राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन;
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन;
75 हून अधिक राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान; 250 खेळाडूंचा विविध उपक्रमांत
सहभाग
बुलढाणा,
दि. 3 (जिमाका): महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीला चालना
देण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये क्रीडाविषयक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने
हॉकीचे जादूगार स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 29 ऑगस्ट हा दिवस देशभरात
‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालयांच्या वतीने जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध क्रीडा
उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या विविध कार्यक्रमांमध्ये ७५
हून अधिक राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. तसेच भारतीय
खेल प्राधिकरणाच्या मार्गदर्शनानुसार आयोजित विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये सुमारे
२५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २८ ते ३० ऑगस्ट
२०२६ या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रम घेण्यात आले. यामध्ये मेजर ध्यानचंद
यांच्या प्रतिमेचे पूजन, त्यांच्या जीवनावर व्याख्याने, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
खेळाडूंचा सत्कार, खेळाडूंना मान्यवरांचे मार्गदर्शन तसेच विविध क्रीडा स्पर्धांचा
समावेश होता. भारतीय खेल प्राधिकरणाच्या उपक्रमांतर्गत २८ ऑगस्ट रोजी ‘२९ चॅलेंज’,
‘पास द बॉल’ आणि ‘स्पोर्ट्स बंधन’ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. २९ ऑगस्ट रोजी
‘एक तास खेळाच्या मैदानात’ या उपक्रमांतर्गत स्व. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे
पूजन करण्यात आले, तर ३० ऑगस्ट रोजी ‘संडे ऑन’ उपक्रम घेण्यात आला.
सन २०२५-२६ मध्ये शालेय तसेच अधिकृत एकविध खेळ
संघटनांमार्फत आयोजित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य
मिळविलेल्या तसेच सहभाग घेतलेल्या खेळाडूंचा जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने
स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचे
उद्घाटन २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल,
बुलढाणा येथे झाले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कारार्थी चंद्रकांत इलक, हॉकी
मार्गदर्शक सय्यद आबिद आणि क्रीडा शिक्षक रविंद्र गणेशे यांची प्रमुख उपस्थिती
होती.
कार्यक्रमाचा समारोप १ सप्टेंबर रोजी करण्यात आला.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे, राखीव पोलीस निरीक्षक विकास तिडके
तसेच प्राध्यापक डॉ. मनोज व्यवहारे यांच्या उपस्थितीत खेळाडूंचा सत्कार व सन्मान
करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा पुरस्कारार्थी डॉ. गायत्री सावजी
यांनी केले. प्रस्तावना राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांनी केली, तर
आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. जीवन मोहोड यांनी मानले.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
Comments
Post a Comment