Monday 11 October 2021

DIO BULDANA NEWS 11.10.2021

 अल्पसंख्याक उमेदवारांची पोलीस शिपाई भरती पूर्वपरीक्षा प्रशिक्षण निवड प्रक्रिया स्थगित

बुलडाणा, (जिमाका) दि‍. 11 सन 2021-22 मध्ये  अल्पसंख्याक समाजातील  उमेदवारांकरीता पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातंर्गत पोलीस कवायत मैदान, बुलडाणा येथे गुरूवार, 21 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजेपासून प्रशिक्षणासाठी अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांची निवड करण्यात येणार होती. याबाबत प्रसिद्धीही देण्यात आली होती. मात्र प्रशासकीय कारणास्तव 21 ऑक्टोंबर रोजी नियोजित असलेली निवड प्रक्रिया तुर्त स्थगित करण्यात येत आहे. त्यानुसार अल्पसंख्याक समाजातील तरूणांकरीता पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत होणारी निवड प्रक्रिया पुढील नियोजित दिनांकापर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे. याबाबत पुढील नियोजित दिनांक व वेळ प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात येणार आहे. तरी यासंदर्भात अल्पसंख्याक समाजातील तरूणांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केले आहे.

                                                                        ********

बुलडाणा आयटीआय येथे रिक्त पदांसाठी 14 ऑक्टोंबर रोजी प्रवेश फेरीची आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि‍. 11 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलडाणा येथे 4 थ्या फेरीअखेर एकूण 13 व्यवसायात 133 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी संस्था स्तरीय प्रवेश फेरीचे 14 ऑक्टोंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणी केलेले व अद्याप कोणत्याही व्यवसायात प्रवेश न मिळालेल्या सर्व पात्र उमेदवारांना गुणवत्ता यादीनुसार प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थास्तरीय प्रवेश फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व नोंदणीकृत पात्र उमेदवारांनी आपल्या खात्यात लॉग ईन करून 12 ऑक्टोंबर पर्यंत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलडाणा ची निवड करावी. तसेच 14 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वाजता संस्थेत उपस्थित रहावे व आपला प्रवेश गुणवत्ता यादीनुसार निश्चित करावा. संस्थास्तरीय समुपदेशन फेरीकरीता नोंदणी न केल्यास प्रवेशा करीता आपला विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्राचार्य प्रकाश खुळे व गटनिदेशक बी. जी राठोड यांनी केले आहे.

*****


कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करावे

  • कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 11 : गुलाबी बोंडअळीचे शास्त्रीय नाव पेक्टीनोफोरा गॉसीपीएल्ला (सान्डर्स) ती गण लेपिडोप्टेरा आणि कुळ जेलेचिडी मध्ये वर्गीकृत आहे. हया किडीचे मुळ उगमस्थान भारत, पाकीस्तान आहे. मादी पतंग 100 ते 200 अंडी एकल किंवा पुंजक्यांनी घालते. मादी अंडी पात्या, फुलावर, नविन बोंडावर, देठावर आणि कोवळया पानांच्या खालच्या बाजुस घालते. अंडीचा आकार 0.5 मि मि लांब व 0.25 मिमि रुंद असतो. अंडी लांबट व चपटी असुन रंगाने मोत्यासारखी चक चकीत असतात. पंधरा दिवसाचे बोंड अंडी घालण्यासाठी पसंतीचे ठिकाण असते. अंडी उबवण्याचा काळ हा 3 ते 6 दिवसाचा असतो. पहिल्या दोन अंतरीक अळी अवस्था पांढूरक्या असतात आणि तिसऱ्या आंतरीक अवस्थेपासून गुलाबी रंगाच्या होतात.

   उष्ण भागात अळी अवस्था ही 9 ते 14 दिवसांची असते. पुर्ण वाढलेल्या अळीची लांबी 10 ते 13 मिमि असून डोके गडद रंगाचे असते. कोष साधारण 10 मि‍मि लांब बदामी रंगाचा असून अवस्था 8 ते 13 दिवसात पुर्ण केल्या जाते. जिवनक्रम 3 ते 6 आठवडयात पुर्ण होतो. पतंग 8 ते 10 मिमि तपकिरी करडया रंगाचा असून पंखावर काळे ठिपके असतात. पतंग कोषातून सकाळी किंवा संध्याकाळीच बाहेर निशाचर असतात आणि दिवसाला मातीत किंवा जमिनीच्या भेगात लपून बसतात. खाध्य वनस्पती अभावी गुलाबी बोंडअळी 6 ते 8 महिनेपर्यंत निद्रावस्थेत राहते.

