Thursday 14 October 2021

DIO BULDANA NEWS 14.10.2021

 जिल्हा परिषदेकडील कृषि योजनांसाठी 1083 लाभार्थ्यांची निवड

  • लाभार्थ्यांनी कागदपत्रे ई सेवा केंद्रावर सादर करावी
  • 25 ऑक्टोंबर अंतिम मुदत

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अनुक्रमे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांसाठी शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून उत्पन्न वाढविण्याकरीता राबविण्यात येतात. या योजनांमध्ये लाभार्थी अनुक्रमे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे किमान 040 हे व कमाल 6 हेक्टर पर्यंत जमीन असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 1,50,000 /- रूपये पेक्षा अधिक नसावे. प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फुटपेक्षा जास्त अंतरावर असावी. योजनेतंर्गत नविन विहीर 2 लक्ष 50 हजार रूपये, जुनी विहीर दुरूस्ती 50 हजार रूपये, विद्युत जोडणी 10 हजार, विद्युत पंप संच 20 हजार, सूक्ष्म सिंचन ठिबक 35 टक्के जस्तीत जास्त 50 हजार, तुषार सिंचन संच 35 टक्के जास्तीत जास्त 25 हजार व शेततळे अस्तरीकरण 1 लक्ष रूपये अनुदान देय आहे.

  सदर दोन्ही योजना सन 2020-21 पासून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन सुरू आहे. लाभार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असून हे संकेतस्थळ कायमस्वरूपी असणार आहे. या योजनेतंर्गत 2020-21 करीता अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची ऑनलाईन सोडत झालेली आहे. आतापर्यंत 578 लाभार्थ्यांची अद्यापही आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केलेली नाहीत. याकरीता निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांनी    7/12, नमुना 8 अ, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र,  चालु आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, आधार संलग्न बँकेचे पासबुक, आधार कार्ड कागदपत्रे त्वरित ऑनलाईन  अपलोड करण्यात यावी. तरी निवड झालेल्या लाभार्थ्यांनी  आवश्यक असणारी कागदपत्रे 25 ऑक्टोंबर 2021 पर्यंत अपलोड करावीत.

  तसेच सन 2021-22 करीता 2 ऑक्टोंबर रोजी ऑनलाईन सोडत करण्यात आली. यामध्ये निवड झालेल्या 1083 लाभार्थ्यांनीसुद्धा वरील कागदपत्रे 25 ऑक्टोंबर पर्यंत अपलोड करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकारी अनिसा महाबळे यांनी केले आहे.

*******                                          

                          



 डिजीटल इंडिया अंतर्गत ‘पेमेंट गेट वे’ कार्यशाळा उत्साहात

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आज 14 ऑक्टोंबर रोजी डिजीटल इंडिया अंतर्गत पेमेंट गेट वे या विषयावर आयोतिज कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिक्षक शामला खोत, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सुनील खुळे मार्गदर्शक म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. 

    कार्यशाळेमध्ये अधिक्षक सौ खोत यांनी डिजीटल इंडिया अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच या मोहिमेचा उहापोह त्यांनी आपल्या संबोधनात केला. याप्रसंगी जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी श्री. खुळे यांनी डिजीटल पेमेंट गेट वे मेथड व  ऑनलाईन पेमेंट करताना घ्यावयाची काळजी आदी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी शासनाच्या विविध विभागांत पेमेंट गेट वे च्या वापराबाबतही संबोधीत केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी व तांत्रिकतेसाठी निखील चोपडे, विजय करवंदे व मनोज धंदर आदींनी प्रयत्न केले.

                                                                        ***********

                         कामगार बांधवांच्या कुटूंबियांना कौशल्य विकासाची संधी

  • कामगार कल्याण मंडळातर्फे महाकल्याण कौशल्य विकास कार्यक्रम

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे युनीसेफच्या सहकार्याने कामगार व कामगारांच्या कुटूंबियांसाठी महाकल्याण कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. वर्षभरात राज्यातील 40 हजार कामगार व कामगारांच्या कुटूंबियांना या कार्यक्रमातंर्गत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची घोषणा 1 जुलै रोजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू, विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या वर्धापन दिनी करण्यात आली.

