सेवासंकल्प अभियानांतर्गत ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रम

 



बुलढाणा, दि. 25(जिमाका) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकिर्दीस २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तसेच त्यांच्या कार्यकाळात ‘सेवा परमो धर्म’ या उक्तीनुसार शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत सेवा सेतू अभियान, Innovation Challenge, सेवा माझे योगदान, विकसित भारत संकल्प यात्रा, सेवा ज्योत यात्रा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, अंगणवाडी उत्सव, आशीर्वादाचा दिवा, बदलाची गोष्ट, आभार आणि संकल्पाची रंगोळी, नमो सेवागाथा आणि जनसेवक महाकुंभ आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

यातील ‘आशीर्वादाचा दिवा’ हा उपक्रम विशेष महत्त्वाचा असून, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यामुळे लाभार्थ्यांचा आनंद व समाधान व्यक्त होण्यासोबतच शासन आणि लाभार्थी यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यास मदत होत आहे.

त्यानुषंगाने २४ सप्टेंबर रोजी बुलढाणा शहरातील रमाई आवास योजनेचे लाभार्थी श्री. सुरेश विठोबा चव्हाण व श्री. चंद्रकांत विठोबा चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. मनोज मेरत यांच्या हस्ते ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला.

यावेळी लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मिळालेल्या शासकीय योजनेच्या लाभाबाबत माहिती जाणून घेण्यात आली. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ गरजू व पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे, हा ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रसंगी विशाल आठवले, कार्यालय अधीक्षक, प्रदीप जाधव, समाज कल्याण निरीक्षक रवि काळबांधे, प्रयोगशाळा सहायक तसेच समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच नगर परिषद सहाय्यक प्रकल्प अधिकारी फकीर जाधव आदी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर