Monday 15 June 2020

DIO BULDANA NEWS 15.6.2020

 विजा चमकत असताना खबरदारी घ्यावी
  • जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.15 : सध्या मान्सून जिल्ह्यात दाखल असून सर्वत्र विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी शेतीकामात मग्न आहे. विजा चमकून गडगडाट होत असताना शेतकरी, शेतमजूर व नागरिकांनी विशेष सतर्क रहावे. सद्याच्या परिस्थितीत विजा पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्याकरिता सर्व नागरिकांनी जिवीत हानी, वित्तहानी टाळण्यासाठी सतर्क रहावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा यांचेवतीने करण्यात आले आहे.
   अति वेगाने वारे, अति पर्जन्य आणि काळे ढग, घोंगावणारे गडगडाटी वादळ, जास्त किंवा अधिक मेघगर्जना असल्याच सतर्क रहावे. विज ही सामान्यपणे उंच वस्तूवर पडते. कोणतेही स्थान हे पुर्णपणे सुरक्षित नाही. परंतु काही स्थान इतर ठिकाणापेक्षा सुरक्षित असतात. मोठी बांधकामे छोट्या किंवा खुल्या बांधकामापेक्षा जास्त सुरक्षित असतात. जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही वीज पडू शकते. वज्राघात अर्थात विजा ह्या सतत एकाच ठिकाणी पडू शकतात. सामान्यत: बाहेर पडलेल्या व्यक्तीच वज्राघातामुळे जखमी किंवा मृत पावू शकतात.
   विज पडण्यापासून वाचण्यासाठी काय करावे : आपल्या भागातील स्थानिक हवामान विषयी अंदाजाची व सतर्कतेच्या माहितीचे निरीक्षण करावे. स्वत: साठी व कुटूंबासाठी वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेसंदर्भात तसेच स्थानिक यंत्रणांशी संपर्कात रहावे. जर गडगडाटी वादळाचा / अति वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्याचा अंदाज असेल ,तर घराबाहेर पडू नये. विजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिकस्‍ वस्तू आणि वातानुकूलीत यंत्रे बंद ठेवावी. आपल्या घराच्या आजुबाजूची वाळलेली झाडे किंवा फांद्या काढून टाकाव्यात. घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवावा. घराभोवतालच्या उंच झाडे कुंपण यापासून दूर रहावे, मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनीटे घराच्या आतच रहावे.
   घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाणाकडे प्रस्थान करावे. शेतीची अवजारे, मोटार सायकल व इतर वाहने यांच्यापासून दूर रहावे. गाडी चालवित असल्यास सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करावा व गाडी सुरक्षित ठिकाणी लावताना मोठ्या झाडापासून तसेच पुरावे पाणी येत असल्यास अशी ठिकाणे वगळून लावाव्यात. उघड्यावर असल्यास शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्याच्या मध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क येवू द्यावा. मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर रहावे. जंगलात असल्यास दाट लहान झाडाखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर असल्यास दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करावा.
   वीज पडल्यास त्वरित रूग्णवाहिका व वैद्यकीय मदत बोलवावी, वज्राघात बाधीत व्यक्तीस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी. त्याला हात लावण्यास धोका नाही. श्वसन बंद असल्यास तोंडावाटे पुनरूत्थान प्रक्रिया राबवावी. ह्दयाचे ठोके बंद पडल्यास कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रूग्णाची ह्दय गती सीपीआर चा वापर करून सुरू ठेवावी.
        काय करू नये : गडगडाटी वादळ आल्यास उंच जागेवर, टेकडीवर, मोकळ्या जागांवर, स्वतंत्र झाडे, रेल्वे, बस, सहलीची आश्रय स्थाने, दळवळणाची टावर्स, दिव्याचे खांब, धातूचे कुंपण, उघडी वाहने व पाणी टाळावे. घरात असल्यास वायरद्वारे जोडले गेलेले फोन, मोबाईल व इतर इलेक्ट्रीक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये. वादळादरम्यान व विजा चमकत असतांना कोणत्याही विद्युत उपकराचा वापर करू नये. या दरम्यान आंघोळ करणे, हात धुणे, भांडी व कपडे धुणे ही कार्य करू नये. प्रवाहकीय पृष्ठभागाशी संपर्क टाळावा. घराबाहेर असल्यास मेघगर्जनेच्या वेळी विजा चमकत असताना किंवा वादळ वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये. वाहनांच्या धातू किंवा विजेच्या सुवाहक भागाशी संपर्क टाळावा. अधांतरी लटकणाऱ्या केबल जवळ उभे राहू नये. विजा चमकत असताना शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. घरातील विद्युत उपकरणे बंद ठेवावी. जनावरांना सुरक्षित स्थळी ठेवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.
                                                                                    ********
आता घरबसल्या मिळवा डिजीटल स्वाक्षरीचा सातबारा…!
बुलडाणा,(जिमाका) दि.15 : सध्या खरीप हंगामाचे दिवस आहेत. शेतकऱ्यांना कुठल्या ना कुठल्या कारणास्तव 7/12 आवश्यक आहे. आता 7/12 मिळविण्यासाठी कुठेही जायची गरज नसून शेतकरी घरबसल्या 7/12 प्राप्त करू शकतात. सात बारा प्राप्त करण्यासाठी https://mahabhumi.gov.in  या संकेतस्थळावर जावे. येथे मराठी किंवा इंग्रजी पर्याय निवडून डिजीटल स्वाक्षरीत 7/12 व मालमत्ता पत्रक या लिंकवर क्लिक करावे किंवा https://digitalsatbara. mahabhumi.gov.in  ही लिंक उपयोगात आणावी.
