खडकी येथे आरोग्य विभागाचा ‘सेवा संकल्प’; विविध आरोग्य सर्वेक्षणांसह प्रतिबंधात्मक उपाययोजना किटकशास्त्रीय व साथरोग सर्वेक्षण; कुष्ठरुग्ण तपासणीसह पाणी शुद्धीकरणाबाबत जनजागृती
बुलढाणा, दि. २७ (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, बोराखेडीअंतर्गत उपकेंद्र राजूरच्या कार्यक्षेत्रातील खडकी गावात आरोग्य विभागाच्या वतीने विविध आरोग्यविषयक सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या.
या मोहिमेदरम्यान गावात किटकशास्त्रीय व साथरोग सर्वेक्षण करण्यात आले. संभाव्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या. तसेच सहवासित व एफएलसी (FLC) कुष्ठरुग्ण तपासणी मोहीम राबवून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
गावातील सार्वजनिक पाणी स्रोत असलेल्या नळ व विहिरींची ओटी (OT) चाचणी करण्यात आली. पिण्याच्या पाण्याचे नियमित शुद्धीकरण करण्याबाबत जलसुरक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात आले असून, किरकोळ आजारांवर नागरिकांना प्रथमोपचार व आवश्यक आरोग्य मार्गदर्शन देण्यात आले.
यावेळी नागरिकांना कोरडा दिवस नियमितपणे पाळणे, पाणी उकळून पिणे तसेच वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखणे याबाबत आवाहन करण्यात आले. आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले.
या आरोग्य सर्वेक्षणादरम्यान आरोग्य निरीक्षक श्री. पडघान, आरोग्य सेवक अमोल न्हावकर आणि आशा सेविका श्रीमती प्रेमिला चव्हाण उपस्थित होत्या.
00000


Comments
Post a Comment