    उघडलेल्या बोंडावरती डाग हे गुलाबी बोंडअळीचे प्रमुख लक्षण आहे. ही लक्षणे सुरुवातीला येणाऱ्या फुलोऱ्यावस्थेत आणि पिकांच्या वाढीच्या शेवटच्या अवस्थेत नुकसान झाल्यावर दिसून येते. कामगंध सापळयामध्ये नर पतंग अडकल्यास कामगंध सापळयाद्वारे मादी पतंगासारखा गंध सोडल्यामुळे नर पतंग आकर्षित होतात. डोम कळी फुले पुर्णपणे उमलत नाहीत ते मुरडले जातात. हिरव्या बोंडावर दिसणारे डाग हे गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव लक्षण आहे. हिरव्या बोंडावर दिसणारे निकास छिद्र अंदाजे 1.5 ते 2 मिमि व्यासाची लहान छिद्र बोंडावर असल्यास गुलाबी बोंडअळी उपस्थित असल्याचे कळते.

                              गुलाबी बोंडअळी येण्याचे कारणे

जास्त कालावधीच्या संकरीत वानाची लागवड केल्याने गुलाबी बोंडअळीला यजमान वनस्पतीचा अखंडीत खाद्य पुरवठा. असंख्य संकरीत वाण ज्यांचा फुलोरा आणि फळधारणेचा कालावधी वेगवेगळा असतो. जो गुलाबी बोंडअळीच्या एकापाठोपाठ येणाऱ्या पिढीला अखंडीत पुरवठा करतो. जिनिंग मिल आणि मार्केट यार्डमध्ये कच्चा कापसाची जास्त कालावधीसाठी साठवणूक केल्यामुळे येणाऱ्या कापसाच्या पिकांसाठी गुलाबी बोंडअळीचे स्त्रोतस्थान म्हणून काम करते. पुर्वहंगामी (एप्रिल-मे) लागवड केलेल्या कापसाचा फुलोरा जुन- जुलै मध्ये येणाऱ्या कमी तिव्रतेच्या गुलाबीबोंड अळीसाठी लाभदायक ठरतो. गुलाबी बोंडअळीचे क्राय 1 एसी 2 एबी या दोन्ही जनुकाप्रती प्रतिकार निर्माण होतो. त्यामुळे त्या बोलगार्ड 2 वरती सहजपणे जगू शकतात. संकरीत वानाची बोंडातील बियामध्ये वेगवेगळे असलेल्या विषाच्या प्रमाणामुळे लवकर प्रतिकार निर्माण होतो. ही परिस्थिती निवडक प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी अतिशय आदर्श ठरते. सुरुवातीला पेरलेले पिक आणि अगोदरचे पीक यांच्या सलग उपलब्धतेमुळे गुलाबी बोंडअळीला वर्षभर निरंतर खाद्य पुरवठा होतो. त्यामुळे त्यांच्या अनेक पिढया एक वर्षात तयार होतो. ज्यामुळे गहन निवडक दबाव तयार होऊन प्रतीकार तयार होण्यास मदत होते. गैर बीटी कपाशीची (रेफुजी) आश्रय पिक म्हणून वापर न करणे. वेळेवर आणि योग्य व्यवस्थापनाचा अभाव.

