सेवा संकल्प’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान प्रभावीपणे राबवूया ; ग्रामस्थांना दर्जेदार सेवा देण्यासह स्वच्छता उपक्रमांना गती देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांचे आवाहन

 


 

बुलढाणा, दि. 26 (जिमाका) : ग्रामस्थांना विविध शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देतानाच गावांमध्ये स्वच्छता आणि जनजागृतीला चालना देण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६’ प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातही या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामस्थांना शासकीय योजनांची माहिती, सेवा आणि सुविधांचा लाभ सुलभतेने मिळावा, यासाठी विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

सेवा संकल्प अभियानातून विविध उपक्रम

 

‘सेवा संकल्प अभियान’ कालावधीत सेवा सेतू अभियान, Innovation Challenge, सेवा माझे योगदान, विकसित भारत संकल्प यात्रा, सेवा ज्योत यात्रा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, अंगणवाडी उत्सव, आशीर्वादाचा दिवा, बदलाची गोष्ट, आभार आणि संकल्पची रांगोळी, नमो सेवा गाथा, जल-जन-सेवा संकल्प यात्रा, जनसेवक महाकुंभ तसेच अंमलबजावणी व सनियंत्रण समिती आदी विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांचा शासनाच्या विविध योजनांशी थेट संवाद वाढविणे, शासकीय सेवा सुलभ करणे आणि ग्रामविकासात लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

 

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला गती

 

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६’ अंतर्गत प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, कार्यालयीन स्वच्छता, स्वच्छता फेरी, चित्रकला स्पर्धा, गाव स्वच्छता आणि कचरा वर्गीकरण यांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून तालुकास्तरीय यंत्रणांना सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून, उपक्रमांचा नियमित आढावा घेऊन पाठपुरावा करण्यात येत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून दोन्ही अभियान यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले आहे.

 

तालुक्यांमध्ये विविध उपक्रमांना सुरुवात

 

जिल्ह्यातील चिखली, मलकापूर, संग्रामपूर, शेगाव, सिंदखेडराजा, मेहकर यासह विविध तालुक्यांमध्ये अभियानांतर्गत उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजना व लेक लाडकी योजना याबाबत माहिती देण्यात येत असून, पोषण अभियानांतर्गत संतुलित आहार व पोषणविषयक मार्गदर्शन केले जात आहे. आरोग्य तपासणी शिबिरे, जनजागृतीपर उपक्रम तसेच राष्ट्रीय प्रतीकांवर आधारित रांगोळी स्पर्धांचेही आयोजन करण्यात येत आहे.

 

‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियान, ‘सेवा संकल्प अभियान’ आणि राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या अनुषंगाने नागरी आरोग्यवर्धिनी, कारंजा चौक येथे आयुष ओपीडीचे आयोजन करण्यात आले. तसेच ‘तीशीचा पल्ला—तपासणी आणि सल्ला’ या उपक्रमांतर्गत ३० वर्षांवरील नागरिकांची रक्तदाब व रक्तशर्करा तपासणी करण्यात आली. महिलांना आरोग्यविषयक समुपदेशनही करण्यात आले.

 

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियंत्रण

 

‘सेवा संकल्प अभियान’ची अंमलबजावणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शिवशंकर भारसाखळे यांच्या नियंत्रणाखाली, तर ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ची अंमलबजावणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) सतीश देशमुख यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येत आहे.

 

ग्रामस्थांना शासकीय सेवा अधिक सुलभतेने मिळाव्यात, गावांमध्ये स्वच्छता व आरोग्यविषयक जनजागृती वाढावी आणि लोकसहभागातून ग्रामविकासाला चालना मिळावी, यासाठी ‘सेवा संकल्प’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर