शेगाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू
बुलढाणा,दि.3 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभाग, अंतर्गत कार्यरत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, शेगाव
(जि. बुलढाणा) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मुलींच्या वसतिगृहाची ऑनलाईन प्रवेश
प्रक्रिया सुरू झाली आहे.
वसतिगृह
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शालेय विभागातील विद्यार्थिनींसाठी प्रवेश अर्ज करण्याची
मुदत १ जून २०२६ ते ३० जून २०२६ पर्यंत असून, इयत्ता ११ वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी
१५ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.
शालेय
विभाग, कनिष्ठ महाविद्यालयीन विभाग तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांतील रिक्त जागांवर
गुणवत्ता व प्रवर्गनिहाय प्रवेश दिला जाणार आहे. वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित
जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्गीय तसेच खुल्या
प्रवर्गातील अपंग व अनाथ विद्यार्थिनींना शासनाने निर्धारित केलेल्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार
प्रवेश दिला जाणार आहे.
प्रवेशासाठी
इच्छुक विद्यार्थिनींनी www.hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन सामाजिक न्याय व
विशेष सहाय्य विभागाच्या वसतिगृह प्रवेश पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन वसतिगृह
प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त मागासवर्गीय व गरजू विद्यार्थिनींनी
या योजनेचा लाभ घ्यावा आणि कोणतीही पात्र विद्यार्थिनी प्रवेशापासून वंचित राहू नये,
असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
Comments
Post a Comment