मतदार याद्या अधिक अचूक आणि दोषमुक्त करण्यासाठी महाराष्ट्रात ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ मोहीम

 


बुलढाणा,दि.3 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने भारतीय संविधानाच्या कलम 324 अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून देशभरातील मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (Special Intensive Revision - SIR) करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला असून राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख मतदारांच्या नोंदींची सखोल पडताळणी केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाने यापूर्वी 1952-56, 1957, 1961, 1965-66, 1983-84, 1987-89, 1992-95 आणि 2002-04 या कालावधीत विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमा राबवल्या होत्या. गेल्या 20 वर्षांत केवळ विशेष संक्षिप्त पुनरीक्षण झाले असून, मोठ्या प्रमाणावर झालेले स्थलांतर, दुबार नावे आणि मतदार यादीतील बदल लक्षात घेता ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

संविधानाच्या कलम 326 नुसार मतदार म्हणून नोंदणीसाठी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असणे आणि वयाची 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. मतदार यादीतील नोंदींची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे.

राज्यातील एकूण 9 कोटी 86 लाख 44 हजार 413 मतदारांच्या तपशीलाची खातरजमा करण्यासाठी 1 लाख 253 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) देखील सहकार्य करणार आहेत.

मोहिमेचे वेळापत्रक

          20 ते 29 जून 2026 : गणना अर्जांची छपाई व BLO प्रशिक्षण

          30 जून ते 29 जुलै 2026 : घरभेटीद्वारे गणना अर्जांचे वितरण व संकलन

          5 ऑगस्ट 2026 : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

          5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 : दावे व हरकती स्वीकारणे

          3 ऑक्टोबर 2026 पर्यंत : दावे व हरकतींचा निपटारा

          7 ऑक्टोबर 2026 : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत BLO घरोघरी जाऊन मतदारांना पूर्वभरलेले गणना पत्र (Pre-filled Enumeration Form) वितरित करतील. या पत्रात मतदाराची सध्याची माहिती तसेच 2002-04 मधील विशेष सखोल पुनरीक्षणातील माहिती उपलब्ध असेल. मतदारांना आवश्यक दुरुस्त्या करून नवीन छायाचित्र देखील सादर करता येणार आहे.

मतदारांना स्वतःची किंवा आई-वडील/आजी-आजोबा यांची 2002-04 कालावधीतील मतदार यादीतील माहिती भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून सहज मिळवता येणार आहे. ही माहिती जतन करून BLO च्या गृहभेटीदरम्यान उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गृहभेटीदरम्यान घर बंद आढळल्यास BLO किमान तीन वेळा भेट देणार आहेत. तसेच मतदारांना गणना पत्र ऑनलाईन पद्धतीनेही भरता येणार आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या मतदारांच्या नोंदींची जुळवणी होणार नाही किंवा त्रुटी आढळतील त्यांना नोटिसा देण्यात येणार असून संबंधित यादी स्थानिक स्वराज्य संस्था, तहसील कार्यालय तसेच जिल्हा व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाईल.

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, आधार कार्ड हे ओळख पुरावा म्हणून ग्राह्य असले तरी ते भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानले जाणार नाही.

या संपूर्ण प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या सक्रिय सहभागाला विशेष महत्त्व असून प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकाधिक BLA नियुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या राज्यात विविध राजकीय पक्षांनी 1 लाख 13 हजार 558 मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि दोषमुक्त करण्यासाठी तसेच सर्व पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट व्हावीत यासाठी नागरिकांनी या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी