‘लोकसंवाद-२०२६’;गणेश मंडपातून योजनांचा जागर गणरायाच्या दर्शनासोबत शासनाच्या योजनांची माहिती

 





बुलढाणा, दि. २५ (जिमाका) : गणेशोत्सवाच्या उत्साहात भाविकांना गणरायाच्या दर्शनासोबतच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्याचा अभिनव उपक्रम शेगाव येथे राबविण्यात आला. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाला जय लक्ष्मी नवयुवक गणेश मंडळात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शेगाव येथील उपक्रमात कृषी, महसूल, आरोग्य तसेच महिला व बालविकास विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. उपविभागीय कृषी अधिकारी धनंजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना, उपलब्ध सुविधा, लाभाची पात्रता आणि अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी योजनांबाबत विचारलेल्या प्रश्नांना संबंधितांनी माहिती देत शंकांचे निरसन केले.

महसूल विभागाच्या योजनांची माहिती नायब तहसीलदार विजय सुरडकर व ऋतुजा पारखे यांनी दिली. विविध योजनांसाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. शासनाच्या सुविधांचा लाभ घेताना संबंधित विभागाशी संपर्क साधण्याच्या पद्धतीचीही माहिती देण्यात आली.

महिला व बालविकास पर्यवेक्षक शुभांगी जाधव यांनी महिला व बालकांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे, शासनाच्या योजना आणि उपलब्ध सुविधांची माहिती दिली. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत जोशी यांनी नागरिकांशी संवाद साधत आरोग्यविषयक मार्गदर्शन व समुपदेशन केले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक वातावरणासोबत लोककल्याणकारी योजनांचा जागर घडवून आणण्याचा हा उपक्रम नागरिकांसाठी माहितीचे प्रभावी माध्यम ठरला. शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी विविध योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुकता दाखविली. स्थानिक पातळीवरच योजनांची माहिती आणि मार्गदर्शन मिळाल्याने नागरिकांनी उपक्रमाचे स्वागत केले.

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने गणेश मंडळांच्या परिसरात मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत आहेत. या माध्यमातून शासनाच्या योजना, विविध सुविधा आणि लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून करण्यात येत आहे.

कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी धनंजय देशमुख, महिला व बालविकास पर्यवेक्षक शुभांगी जाधव, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत जोशी, नायब तहसीलदार विजय सुरडकर, ऋतुजा पारखे, लोकमतचे तालुका प्रतिनिधी अनिलभाऊ उंबरकर, दैनिक दिव्य मराठीचे ज्येष्ठ पत्रकार धनराज ससाने, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे महेंद्र मिश्रा, मंडळाचे अध्यक्ष योगेश शेगोकार, जिल्हा माहिती कार्यालयाचे जयंत वानखडे, उप माहिती कार्यालयाचे ललितकुमार ढोकणे तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर