Tuesday 22 November 2022

DIO BULDANA NEWS 22.11.2022

 








जिल्हास्तर शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा थाटात

बुलडाणा, दि. 22 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे 14, 17, 19 वर्षाआतील मुलांची जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा सोमवारी, दि. 21 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली.

या स्पर्धेत 14 वर्षे मुलांचे 5 संघ, 17 वर्षे मुलांचे 10 संघ, तर 19 वर्षे मुलांचे 7 अशा 22 संघानी सहभाग नोंदविला. आमदार संजय गायकवाड यांनी स्पर्धेचे उद्धघाटन केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, श्री. उबरहंडे, जीवन उबरहंडे, शेनफडराव घुबे आदी उपस्थित होते.

श्री. गायकवाड यांनी जिल्हा क्रीडा संकुलात सिन्थेटीक ट्रॅक, इनडोअर कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल तथा इतर क्रीडा सुविधा निर्मितीकरीता निधी मंजूर केला आहे. भविष्यात क्रीडा सुविधा निर्मितीकरीता निधी देण्यात येणार आहे. तसेच जानेवारीमध्ये 10 खेळांची पर्वणी आयोजित करुन लाखो रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहेत.

स्पर्धेमध्ये 14 वर्षाआतील मुलांच्या गटातून रामरक्षा इंग्लिश स्कुल, पाडळी ता. बुलडाणा विजयी, तर विवेकानंद विद्या मंदिर, हिवरा आश्रम, ता. मेहकर या संघाने उपविजेते पद पटकाविले. 17 वर्षाआतील मुलांच्या गटात विजयी संघ प्रबोधन विद्यालय, बुलडाणा, तर उपविजयी आदर्श विद्यालय, चिखली संघ. 19 वर्षाआतील मुलांच्या गटात विजयी संघ जानकीदेवी विद्यालय, देऊळगांव धनगर, ता. चिखली, द्वितीय क्रमांक विवेकानंद विद्यामंदिर, हिवरा आश्रम, ता. मेहकर या संघाने पटकाविला.

स्पर्धेमध्ये वैभव जाधव, स्वप्नील पैठणे, दिपक पवार, मंगेश एकडे, ओम पडोळ, आदित्य भालेराव, रोहण, धनंजय चव्हाण यांनी पंचाधिकारी म्हणून काम पाहिले. कार्यालयीन कामकाज रविंद्र गणेशे, तर निवड चाचणी समिती सदस्य म्हणून दिनेश गर्गे यांनी कामकाज पाहिले. क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे आदींनी पुढाकार घेतला.

00000

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश

बुलडाणा, दि. 22 : जिल्ह्यात 279 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यासाठी दि. 28 नोव्हेंबर 2022 ते दि. 3 डिसेंबर 2022 पर्यंत नामनिर्देशपत्र स्विकारण्यात येत आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे निवडणूक घोषित झालेल्या तहसिल परिसरात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित जिल्ह्यातील 279 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यासाठी ग्रामपंचायतीमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार दि. 28 नोव्हेंबर 2022 ते दि. 3 डिसेंबर 2022 पर्यंत नामनिर्देशपत्र स्विकारण्यात येत आहे. तसेच दि. 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. ग्रामपंचायतीसाठी संगणक प्रणालीतून नामनिर्देशनाची प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत असणे गरजेचे आहे. यासाठी तहसिल परिसरातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

0000

दिव्यांगांसाठी आवश्यक सहायक साहित्याचे वाटप

* बुधवार, गुरूवारी तपासणी शिबिर

       बुलडाणा, दि. 22 : जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातर्फे जिल्ह्यातील दिव्यांगांना सहाकय साहित्य साधने वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी बुधवार, दि. 23 नोव्हेंबर 2022 आणि गुरूवार, दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दिव्यांगांचे सर्वांगिण शारीरिक पुनर्वसन होण्यासाठी सर्व प्रकारचे सहायक साहित्य साधने व्हील चेअर, कर्णयंत्र, कुबड्या, वॉकर, अंधकाठी, कॅलीपर आदी उपलब्ध होणार आहे. या योजनेतून लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रातर्फे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर तपासणी शिबिर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, बसस्थानकामागे, महिला व बाल कल्याण विभागाच्याखाली, डॉ. जोशी हॉस्पीटलजवळ, बुलडाणा येथे सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राशी संपर्क साधावा. यासाठी मोबाईल क्रमांक 9422120391, 9370633361, 9822229265 हे आहेत. तपासणी शिबिरात येताना दिव्यांगांनी दिव्यांग प्रमाणपत्राची छायांकित प्रत, आधार कार्डची छायांकित प्रत, उत्पन्नाचा दाखल्याची 2 छायांकित प्रत दोन प्रतीत, तसेच दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा अपंग पुर्नवसन अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment