Thursday 7 October 2021

DIO BULDANA NEWS 7.10.2021

 


बँकांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी

-          जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती

  • बँक कर्ज मेळावा उत्साहात

 बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : नागरिकांच्या प्रगती सोबतच देशाची प्रगती होत असते. देशाच्या प्रगतीमध्ये बँकांचा मोठी भूमिका आहे. अशावेळी बँकांनी व्यवस्थितरित्या व जबाबदारीने आपली भूमिका पार पाडावी.  व्यवसाय कर्ज, शैक्षणिक कर्ज हे विनातारण व सहाजरीत्या मंजूर करायला पाहिजे. गरजू लोकांना कर्जाच्या रूपाने मदत करुन आपली सामाजिक जबाबदारी पण पार पाड़ावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज केले आहे.

 भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशात 7  ते 15 ऑक्टोंबर पर्यंत क्रेडिट आऊटरीच अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये आज 7 ऑक्टोंबर रोजी नगर पालिका हॉल, बुलडाणा येथे दुपारी 12 वाजता  जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली व अग्रणी बैंक सेंट्रल बैंक ऑफ़ इंडियाच्या पुढाकराने कर्ज मेळावा पार पाडला. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या मेळाव्यात बुलडाणा येथील सर्व सरकारी व खाजगी बँकाद्वारे विविध सरकारी योजनांमध्ये कर्ज वाटप केले गेले.

  या कर्ज मेळाव्यामध्ये सर्व बॅकांनी मिळून 2 हजार 188 खातेदारांना 36 कोटी 77 लक्ष 57 हजार 726 रूपये एवढे कर्ज मंजूर केले आहे.  यापैकी बऱ्याच खातेदारांना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्याहस्ते कर्ज वाटप करण्यात आले. तर काही खातेदारांना वाहनाच्या चाव्या देण्यात आल्या. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेअंतर्गत नारायण पांडुरंग सोसे रा. मेहुणा राजा ता. दे. राजा यांना बँकक ऑफ़ इंडियाद्वारे धनादेश प्रदान करण्यात आला.

  याप्रसंगी व्यासपीठावर नगर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, सेंट्रल बँकेचे उप क्षेत्रीय प्रबंधक नयन सिन्हा, नाबार्डचे विक्रम पठारे, जिल्हा कृषि अधीक्षक नरेन्द्र नाइक, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक खरात, जिल्हा उद्योग केन्द्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील उपस्थित होते.

   प्रस्ताविकामध्ये सेंट्रल बैंकचे उप क्षेत्रीय प्रबंधक श्री सिन्हा म्हणाले, जिल्ह्याचा सीडी अनुपात हा 65 टक्के असून तो आपल्या विभागमध्ये सर्वाधिक आहे. पीक कर्जाचे वाटप 1000 कोटी पेक्षा जास्त झाले असून ते 80 टक्के एवढे आहे.  संचालन अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक नरेश हेड़ाऊ यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय नागरी जीवन्नोती अभियानाचे महेंद्र सौभाग्ये यांनी केले.

                                                                        *************

आरोग्य क्षेत्रात आवश्यक कुशल मनुष्यबळासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण

  • 7 अभ्यासक्रमांमध्ये मिळणार प्रशिक्षण, प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

 बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : जिल्ह्यामध्ये लवकरच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना अंतर्गत आरोग्य क्षेत्रामध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळ करीता अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या घटकातंर्गत आरोग्य क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या उद्देशाने नवीन 7 अभ्यासक्रमामध्ये कौशल्य विकासाचे प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. यामध्ये इमरजन्सी मेडीकल टेक्निशीयन बेसिक, जनरल ड्युटी असिस्टंट, जीडीए : ॲडव्हान्स, होम हेल्थ ऐड, मेडीकल इक्वीपमेंट टेक्नोलॉजी असिस्टंट, फेलेबोटोमीस्ट व ऑक्सिजन प्लँट यांचा समावेश आहे. सदरचे प्रशिक्षण हे पुर्णपणे नि:शुल्क आहे. प्रशिक्षणानंतर युवक व युवतींना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. जिल्ह्यातील इच्छूक सुशिक्षीत बेरोजगार युवक व युवतींनी या अभ्यासक्रमामध्ये प्रशिक्षण घेण्याकरीता आवश्यक कागदपत्रसह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. जिल्ह्यातील अधिकाधिक इच्छुक सुशिक्षीत बेरोजगार युवक व युवतींनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अभ्यासक्रमाची निवड करून सदर कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

                                                            ************

  वसंतराव नाईक विमुक्त जाती महामंडळाच्या योजनांची अर्जप्रक्रिया ऑनलाईन

  • www.vjnt.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीकरीता शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना यामध्ये बँकेमार्फत कर्ज मर्यादा 10 लाख रूपयापर्यंत व व्याज परतावा मर्यादा 12 टक्केपर्यंत परतावा देण्यात येतो. गट कर्ज व्याज परतावा योजना  यामध्ये बँकेमार्फत कर्ज मर्यादा 10 लक्ष रूपये ते 50 लक्ष रूपयांपर्यंत तसेच व्याज परतावा मर्यादा 12 टक्क्यापर्यंत परतावा देण्यात येतो. या सर्व योजनांची अर्जप्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे.   योजनांबाबत सर्व माहिती www.vjnt.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. तरी इच्छूकांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावे. ज्या लाभार्थ्यांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन कर्ज प्रकरणे सादर केले असतील त्यांनी आपली मूळ कागदपत्रांसह अर्जाच्या दोन छायांकित प्रती महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकाच्या कार्यालयात सादर कराव्यात. अर्ज सादर करताना काही अडचणी निर्माण झाल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा या कार्यालयाशी किंवा 07262-295319 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

********

बाल न्याय मंडळाच्या फिरत्या बैठकीचे जळगांव जामोद येथे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियम 6 पोटनियम 1 मधील प्रावधानानुसार मंडळाची फिरती अथवा तात्पुरती बैठक 8 ऑक्टोंबर 2021 रोजी पंचायत समिती सभागृह, जळगांव जामोद येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधीतांनी बैठकांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमोलकुमार अ. देशपांडे, प्रमुख दंडाधिकारी बाल न्याय मंडळ, बुलडाणा यांनी केले आहे.  

                                                                        ******

कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 21 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 :  पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हावासियांना आज 9 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 21 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

   प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 654 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 654 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 164 तर रॅपिड टेस्टमधील 490 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 654 अहवाल निगेटीव्ह आहेत.

  त्याचप्रमाणे आजपर्यंत 721813  रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86896 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण 3 आहे.  अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86896 आहे. आज रोजी 438 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 721813 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87590 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86896 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 21 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment