Friday 29 October 2021

DIO BULDANA NEWS 29.10.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 313 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह  

·         1 रूग्णाला मिळाली सुट्टी     

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 314 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 313 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड अँटीजेन चाचणीतील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 70 तर रॅपिड टेस्टमधील 243 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 313 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  चिखली तालुका : गोद्री 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे. तसेच उपचाराअंती वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार 1 रूग्णाला सुट्टी देण्यात आली आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 730677 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86931 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86931 आहे.  आज रोजी 84 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 730677 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87610 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86931 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 05 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                            *********

                   तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन करावे

·         कृषी विभागाद्वारे उपाययोजना जाहीर

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे सध्याही जमीनीत ओल आहे. त्यामुळे तूरीचे पीक चांगले आहे. काही ठिकाणी फुलोऱ्यावर तर काही ठिकाणी शेंगा धरलेल्या आहेत. तूर पिकापासून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र मागील दोन-तीन दिवसापासून असणारे ढगाळ वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे. अशा वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासून नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूनी आपल्या पिकाची पाहणी करुन वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करणे आवश्यक आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांमध्ये खालील प्रकारच्या अळ्यांचा समावेश होतो.

  शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्पा) या कीडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते, अंड्यातून निघालेल्या अळ्या तूरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पुर्ण वाढ झालेली अळी 30 ते 40 मि.मि. लांब पोपटी रंगाची असून पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळ्या शेंगांना छिद्र करुन आतील दाणे पोखरुन खातात.

 पिसारी पतंग या पतंगाची अळी 12.5 मि.मि. लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते. व बाहेर राहून दाने पोखरते. शेंगे माशी- या पतंगाची अळी बारीक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाने अर्थवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते.

   या तिन्ही किडी कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता जवळ जवळ सारखेच उपाय योजावे लागतात. पहिली फवारणी न केल्यास तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पहिली फवारणी निंबोळी अर्क 5 टक्के किंवा ॲझाडिरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली किंवा अझाडीरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली किंवा एच.एन.पी.व्ही.एच (1 x 100 पिओबी / मिली) 500 एल. ई / हे. किंवा बॅसिलस थुरींजीएंसिस 15 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. इमामेक्टिन बेंझोएट 5 टक्के 3 एसजी ग्रॅम, लॅमडा सायहॅलोमेथ्रीन 5 टक्के प्रवाही 10 मिली किंवा क्लोरॅट्रॅनिलीप्रोल 18.5 टक्के एस. पी प्रवाही 2.5 मिली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील त्या गोळा करुन नष्ट कराव्यात. शेंगा पोखणाऱ्या अळ्यांसाठी वेळीच नियंत्रणाचे उपाय योजना न केल्यास तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवू शकते,  असे उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी कळविले आहे.

                                                            **********

        केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचा दौरा

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे 31 ऑक्टोंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथून खाजगी हेलीकॉप्टरने चिखलीकडे प्रयाण, दु. 1 वा चिखली येथे श्री. अंबिका अर्बन को. ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी हेलीपॅड येथे आगमन व डॉ. आशुतोष गुप्ता यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण, दु 2 वा रानवारा मंगल कार्यालय, गुप्ता गार्डन, जाफ्राबाद रोड चिखली येथे दि. चिखली अर्बन को. ऑपरेटीव्ह बँक लि. चिखली द्वारे आयोजित उद्योजकता प्रोत्साहन व प्रशिक्षण शिबिरास उपस्थिती, दु. 3.30 वा रानवारा मंगल कार्यालय येथून मोटारीने श्री. अंबिका अर्बन को. ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी हेलीपॅडकडे प्रयाण, दु. 3.45 वा श्री. अंबिका अर्बन को. ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी हेलीपॅड येथे आगमन व खाजगी हेलीकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करतील.

                                                                                    **********   

मका, ज्वारी व बाजरीच्या शासकीय खेदीसाठी नाव नोंदणी करावी

• 31 ऑक्टोंबर 2021 पर्यंत मुदत, जिल्हा पणन अधिकारी यांचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : शासनाच्या आदेशान्वये पणन हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाची आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत हमी दराने मका, ज्वारी, बाजरी या शेतमालाची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी जिल्ह्यात 14 खरेदी केंद्रांना मान्यताही देण्यात दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात मका, ज्वारी व बाजरी खरेदीसाठी नाव नोंदण्याकरीता 31 ऑक्टोंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. हमी दराने मका प्रती क्विंटल 1870, ज्वारी प्रती क्विंटल 2738 व बाजरी शेतमालासाठी 2250 रुपये हमी दर आहे.

