येणार आहे. त्‍यासाठी अर्जदार हा साक्षर असावा, तसेच त्याच्याकडे स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. वय 18 वर्षपेक्षा जास्त असावे, प्रशिक्षणापूर्वी 50 टक्के स्वगुंतवणूक मंडळाकडे करावी लागेल. प्रगतशील मधपाळांसाठी 20 दिवस प्रशिक्षण महाबळेश्वर जि. सातारा येथे मिळणार आहे. तसेच 50 मधपेट्या देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जदार किमान 10 वी उत्तीर्ण असावा व वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे. अर्जदाराच्या नावे किंवा कुटूंबातील कुठल्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थीकडे मधमाशा पालन व प्रजनन, मधोत्पादन याबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. प्रशिक्षणापूर्वी 50 टक्के स्वगुंतवणूक भरणे आवश्यक आहे.

   त्याचप्रमाणे केंद्र चालक संस्थेसाठी 20 दिवस प्रशिक्षण महाबळेश्वर जि. सातारा येथे मिळणार आहे. तसेच 50 मधपेट्या मिळणार आहे. या योजनेच्या लाभासाठी संस्था ही नोंदणीकृत असावी, संस्थेचे नावे मालकीची किंवा 10 वर्षासाठी भाडे तत्वावर घेतलेली किमान एक एकर शेती किंवा 1000 चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन, प्रजनन व मधोत्पादनाकरीता लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी. प्रशिक्षणापूर्वी 50 टक्के स्वगुंतवणूक भरणे आवश्यक आहे मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक ही योजनेची वैशिष्टये आहेत. लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध उद्योग व्यवसाय सुरू करणे बाबत मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य असणार आहे. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील. अर्जासोबत आधारकार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, शेतीचा 7/12 व नमुना 8 – अ, दोन छायाचित्रे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, अरूणोदय बिल्डींग, सुवर्ण नगर, बुलडाणा या कार्यालयाशी तसेच 07262-22428667, 8329908470 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळविले आहे.

***

सार्वजनिक नवरात्रौत्सव उत्सवासाठी मार्गदर्शक सुचना जारी

बुलडाणा,(जिमाका) दि. 6 : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. नवरात्रौत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने अपर जिल्हादंडाधिकारी यांनी नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.  

 गेल्या वर्षांप्रमाणे यंदाही करोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा, दांडियाच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली असून मूर्तीची उंची आणि मंडपाच्या आकारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार तर घरगुती देवीची मूर्ती दोन फुटांची असणे बंधनकारक करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

   राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार नवरात्रोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. निश्चित केलेल्या आकारमानानुसारच मंडप परवानगी दिली जाणार आहे. पर्यावरणाचा विचार करता मूर्ती शाडूची असावी, सजावट पर्यावरणपूरक असावी. नवरात्रोत्सवाकरीता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची व्यवस्था करावी. तसेच आरोग्य विषयक सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्षित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रमे/ शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक आदीद्वारे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. देवीच्या मंडपांमध्ये आरती, भजन, किर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदुषणातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे. मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यात सक्त मनाई आहे. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येवू नये. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. स्थानिक प्रशासनाच्यावतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहन कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. रावण दहनाकरीता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नये. त्यांना समाज माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण बघण्याची व्यवस्था करावी, असेही आदेशात नमूद आहे.

--

No comments:

Post a Comment