  कोणत्याही खातेदाराला पहिल्यांदा गेल्यास या वर नोंदणी करावी लागते. त्यासाठी new user registration या लिंकवर क्लिक करून एकदा आपले खाते उघडावे. हे करताना आपले नावामधले नाव किंवा आडनाव टाकताना नावाच्या अगोदर अथवा नंतर कोठेही स्पेस देवू नये. अन्यथा नोंदणी करताना स्पेशल कॅरक्टरचा एरर येईल. आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी, जन्मतारिख आदी माहिती देवून नाव नोंदणी करता येते. यावेळी दिलेले युजरनेम व पासवर्ड जपून लहून ठेवावे. खाते तयार करताना पासवर्ड स्ट्राँग असण्यासाठी त्यामध्ये 8 अंक, त्यापैकी एक कॅपीटल लेटर व एक स्पेशल कॅरॅक्टर असावे.
  आपले खाते व्हॅलेट सिस्टम प्रमाणेच चालत असल्याने आपले खात्यावर गरजेप्रमाणे 100, 200, 300 रूपये ऑनलाईन डिजीटल पेमेंटद्वारे भरून खाते रिचार्ज करता येते. यासाठी स्टेट बँकेचे पेमेंट गेटवे मधून नेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड किंवा भीम युपीआय वापरून पैसे भरता येतात. आपल्या खात्यावरून जेवढे डिजीटल स्वाक्षरीत 7/12 डाऊनलोड केले जातील त्याचे प्रती प्रत 15 रूपये प्रमाणे पैसे खात्यावरून कमी होतील. कोणताही 7/12 डाऊनलोड करताना काहीही तांत्रिक अडचण आल्यास पैसे कमी होवून देखील 7/12 डाऊनलोड न झाल्यास तो 72 तास पेयमेंट हिस्ट्री या पर्यायमध्ये विनाशुल्क डाऊनलोडसाठी उपलब्ध राहतो. या लिंकवरून जिल्हा, तालुका व गाव निवडून तसेच सर्व्हे नंबर निवडून कोणताही 7/12 डाऊनलोड करता येईल. आपले हे खाते वापरून आपल्याला राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील, कोण्त्याही तालुक्यातील कोणत्याही गावातील कोणत्याही खातेदाराचा कोणताही डिलीटल स्वाक्षरीत 7/12 डाऊनलोड करता येईल.
   आज अखेर राज्यातील 2.52 कोटी सातबारा पैकी 2.46 कोटी 7/12 म्हणजेच 97.5 टक्के 7/12 डिजीटल स्वाक्षरीत झाले असून जनतेला घरी बसून आपले मोबाईलवर अथवा संगणकावर प्राप्त करून घेता येत आहेत. त्याचप्रमाणे याच संकेतस्थळावर लवकरच डिजीटल स्वाक्षरीत 8- अ खाते उतारे व सन 2015-16 नंतरचे फेरफार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  तरी या कोरोनाच्या परिस्थितीत आपण आपली सुरक्षा करून अत्यंत तातडीच्या कामासाठी आपला डिजीटल स्वाक्षरीत 7/12 आपण प्राप्त करून घेवू शकतो. तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) अभिजीत नाईक यांनी केले आहे.
                                                                        ********
कोरोना अलर्ट : प्राप्त 120 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 12 पॉझिटिव्ह
  • 4 रूग्णांनी केली कोरोनावर मात
बुलडाणा,(जिमाका) दि.15 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 132 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 120 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे भीमनगर, मलकापूर येथील 16 व 20 वर्षीय तरूणी, 9 वर्षीय मुलगा, 30 वर्षीय पुरूष रूग्णाचे आहेत. तसेच पारपेठ, मलकापूर येथील 43 वर्षीय पुरूष, 59 वर्षीय पुरूष, हेडगेवार नगर, मलकापूर येथील 36 वर्षीय पुरूष, धोंगर्डी ता. मलकापूर येथील 70 वर्षीय वृद्ध महिला, 62 वर्षीय वृद्ध पुरूष रूग्णाचे आहेत. त्याचप्रमाणे हनुमान चौक, मलकापूर येथील 8 महिन्याचे बाळ व 27 वर्षीय महिला पॉझीटीव्ह आली आहे. तसेच ब्राम्हणचिकना ता. लोणार येथील 30 वर्षीय पुरूषाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. अशाप्रकारे 12 अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत.   
   त्याचप्रमाणे आज चार रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड केअर सेंटर येथून सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये शेलापूर, ता. मोताळा येथील 50 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरूष, मच्छी ले आऊट, बुलडाणा येथील 36 वर्षीय पुरूष व भीमनगर, मलकापूर येथील 25 वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत 81 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 81 आहे.  सध्या रूग्णालयात 44 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.
  तसेच आतापर्यंत 1872 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 130 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी पाच मृत आहे.   तसेच आज 15 जुन रोजी 132 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 12 पॉझीटीव्ह, तर 120 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  18 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1872 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
                                                ******

No comments:

Post a Comment