अशा करा उपायोजना : कापुस पिकाचा हंगाम डिसेंबर ते जानेवारी दरम्यान संपुष्टात आणणे. अर्धवट उमलेली प्रादुर्भावग्रस्त बोंडे व पिकांच अवशेष त्वरीत नष्ट करावेत. गुलाबी बोंडअळीने प्रादृर्भावग्रस्त कापसाची गोदामाध्ये साठवण करु नये. बीटी कापुस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जुन महिन्यात पेणी करावी. बीटी बियाण्यासोबत गैर बीटीचे बियाणे दिले असल्यास त्याची आश्रय पीक म्हणून लागवड करावी. पतंगाच्या हालचालीवर लक्ष्य ठेवण्यासाठी पेरणीच्या 45 दिवसानंतर हेक्टरी 5 याप्रमाणे कामगंध सापळे लावावेत. कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीच्य प्रादुर्भावाचे निदान करण्यासाठी पात्या व फुले लागण्याच्या अवस्थेत वेळोवळी निरीक्षण करावी. ज्या ठीकाणी उपलब्धता असेल तिथे ट्रायकोग्रामा बॅक्ट्रीया अंडयावर उपजिविका करणारा परोपजीवी मित्र किटक 60000 एकर या प्रमाण एका आठवडयाच्या अंतराने कपाशीच्या फुलोरा अवस्थेत तिनदा प्रसारण केलयास चांगले नियंत्रण मिळते. लागवडीच्या 60 दिवसानंतर निंबोळी अर्क 5 टक्के निम तेल 5 मिली प्रती लिटरची एक फवारणी करावी. मान्यता असलेल्या व शिफारस केलेल्या किटनाशकाची फवारणी (लेबल क्लेम) प्रमाणे करावी. जहाल विषारी व उच्च विषारी किटनाशकाची फवारणी टाळावी. किटनाशकाचा मिश्रणचा कोटेकोरपणे वापर टाळावा. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नोव्हेंबरपुर्वी कुठल्याही प्रकारच्या सिंथेटीक पायरेथ्रोईड, असिफेट, फिप्रोनील इत्यादी चा वापर करु नये. बोंडे लागण्याच्या अवस्थेत एक एकर क्षेत्रातून वेगवेगळया झाडांची 20 बोंडे तोडून ती फोडून पाहावी. खाली गळून पडलेली प्रादुर्भावग्रस्त पात्या, फुले व बोंडे गोळा करुन त्वरीत नष्ट करावीत. आर्थिक नुकसान पातळी (8 पतंग, कामगंध सापळा, दिन किंवा एक अळी,10 फुले किंवा एक अळी 10 हिरवी बोंडे) ओलांडल्यास दिलेल्या रासायनिक किटनाशकांचा गरजेनुसार वापर करावा. स्वच्छ व निरोगी कापसाची स्वतंत्र वेचनी करुन विक्री अथवा योग्य साठवणूक करावी. तसेच किडग्रस्त कापुस त्वरीत नष्ट करावे. सुतगिरणी, जिनिंग मिलमध्ये साठवलेल्या किडग्रस्त कापसात सुप्तावस्थेत असलेल्या अळयांपासून निघनाऱ्या पंतगांना पकडण्यासाठी त्या परिसरात कामगंध अथवा प्रकाश सापळे लावावेत व जमा झालेले पतंग नष्ट करावे. फेरोमन सापळ्याचा वापर करावा. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळ्यामध्ये 8 ते 10 पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावे. फुलावस्थेत दर आठवड्याने पिकांमध्ये मजुरांच्या साहाय्याने डोमकळ्या शोधुन नष्ट कराव्यात, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

*******

                                 

आयटीआय  प्रवेशासाठी संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि‍. 11 - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रिक्त जागा आहेत. या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी संस्था स्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. कॉऊनसिलिंग राऊंड करीता आयटीआय ची निवड ही MAHAITI  या मोबाईल ॲपवर किंवा संकेतस्थळावर करता येणार आहे. यासाठी आयटीआय येथे गरज नाही. संगणक प्रणालीद्वारे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संस्थानिहाय गुणवत्ता यादी प्रकाशित करणे व फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करणे, याबाबत उमेदवारांना त्यांच्या प्रवेश खात्यात व एसएमएस द्वारे माहिती देणे ही कार्यवाही 13 ऑक्टोंबर रोजी सायं 5 वाजता करण्यात येणार आहे. दिलेल्या वेळ व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशन फेरीकरीता बोलाविणे व प्रवेशाकरीता  उपलब्ध जागा उमेदवारांची मागणी व उमेदवारांची अर्हता या आधारावर प्रवेशाच्या  जागांचे वाटप करणे 14 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 17 ऑक्टोंबर पर्यंत सायं 5 वाजेपावेतो, सदर प्रेवश फेरीत जागा बहाल करण्यता आलेल्या उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीनंतर संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिलेल्या मुदतीत प्रेवशाची प्रत्यक्ष कार्यवाही 14 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 17 ऑक्टोंबर पर्यंत सायं 5 वाजेपावेतो करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्राचार्य प्रकाश खुळे यांनी केले आहे.

                                                                                                                ********

देऊळघाट येथे 14 ऑक्टोंबर रोजी कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि‍. 11 –तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय,बुलडाणा व प्राथमिक आरोग्य केंद्र हतेडी यांच्या संयुक्त विद्यमाने देऊळघाट येथे 14 ऑक्टोंबर रोजी कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत आज 11 ऑक्टोंबर रोजी देऊळघाट ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इम्रान खान यांच्या यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. यावेळी त्यांनी उपस्थितांना कोविड लसीकरणाचे महत्व समजावून सांगत लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच लसीकरण करण्याचे आवाहन केले. यशस्वी आयोजनासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. आ केंद्र हतेडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता रिंढे, डॉ. जवंजाळ व इतर सहकारी कार्य करीत आहे.

                                                            ************* 

No comments:

Post a Comment