‘केंद्रीय DCS MH’ ॲपद्वारे खरीप पीक पाहणीला सुरुवात
‘केंद्रीय DCS MH’ ॲपद्वारे खरीप पीक पाहणीला सुरुवात;
शेतकऱ्यांनी १० नोव्हेंबरपूर्वी गावातील पीक पाहणी सहाय्यकांमार्फत
नोंदणी करण्याचे आवाहन
बुलढाणा,
दि. 3 (जिमाका): खरीप हंगाम २०२६-२७ साठी बुलढाणा जिल्ह्यात
‘केंद्रीय DCS MH’ (Central DCS) या नवीन मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी व नोंदणी
मोहिमेला सुरुवात झाली आहे. पीक पाहणी अधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी
प्रशासनाच्या वतीने प्रत्येक गावासाठी विशेष ‘पीक पाहणी सहाय्यक’ नियुक्त करण्यात
आले आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सहाय्यकांमार्फत दि. १०
नोव्हेंबर २०२६ पूर्वी पीक
पाहणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.
खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जिल्ह्यात एकूण ८
लाख ४० हजार ९९१ मालकी हक्काच्या प्लॉटवर पीक पाहणी करावयाची आहे.
त्यापैकी १ लाख ७४ हजार १३ प्लॉटवर संबंधित सहाय्यकांमार्फत ‘केंद्रीय DCS
MH’ ॲपद्वारे ७/१२ वर पिकांची नोंद करण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रातील
शेतकऱ्यांनीही आपल्या पिकांची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.
‘केंद्रीय
DCS MH’ ॲपद्वारे सर्वेक्षणाअंतर्गत १०० टक्के ई-पीक पाहणी नोंदणी करणे
बंधनकारक आहे. खरीप हंगामात शेतात उभे असलेले पीक तसेच कायम पडीत
किंवा चालू पडीत असलेल्या जमिनीचीही नोंद करणे आवश्यक आहे. संबंधित गावातील
नियुक्त पीक पाहणी सहाय्यकांमार्फत ही नोंदणी पूर्ण करून घेता येणार आहे.
पीक
नोंद नसल्यास शासकीय लाभांमध्ये अडचण : ई-पीक
पाहणीद्वारे पिकांची नोंद न केल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर पीक
पेरा कोरा राहू शकतो. ही नोंद नंतर भरता येत नसल्याने पीक विमा
तसेच इतर शासकीय अनुदान व लाभ मिळविताना अडचणी निर्माण होऊ शकतात. अवेळी पाऊस किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे
नुकसान झाल्यास पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी ७/१२ उताऱ्यावर संबंधित पिकाची अचूक
नोंद असणे आवश्यक आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी १०
नोव्हेंबर २०२६ पूर्वी आपल्या गावातील नियुक्त पीक पाहणी सहाय्यकांमार्फत ई-पीक
पाहणी करून आपल्या पिकांची नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी
केले.
00000
Comments
Post a Comment