डाक जीवन विमा योजनेसाठी थेट अभिकर्त्यांची नियुक्ती
बुलढाणा,
दि. २८ (जिमाका) : भारतीय डाक विभागाच्या डाक जीवन विमा योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात थेट अभिकर्त्यांची
(Direct Agent) नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात
आले असून, बुलढाणा विभागातील सर्व प्रधान डाकघरे व उपडाकघरांमध्ये अर्जाचे नमुने उपलब्ध
आहेत.
अभिकर्ता पदासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि शैक्षणिक
पात्रता किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बेरोजगार किंवा स्वयंरोजगार करणारे
शिक्षित युवक, विमा कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटांच्या
सदस्या, MPKBY-SAS प्रतिनिधी, सेवानिवृत्त शिक्षक तसेच केंद्र व राज्य शासनाचे सेवानिवृत्त
कर्मचारी अर्ज करू शकतात.
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार असून, व्यावसायिक
कौशल्य, व्यक्तिमत्त्व, परस्पर संबंधांचे कौशल्य तसेच जीवन विम्याबाबतचे ज्ञान या बाबींच्या
आधारे निवड प्रक्रिया होईल. निवड झालेल्या उमेदवारास ५ हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा
ठेव म्हणून जी NSC अथवा KVP स्वरूपात ठेवावी लागेल.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना
देण्यात येईल. PLI Mobile Training App (PMTA) ची ऑनलाइन परवाना परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर
तो कायमस्वरूपी परवान्यात रूपांतरित करण्यात येईल. नियुक्तीनंतर तीन वर्षांच्या आत
PMTA ऑनलाइन परवाना परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील.
इच्छुक उमेदवारांनी अधीक्षक डाकघर, बुलढाणा
विभाग, बुलढाणा-४४३००१ यांच्या कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रे,
PAN कार्ड, आधार कार्ड व इतर संबंधित कागदपत्रांसह दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११
ते दुपारी २ वाजेपर्यंत उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जवळच्या डाक कार्यालयाशी संपर्क
साधावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर गजेंद्र नारायणराव जाधव यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment