Friday 12 June 2020

DIO BULDANA NEWS 12.6.2020


कोविड रुग्णालयाच्या कामाची पालकमंत्री यांच्याकडून पाहणी
बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : येथील स्त्री रुग्णालयाच्या इमारतीत कोविड 19 रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. सदर रुग्णालयाचे अत्याधुनिकीकरण करून त्याठिकाणी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी टाटा ट्रस्ट, मुंबई यांनी घेतली असून टाटा ट्रस्टने प्रत्यक्षात कामास देखील सुरुवात केली आहे. या कामाची पाहणी आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी केली असून सदर काम हे 30 जून पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना संबधित यंत्रणेला त्यांनी दिल्या आहेत.
    तसेच याठिकाणी रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, येथील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना चांगल्या दर्जाचे जेवण योग्य किमतीत उपलब्ध व्हावे यासाठी कँटिंगची सुद्धा व्यवस्था करण्यात यावी, त्याचप्रमाणे 100 बेडच्या या रुग्णालयात अगोदर आयसीयुचे 10 बेड निर्माण करण्यात येणार होते. त्याऐवजी 20 बेड निर्माण करण्यात यावे. अशा सूचना यावेळी पालकमंत्री यांनी टाटा ट्रस्टच्या अधिकाऱ्यांना व जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडित,  टाटा ट्रस्टचे श्री. लोणारे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
****
खते-बियाण्यांची कुठल्याही तालुक्यात टंचाई भासणार नाही
  • जिल्हा परिषद कृषि विभागाचे स्पष्टीकरण, 14 तक्रार निवारण कक्ष
  • महिनानिहाय खताचा पुरवठा
बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : खरीप हंगाम 2020 करीता शासनाकडून जिल्ह्याला 1 लक्ष 43 हजार 890 मेट्रीक टन खताचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. सदर खताचा पुरवठा हा महिना निहाय करण्यात येतो. तो एकत्र करण्यात येत नाही. जिल्ह्यात माहे एप्रिल अखेर व्हावयाचा एकूण 17 हजार 267 मेट्रीक टन पुरवठ्यानुसार जिल्ह्यात आजअखेर 47 हजार 496 मेट्रीक टन खत उपलब्ध झालेली आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात खते- बियाण्यांची टंचाई भासणार नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकारी अनिसा महाबळे यांनी दिले आहे.
   नियोजन व पुरवठ्याचे आकडेवारीनुसार आज अखेर मुबलक प्रमाणात खत उपलब्ध असून तालुकास्तरावर पुरवठा व विक्री सुरू झाली आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत येत्या काळात खते व बियाण्याचा तुटवडा होवू नये, यासाठी कृषि आयुक्तालयाकडून खते, बियाणे पुरवठा कंपन्या व जिल्हा स्तरावरून नियेाजन करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक तथा आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी तालुकास्तरावर 13 व जिल्हास्तरावर 1 असे एकूण 14 भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये काही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधीतावर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर एकूण 14 तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारींची नोंद ठेवण्यात येवून प्रत्येक तक्रारीचा निपटारा करण्यात येणार आहे. खते व बियाण्यांची टंचाई कुठल्याही तालुक्यात असणार नाही, याबाबत शेतकऱ्यांनी निश्चिंत रहावे.
   खते व बियाण्यांची खरेदी अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्राकडून करावे, दुकानदारांकडून पक्के बिल घ्यावे, बॅगवरील लॉट क्रमांक व बिलावरील लॉट क्रमांका बरोबर असल्याची खात्री करावी. तसेच कुठल्याही गैरप्रकार आढळल्यास नजिकच्या तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समिती, कृषि अधिकारी यांना अवगत करावे, असे आवाहन कृषि विकास अधिकारी अनिसा महाबळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
सोयाबीन बियाणे घरचेच पेरावे
सोयाबीन हे सरळ वाणाचे पिक आहे. त्यामुळे दरवर्षी बदलण्याची आवश्यकता नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणीत बियाण्यांपासून उत्पादीत होणारे सोयाबीन हे बियाणे म्हणून शेतकऱ्यांनी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. त्याकरिता शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणेची उगवण क्षमता घरीच तपासणी करून पाहण्यासाठीचे प्रात्याक्षिक करावे. शेतकऱ्यांनी घरचेच सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करून पेरणीसाठी वापरावे.
                                                            *******
कटला, रोहू, मृगळ माशांचा जुलैपासून प्रजनन हंगाम सुरू होणार
  • मत्स्यकास्तकार, लाभधारक शेतकरी, सहकारी संस्था यांनी मत्स्यबीजाची मागणी करावी
बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : सन 2020 या आर्थिक वर्षाचा भारतीय प्रमुख कार्प अर्थात कटला, रोहू, मृगळ माशांचा प्रजनन हंगाम जुलै 2020 पासून मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यबीज उत्पादन केंद्र, कोराडी, ता. मेहकर येथे सुरू करण्यात येत आहे. सद्यस्थितीत मत्स्यबीजाचा मत्स्यजिरे प्रकार मत्स्यकास्तकारांना 15 जुलै 2020 पासून जर पोषक वातावरण मत्स्यबीज निर्मितीस राहील्यास उपलब्ध होवू शकणार आहे. ते 30 जुलैपर्यंत मिळेल.