  जिल्ह्यात तालुका खरेदी विक्री संघ बुलडाणा, दे. राजा, खामगांव, लोणार, मेहकर, संग्रामपूर, मलकापूर, जळगांव जामोद व शेगांव, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी अंजनी खु केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, मा. जिजाऊ कृषि विकास शेतकरी कंपनी नारायणखेड केंद्र सिं.राजा, नांदुरा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी नांदुरा केंद्र वडी ता. नांदुरा या खरेदी केंद्रांना मान्यता मिळाली आहे. या ठिकाणी ऑनलाईन शेतकरी नाव नोंदणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी आधार कार्ड, सन 2021-22 चा पीक पेरा, बँक पासबुक झेरॉक्स, जनधन योजनेचे बँक खाते असल्यास देण्यात येवू नये, चालु वर्षाच सात बारा अशा संपूर्ण कागदपत्रांसह संबंधित तालुक्यातील संस्थेशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस शिंगणे यांनी केले आहे.

                                                            *******


तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी

-      अप्पर जिल्हाधिकारी

·         एचआयव्ही बाधीतांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : तंबाखूचे सेवन अलिकडे तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तरूणांना तंबाखूच्या सेवनापासून परावृत्त करणे हे मोठे आव्हान आहे. तंबाखू सेवनामुळे मुख कर्करोगाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे तंबाखू सेवनाचे दुष्परीणामांबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, तंबाखूमुक्त शाळा, कोटपा कायद्याची अंमलबजावणी प्रभावीरित्या करावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी दिल्या आहेत.  तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व एड्स नियंत्रण कार्यक्रम आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, एड्स नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक श्री. टाले, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. लता बाहेकर आदी उपस्थित होते. एचआयव्ही बाधीतांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याच्या सूचना करीत अप्पर जिल्हाधिकारी म्हणाले, याबाबत काही अडचणी असल्यास तालुका स्तरीय यंत्रणांशी समन्वय साधून सोडवाव्यात.

   संजय गांधी निराधार योजना लाभ देण्यासाठी उत्पन्न दाखल्याची अट, ऑनलाईन दुर्धर आजार प्रमाणपत्र आदींच्या अडचणी बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संबंधित तहसिलदार यांच्याशी संपर्क करून अडचण सोडवावी. सेक्स वर्कर यांचे नियमित एचआयव्ही तपासणी करावी. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे लाईनवर गावांमध्ये लिंक वर्करच्या तपासण्या कराव्यात. जेणेकरून एखादा एचआयव्ही बाधीत तपासणी न करता रोगाचा वाहक बनू नये.मातृ वंदन योजनेच्या लाभार्थ्यांसाइी आधार बंधनकारक आहे. आधार नसल्यास आधार केंद्र चालकांशी संपर्क साधून आधार कार्ड बनवून घ्यावे. बैठकीत श्री. टाले, डॉ. लता बाहेकर यांनी सादरीकरण केले. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                            ***********

        


सायकलिंग खेळाच्या प्रवेशाकरीता
 क्रीडा नैपुण्य चाचणी उत्साहात

बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जा खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवीण्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करणे आवश्यक आहे.  क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने (खेलो इंडीया एक्सलन्स सेंटर) राज्य निपुणता केंद्र मंजुर करण्यात आलेले आहेत.  यानुसार ॲथलेटीक्स, शुटींग व सायकलींग या तीन खेळांचे निपुणता केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे.

सायकलींग या खेळाच्या प्रवेशाकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन 29 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे करण्यात आले होते.  याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.प्रमोद जाधव मेहकर, राजेश डिडोळकर, अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक यांचे हस्ते मैदानाचे पुजन करुन उद्घाटन करण्यात आले.

निवड प्रक्रीयेकरीता जिल्ह्यातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मोठ्या संख्येने मुले व मुलींनी सहभाग घेतला होता.  या निवड चाचणी प्रक्रीयेमध्ये खेळाडू मुलांकरीता 1600 मि. धावणे, उभी लांब उडी, उभी उंच उडी, खेळाडूची उंची  या चार बाबींचा तर मुलींकरीता 800 मी. धावणे, उभी लांब उडी, उभी उंच उडी, खेळाडूची उंची या चार बाबींचा समावेश होता.  याप्रसंगी सायकलींग या खेळाची राष्ट्रीय खेळाडू कु.गुंजन जतकर यांचे हस्ते क्लॅपर देऊन मुलींच्या 800 मी. चाचणीला सुरुवात करण्यात आली.  संचलन अनिल इंगळे यांनी केले.  याप्रसंगी डी.डी.लोढे, वसंत राठोड, सौ.मंजुषा जाधव, राजु पडघान, मोहम्मद सुफीयान, सारा पवार, दिक्षा हिवाळे, किरण तायडे, दिपक जाधव, वैभव काळवाघे, समाधान टेकाळे, सौ. वैशाली हिंगे, हर्षल काळवाघे, विराज तोटे, संकेत इंगळे, गजानन नागवे, यश बट्टू आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी बी.आर.जाधव क्रीडा अधिकारी, आर.आर.धारपवार, महेश खर्डेकर राज्य क्रीडा मार्गदर्शक, विजय बोदडे, सौ.मनिषा ढोके, सुरेशचंद्र मोरे व्यवस्थापक, जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे, भिमराव पवार यांनी प्रयत्न केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                        ****

No comments:

Post a Comment