नवीन ईव्हीएम मशीनमुळे मतदान प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक - राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे प्रतिपादन
नवीन ईव्हीएम मशीनमुळे मतदान प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक
-
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे प्रतिपादन
·
नवीन एस थ्री ईव्हीएम मॉडेल वापर, चाचणी संदर्भात कार्यशाळा
बुलढाणा,
दि. 2 (जिमाका): आगामी
निवडणुकीकरीता जिल्ह्यात नवीन एस थ्री मॉडेल ईव्हीएम मशीन उपलब्ध करुन देण्यात आले
आहे. नवीन मशीनच्या वापरामुळे मतदान प्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक
होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यावेळी
केले.
आगामी
निवडणुकांच्या अनुषंगाने नव्या तंत्रज्ञानावर आधारित ईव्हीएम मशीनची कार्यपद्धती,
हाताळणी आणि मतदान प्रक्रियेतील त्यांचा वापर याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना
सविस्तर माहिती मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, निवडणूक
आयोगाचे अवर सचिव शैलेंद्र वऱ्हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, इलेक्ट्रानिक्स
कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.अभियंता तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच जिल्हा
प्रशासनातील संबंधित अधिकारी, निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
करून मतदान प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि कार्यक्षम करण्यावर निवडणूक आयोगाचा भर
आहे. त्याच अनुषंगाने नवीन ईव्हीएम मशीनची रचना, वैशिष्ट्ये, कार्यप्रणाली तसेच
मतदानाच्या विविध टप्प्यांवर त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा, याबाबत कार्यशाळेत
मार्गदर्शन करण्यात आले.
निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, नवीन
ईव्हीएम मशीनमुळे मतदान केंद्रावरील प्रक्रिया अधिक सुलभ होण्याबरोबरच निवडणूक
प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. मशीनच्या योग्य हाताळणीसाठी
संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणात माहिती समजून घ्यावी. प्रत्यक्ष
मतदानाच्या वेळी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व बाबींची पूर्वतयारी
करावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
कार्यशाळेत नवीन ईव्हीएम मशीनची प्रत्यक्ष
कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. मशीन सुरू करण्यापासून मतदानाची नोंद, विविध
प्रक्रियात्मक बाबी, मशीनची सुरक्षित हाताळणी व मशीनमध्ये असलेल्या विविध सुविधेबाबत
उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ईव्हीएमच्या वापरासंदर्भात उद्भवणाऱ्या
संभाव्य शंकांचे निरसन करण्यात आले.
निवडणूक आयोगाकडे असलेल्या इव्हीएम मशीन जुन्या
तसेच तांत्रिक अडचणी येत असल्याने मतदान प्रक्रियेत अडथळे निर्माण होत होते.
त्यामुळे इलेक्ट्रानिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. हैद्राबाद कडून नवीन अत्याधुनिक
एस थ्री प्रकारचे इव्हीएम मशीन घेण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात 3 हजार कंट्रोल युनिट
व 6 हजार बॅलेट युनिट उपलब्ध करुन देण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही
व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याने त्यामध्ये सहभागी असलेल्या
प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडणे आवश्यक आहे.
नवीन यंत्रणेची माहिती प्रत्यक्ष प्रशिक्षणातून आत्मसात करून निवडणुकीच्या वेळी
त्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यशाळेदरम्यान ईव्हीएम मशीनच्या तांत्रिक
बाबी तसेच मतदान प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत सादरीकरण करण्यात आले. उपस्थित
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबत माहिती घेतली. नवीन ईव्हीएमच्या वापरामुळे मतदान
प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल
असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
Comments
Post a Comment