   जिल्ह्यातील मत्स्यकास्तकार, शेततळी लाभधारक शेतकरी, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांनी त्यांचे तलाव / शेततळ्यामध्ये संचयन करण्यासाठी मत्स्यबीजाची मागणी लेखी स्वरूपात सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), प्रशासकीय इमारत, बस स्थानकासमोर, बुलडाणा यांचेकडे नोंदवावी. तसेच कार्यालयाच्या 07262-242254 क्रमांकावर संपर्क साधून  मत्स्यजिरे पुरवठ्याबाबतची माहिती घेवून पुरवठ्याबाबत वेळ व दिनांक घेण्यात यावा. मत्स्यबीज मागणी नोंदविण्यासाठी इच्छूक सहाय्यक आयुक्त स. ई नायकवडी यांच्या 9029515539, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी नि.मा साळुंके यांच्या 9860809711, इ. तू देवकत्ते यांच्या 8856929431 क्रमांकावरही संपर्क साधून माहिती घेवू शकतात.
   मच्छिमार संस्था, जिल्हा मच्छिमार सहकारी संस्थांचा संघ, मत्स्यकास्तकार, शेततळीधारक लाभधारक शेतकरी यांनी मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यबीज केंद्रामधून मस्तयबीज खरेदी करणे बंधनकारक व अनिवार्य आहे. तसेच मत्स्यजीरे खरेदी केलेली पावती मत्स्यबीज खरेदी करणाऱ्यांकडे असणे बंधनकारक आणि अनिवार्य आहे. बाहेरच्या जिल्हा, राज्यात मत्स्यबीज खरेदी करण्यासाठी जिल्हा कार्यालयाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक व बंधनकारक आहे. विनापरवानगी मत्स्यबीज खरेदी केल्याचे आढळून आल्यानंतर शासन धोरणानुसार कारवाई होईल. तसेच मत्स्यबीज संचयन पंचनामे करणे बंधनकारक आहे. अन्यथा शासकीय योजनांचा लाभ देते वेळेस अडचण निर्माण झाल्यास किंवा अपात्र ठरल्यास जिल्हा कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची नोंद घेण्यात यावी. मत्स्यबीज इष्टतम संचयन आणि अपेक्षीत मत्स्योत्पादन होण्यास सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त स. ई नायकवडी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
असे आहेत मत्स्यबीजाचे प्रकार व दर
बिजाचा प्रकार : मत्स्यजीरे, आकार 7 ते 12 मि.मी, दर 1500 रूपये प्रति लाख. बिजाचा प्रकार : मत्स्यबीज, आकार 12 ते 25 मि.मी, दर 200 रूपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : अर्ध बोटुकली, आकार 25 ते 50 मि.मी, दर 300 रूपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : बोटुकली, आकार 50 मि.मी पेक्षा जास्त, दर 600 रूपये प्रति हजार. बिजाचा प्रकार : इयरलिंग, आकार 50 ग्रॅम वरील, दर 5 रूपये प्रति नग. तसेच पॅकिंग खर्च 15 रूपये प्रति डबा अथवा बॅगप्रमाणे आहे.
*********
बँकांनी गहाण खताच्या दस्तासाठी लागणारे मुद्रांक शुल्क ग्रास प्रणालीवर भरावे
बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : जिल्ह्यातील मुद्रांक तुटवडा दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. मुद्रांक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या खरीप पीक कर्ज वाटप जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पिक कर्जासाठी मुद्रांकाची आवश्यकता असल्यास संबंधीत शेतकऱ्यांना मुद्रांक खरेदी करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 10 ड मध्ये 24.4.2015 रोजी झालेल्या सुधारणेनुसार बँकांना लागणारे मुद्रांक शुल्क ग्रास प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार महसूल व वन विभाग यांचेकडील दि. 3.6.2016 चे अधिसुचनेनुसार बँकांनी त्यांच्या गहाण खताच्या दस्तांना लागणारे मुद्रांक शुल्क ग्रास प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे निर्देशीत केले आहे. त्यानुसार बँकांनी अशा परिस्थितीत मुद्रांक शुल्क ग्रास प्रणालीवर भरावे.
