Wednesday 23 November 2022

DIO BULDANA NEWS 23.11.2022

 मागासवर्गीय विद्यार्थ्यानी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 23 : मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षात विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यानी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीकृत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय पाठ्यक्रमाचे संलग्न असलेल्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येत आहे.

योजनांच्या लाभासाठी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणाली व सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष, नूतनीकरणाचे अर्ज नोंदणीकृत करण्यासाठी दि. 21 सप्टेंबर 2022 पासून महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष व नूतनीकरणास प्रवेशित असलेल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणीकृत करावे लागणार आहे.

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या महाडीबीटी पोर्टलवरील डॅशबोर्डवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण 2 हजार 67, इतर मागास प्रवर्ग, विजाभज व विमाप्र प्रवर्गाचे 7 हजार 423 अर्ज भरण्यात आले आहे. संपूर्ण सत्रातील सरासरीच्या तुलनेत भरलेल्या अर्जांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ आणि व्यावसायिक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालयात प्रवेशित, तसेच योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर भरून घेण्याची कार्यवाही करावी.

कार्यशाळा घेऊन याबाबतची सूचना सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात यावी. यात पात्र मागासवर्गीय विद्यार्थी महाडीबीटी प्रणालीवर आवेदनपत्र भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्राचार्यांनी घ्यावी. असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

माजी सैनिक, सशस्त्र सेना ध्वज दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. 23 : जिल्ह्यातील माजी सैनिकांचा मेळावा आणि सशस्त्र सेना ध्वज दिनाचे आयोजन दि. 7 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. सैनिक सभा मंडप येथे हा कार्यक्रम होणार आहे.

जिल्ह्यातील आजी, माजी सैनिक, माजी सैनिक, विधवा पत्नी, युद्ध विधवा, विरमाता, पिता, अवलंबित, जिल्हा सैनिक मंडळ आणि जिल्हा पोलिस संरक्षण समिती सदस्य, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष तथा पदधिकारी, शासकीय पुर्ननियुक्त माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष, पदधिकारी यांनी मेळाव्याला उपस्थित राहावे.

जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते वीरपत्नी, वीरमाता, पिता, शैक्षणिक क्षेत्रात विशेष गौरव पुरस्कारप्राप्त, तसेच ध्वजदिन वर्ष २०२१ चे उत्कृष्ट कार्य करणारे कार्यालय प्रमुख आणि कर्मचारी यांना गौरविण्यात येणार आहे. यावेळी माजी सैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यात महारेशीम अभियानास सुरवात

* 15 डिसेंबरपर्यत राबविण्यात येणार अभियान

बुलडाणादि. 23 : जिल्ह्यात महारेशीम अभियान 2023 राबविण्यात येणार आहे. महारेशीम अभियान 2023 मध्ये तुती, टसर क्षेत्र नोंदणी कार्यक्रम दि. 15 नोव्हेंबर 2022 ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादन योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येत आहे. यात लाभार्थी निवडताना अनूसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, महिला प्रधान कुटुंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान कुटुंबे, भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमाती आणि अन्य परंपरागत वन्य निवासी वन अधिकार मान्यता अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती, कृषीमाफी योजना सन 2008 नुसार अल्प भुधारक, सिमांत शेतकरी, क्षेत्र मर्यादा प्रति लाभार्थी 1 एकर शेती असणार शेतकरी निवडण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत रेशीम विकास प्रकल्पासाठी तीन वर्षामध्ये अकुशल व कुशल मजूरी देण्यात येते. यात तुती लागवड व जोपासनासाठी 682 दिवस, किटक संगोपन गृहसाठी 213 दिवस असे एकूण 895 दिवस मजुरी देण्यात येते.

नानाजी देशमुख कृषी संजिवनी (पोकरा) अंतर्गत तुती रोपवाटिका, लागवड किटक संगोपन गृह आणि संगोपन साहित्य खरेदीसाठी अनुदान दिले जाते. यात लाभार्थी निवडीताना इच्छुक लाभार्थ्याकडे मध्यम ते भारी व पाण्याची निचरा होणारी जमिन असावी, लागवड केलेल्या तुती क्षेत्रासाठी सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे. रेशीम उद्योगासाठी कुटुंबामध्ये किमान एक व्यक्ती तुती लागवड व संगोपनासाठी उपलब्ध असलेले अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या घटकासाठी पात्र आहे.

नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेत तुती रोपे तयार करणे, तुती लागवड विकास कार्यक्रमाकरीता सहाय्य, दर्जेदार कोष उत्पादनासाठी, किटक संगोपन साहित्य पुरवठा सहाय्य आधुनिक माउंटेज सहित, किटक संगोपनगृह बांधणीसाठी प्रति लाभार्थी अर्थसहाय देण्यात येते.

जिल्ह्यात रेशीम शेती उद्योगवाढीसाठी वाव आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बारमाही सिंचनाची सोय व लागत खर्च करण्याची तयारी असलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, भोंडे हॉस्पिटल समोर, मुठ्ठे ले आऊट, धाड रोड, बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा रेशीम अधिकारी सु. प्र. फडके यांनी केले आहे.

00000


No comments:

Post a Comment