शेगावात ‘लोकसंवाद-२०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद गणेश मंडळ ठरले शासकीय योजनांच्या जनजागृतीचे व्यासपीठ; कृषी, आरोग्य, महिला व बालविकास आणि महसूल विभागाकडून मार्गदर्शन
बुलढाणा, दि. 25 (जिमाका) : गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना यंदा आशीर्वादासोबतच
शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती मिळत आहे. ‘गणरायाचे दर्शन आणि योजनांची
माहिती’ या अभिनव संकल्पनेतून जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या
‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाला शेगाव येथील नवयुवक गणेश मंडळात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने विविध गणेश मंडळांच्या
परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीच्या माध्यमातून शासनाच्या योजना,
सुविधा आणि लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने
जिल्हा माहिती कार्यालयाने ‘लोकसंवाद-२०२६’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
शेगाव येथील कार्यक्रमात कृषी, महिला व बालविकास, आरोग्य आणि महसूल
विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. कृषी विभागाचे उपविभागीय
कृषी अधिकारी धनंजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या
विविध योजना, उपलब्ध सुविधा तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन
करण्यात आले.
नायब तहसीलदार विजय सुरडकर आणि ऋतुजा पारखे यांनी महसूल विभागाच्या
विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. योजनांसाठीची पात्रता, आवश्यक कागदपत्रे,
ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज प्रक्रिया तसेच संबंधित विभागाशी संपर्क करण्याची पद्धत याबाबत
नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
महिला व बालविकास पर्यवेक्षक शुभांगी जाधव यांनी महिला व बालकांच्या
संरक्षणासाठी असलेले कायदे, शासनाच्या विविध योजना आणि उपलब्ध सुविधांची माहिती दिली.
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत जोशी यांनी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व
समुपदेशन केले.
गणेश मंडळाचा परिसर केवळ धार्मिक उत्सवाचे केंद्र न राहता शासनाच्या
योजनांची माहिती देणारे लोकसंवादाचे व्यासपीठ ठरला. शेतकरी, महिला तसेच सर्वसामान्य
नागरिकांनी विविध योजनांबाबत उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. गावपातळीवरच योजनांची
माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध झाल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. ‘योजना
समजून घ्या, पात्रतेनुसार लाभ घ्या’ या उद्देशाने पात्र नागरिकांनी शासनाच्या विविध
योजनांची माहिती घेऊन उपलब्ध सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी
करण्यात आले.
कार्यक्रमास कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी धनंजय देशमुख,
महिला व बालविकास पर्यवेक्षक शुभांगी जाधव, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत जोशी,
नायब तहसीलदार विजय सुरडकर, ऋतुजा पारखे, लोकमतचे तालुका प्रतिनिधी अनिलभाऊ उंबरकर,
दैनिक दिव्य मराठीचे ज्येष्ठ पत्रकार धनराज ससाने, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे महेंद्र मिश्रा,
मंडळाचे अध्यक्ष योगेश शेगोकार, जिल्हा माहिती कार्यालयाचे जयंत वानखडे, उप माहिती
कार्यालयाचे ललितकुमार ढोकणे तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
00000
.jpeg)
.jpeg)
Comments
Post a Comment