  याबाबत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयामार्फत बँकांनी याप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in  या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी बँकांनी आपले अधिनस्थ बँक शाखा, ग्रमासेवा सहकारी संस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांनी मुद्रांक शुल्काचा भरणा ऑनलाईन पद्धतीने ग्रास प्रणालीवर स्वीकारण्याच्या सुचना द्याव्यात.  त्यामुळे मुद्रांक पेपरची गरज पडणार नाही व नागरिकांना मुद्रांक खरेदीसाठी यावे लागणार नाही. तरी बँकांनी मुद्रांक शुल्काचा भरणा ग्रास प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने करावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 
******
लोणार सरोवराच्या पाण्याचे नमुने तपासणार
– वनमंत्री संजय राठोड
 बुलडाणा, दि. 12 : बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे अभयारण्य वन विभागाच्या अखत्यारीत आहे. 9 जून रोजी लोणार सरोवराचे पाणी गुलाबी रंगाचे झाल्याची घटना घडली. त्या अनुषंगाने या पाण्याचे शास्त्रीय पध्दतीने नमुने घेण्यात आले आहे. तसेच सदर नमुने संशोधनाकरीता नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) तसेच पुणे येथील आगरकर संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आल्याची माहिती राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. लोणार सरोवर हे उल्कापाताने तयार झालेले असून जगातील ते वैशिष्टपुर्ण सरोवर आहे. यातील क्षाराचे प्रमाण जास्त आहे.
     सरोवरातील पाण्यात विशिष्ट प्रकाराच्या हॅलो बॅक्टेरीया व शेवाळाच्या संयोगातून अशा प्रकारचे गुलाबी रंगाचे पाणी होत असावे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. तर काही तज्ज्ञांनी डुनलेलीया अल्गी (Dunaliella algae) व हॅलो बॅक्ट्रेरीया (HaloBacteria) या जीवाणुमुळे बेटा कॅरोटीन रंगद्रव्य निर्माण झाल्याने लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग गुलाबी होत असल्याचे मत व्यक्त केले. इराणमधील क्षारयुक्त सरोवरामध्ये अश्याप्रकारे रंगात बदल झाल्याच्या घटना यापूर्वी झालेल्या आहेत. या पार्श्वभुमीवर चौकशी करण्यात येत असून अन्य कुठल्याही कृत्रिम घटकामुळे पाण्याचा रंग बदललेला नाही, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
    अकोला येथील वन्यजीव विभागाने लोणार सरोवराच्या पाण्याचे शास्त्रीय पध्दतीने नमुने घेण्यासाठी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयचे डॉ.मिलींद शिरभाते यांना लोणार येथे पाठविले होते. त्यांनी गुलाबी रंगाच्या पाण्याचे व मातीचे नमुने गोळा करून वनविभागाकडे सादर केले आहे. पाण्यातील रंगबदल तपासासाठी सदर नमुने खास दुतामार्फत नागपूर येथील नीरी संस्थेकडे तसेच पुणे येथील आगरकर संशोधन संस्थेकडे पाठविले आहे. बुलडाणा शहराच्या दक्षिण पूर्व (आग्नेय) दिशेला 90 किमी अंतरावर लोणार गावालगत उल्कापातामुळे तयार झालेले एकमेव सरोवर आहे. हे सरोवर लोणार अभयारण्यांतर्गत येते. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील हायपर व्हेलॉसिटी मेटीयोराईट इम्पॅक्टने तयार झालेले जगातील तिस-या क्रमांकाचे खा-या पाण्याचे सरोवर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची 464.63 मीटर असून खोली 150 मीटर आहे. त्याचा आकार अंडाकृती असून पूर्व-पश्चिम व्यास 1787 मीटर तर उत्तर-दक्षिण व्यास 1875 मीटर आहे.
                                                                        ******
कोरोना अलर्ट : प्राप्त 08 कोरोना अहवाल 'पॉझीटीव्ह'; तर 04 निगेटीव्ह
  • पाच रूग्णांची कोरोनावर मात
बुलडाणा,(जिमाका) दि.12 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 12 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 04 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 08 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे पातुर्डा ता. संग्रामपूर येथील 64 वर्षीय पुरूष, 12 वर्षीय मुलगा, 46 व 28 वर्षीय महिला, 5 वर्षीय मुलगी, 17 वर्षीय तरूणी आणि विठ्ठल चौक, संग्रामपूर येथील 24 वर्षीय पुरूष रूग्णांचे आहेत.  
    त्याचप्रमाणे आज बुलडाणा कोविड केअर सेंटर येथून पाच रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रूग्णालयातून वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये वावरे ले आऊट, बुलडाणा येथील 33 वर्षीय महिला,  पलढग ता. मोताळा येथील 19 वर्षीय तरूणी, शेलापूर ता. मोताळा येथील 28 वर्षीय पुरूष व 25 वर्षीय स्त्री,  मुक्ताई नगर, मलकापूर 40 वर्षीय पुरूष रूग्णांचा समावेश आहे. अशाप्रकारे 5 रूग्णांना आज सुट्टी मिळाली आहे.
       तसेच आतापर्यंत 1679 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 110 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी चार मृत आहे. आतापर्यंत 77 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 77 आहे.  सध्या रूग्णालयात 29 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.
    तसेच आज 12 जुन रोजी 12 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 08 पॉझीटीव्ह, तर 04 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 39 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1679 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
                                                ******

No comments:

Post a Comment