  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत कामगार व इतर बांधकाम कामगार यांना या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी मंडळाच्या public.mlwb.in या संकेतस्थळावर उपलब्ध विहीत नमुन्यातील गुगल फॉर्म भरणे गरजेचे आहे. प्रशिक्षणार्थीसाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 8 वी उत्तीर्ण ते पदवीधर आहे. सदर प्रशिक्षणवर्ग ऑनलाईन तसेच ऑफलाईन असून अभ्यासक्रमाचा कालावधी 15 दिवस ते 1 वर्ष आहे. यामध्ये एसी रेफ्रीजरेशन, मेकॅनिक, नर्सिंग, सायबर सिक्युरिटी, असिस्टंट ड्युटी ऑटोमोबाईल विक्री, बॅकिंग आणि इन्शुरन्स कस्टमर, रिलेशन अँड सेल्स डेव्हलपर, फ्रंट ऑफिस असिस्टंट, आयटीआय कोर्सेस हॉस्पीटॅलीटी असिस्टंट, इलेक्ट्रीशियन, फॅशन डिझायनिंग अँड ड्रेस मेकींग, जनरल ड्युटी असिस्टंट आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

   प्रवेशासाठी महामंडळाने कामगारांना दिलेले लेबर आयडेंटीटी नंबर किंवा महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळांचा नोंदणी क्रमांक, आधार कार्ड, पॅनकार्ड, रेशन कार्ड, वीज बिल, गुणपत्रक, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि नजिकच्या कामगार कल्याण केंद्राची वार्षिक वर्गणी भरल्याची पावती आदी कागदपत्र आवश्यक असणार आहे. नामांकित संस्थांकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण राज्यस्तरावर राबविली जात आहे. तरी कामगार व कामगार कुटूंबियांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार कल्याण केंद्राचे संचालक नंदकिशोर खत्री यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                                        *************

               पुर नियंत्रण कामासाठी कार्यकारी अभियंत्यांना तालुके वाटप

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : पुर नियंत्रण कामासाठी विभगानुसार कार्यकारी अभियंत्यांना तालुक्यांचे वाटप करण्यात आले आहे. पुर नियंत्रण कामासाठी संबधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची माहिती लोकप्रतिनिधी व नियोजन समितीचे सदस्यांना असणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या 9 ऑक्टोंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये निर्देशही देण्यात आले आहे. त्यानुसार बुलडाणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना मोताळा व मलकापूर तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

   लघु पाटबंधारे विभाग बुलडाणाचे कार्यकारी अभियंता यांना बुलडाणा व चिखली तालुक्यांतील कामे पूर्ण करण्याची जबाबदारी  देण्यात आली आहे. खडकपूर्णा प्रकल्प विभाग दे. राजाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे दे. राजा व सिं. राजा तालुके असून जिगांव उपसा सिंचन विभाग खामगांवचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे खामगांव व जळगांव जामोद तालुके आहे. तसेच जिगांव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग शेगांव येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे शेगांव, नांदुरा व संग्रामपूर तालुक्यांची जबाबदारी आहे. जिगांव प्रकल्प पुनर्वसन विभाग खामगांव चे कार्यकारी अभियंता यांच्याकडे मेहकर व लोणार तालुके देण्यात आले आहे, असे कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        ************

कोरोना अलर्ट : प्राप्त 566 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 02 पॉझिटिव्ह

•       01 रुग्णाला मिळाली सुट्टी                                                                          बुलडाणा, (जिमाका) दि. 14 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 568 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 566 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 02 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 2 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 151 तर रॅपिड टेस्टमधील 415 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 566 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  बुलडाणा तालुका : येळगाव 1, मलकापूर शहर : 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 02 रूग्ण आढळले आहे.  तसेच वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे उपचाराअंती 01 रुग्णाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.                                                                             

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 725650 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86907 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86907 आहे.  आज रोजी 449 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 725650 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87595 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86907 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 14 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment