DIO BULDANA NEWS 10.11.2022

 






शाळा, स्मशानभूमींसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार

-पालकमंत्री गुलाबराव पाटील

*नियोजनमधून 440 कोटींचा निधी

*कामे दर्जेदार करण्यावर भर देणार

*पाऊस मोजण्याची यंत्रे वाढविणार

बुलडाणा, दि. 10 : जिल्ह्याच्या विकासामध्ये शाळा आणि स्मशानभूमी ही दोन विकासकामे जिल्हा नियोजनमधून राबविण्यात येणार आहे. ही कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत, यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक आज पार पडली. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार किरण सरनाईक, डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, मुख्य कार्य अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, जिल्हा नियोजनच्या सर्वसाधारणमधून 326 कोटी. विशेष घटक योजनेतून 14 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेतून 100 कोटी असा एकूण 440 कोटी रूपयांचा निधी यावर्षी उपलब्ध होणार आहे. विकासकामे पूर्ण करण्यासाठी पाच महिन्यांचाच कालावधी राहिलेला असल्यामुळे कामे होण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी.

जिल्ह्याचा विकास करण्यासाठी यावर्षीच्या कामांवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. विभागांना दिलेला संपूर्ण निधी खर्च व्हावा, यासाठी परिपूर्ण नियोजन करण्यात यावे. कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी कमी असला तरी ही कामे गुणवत्तापूर्ण होण्यावर भर द्यावा. जळगाव जिल्‌ह्यात शाळांना संरक्षण भिंती बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही अशाच प्रकारे नाविण्यपूर्ण कामे हाती घ्यावीत. जिल्ह्यात शाळा आणि स्मशानभूमीची कामे हाती घेण्यात यावी. केवळ एकाच बाबीवर लक्ष केंद्रीत करून खर्च केल्यास त्याचा परिणाम होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील गावे जलजीवन मिशनमध्ये घेण्यात यावी.

पावसाचे मोजमाप योग्य होत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास अडचण होत आहे. ही बाब लक्षात घेता पावसाचे मोजमाप करणारी यंत्रणा सक्षम करण्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून यातून पाऊस मोजमाप करणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. याची देखभाल आणि दुरूस्तीही योग्यप्रकारे करण्यात येणार आहे.

गेल्या काळात कोविडवरील उपाययोजनांमध्ये प्रयोगशाळा, ऑक्सीजन प्लाँट, रूग्णवाहिका आदीची व्यवस्था करण्यात आली. येत्या काळात नाममात्र दरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे उभारण्यात आलेली ही यंत्रणा सुरू राहून नागरिकांचा सुविधा होईल.

लंपी आजारामुळे जनावरे दगावली असल्यास शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत व्हावी, यासाठी पंचनाम्याची गती वाढविण्यात यावी. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत आणि शेतीचे नुकसान झाल्यास पिक विम्याची रक्कम मिळण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

शहिद कैलास पवारच्या कुटुंबियांना एक कोटींचा धनादेश

बैठकीच्या सुरुवातीला द्रास सेक्टरमध्ये शहिद झालेले चिखली येथील कैलास पवार यांच्या विरमाता उज्जला पवार आणि विरपिता भारत पवार यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री श्री. पाटिल यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

पाणी आरक्षण कायम

          जिल्ह्यातील विविध प्रकल्पामधील पिण्याच्या पाण्याचे आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये खडकपूर्णामधून पूर्णा नदीमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. याबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सिंथेटीक ट्रॅक

          जिल्ह्यातील खेळाडूंच्या सुविधेसाठी सिंथेटीक ट्रॅक निर्माण करण्यासाठी जिल्हा क्रीडा समितीची मंजुरी देण्यात आली. कबड्डी, खो-खो, कुस्ती यासाठी तालुकास्तरावर सिंथेटीक ट्रॅक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

00000




विविध विकास कामांना पालकमंत्र्यांच्या भेटी

बुलडाणा, दि. १० : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जिल्ह्यातील विविध विकास कामांना भेटी देऊन पाहणी केली. पारखेड, लोणी काळे, जानेफळ येथे भेटी देऊन पाणीपुरवठा योजनांची माहिती घेतली. यावेळी आमदार डॉ. संजय रायमुलकर उपस्थित होते.

श्री. पाटील यांनी पारखेड येथील पाणीपुरवठा योजनेच्या नियोजित जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. लोणी काळे येथे सात गावांची योजना मंजूर झाली असून यासाठी 14 कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे सांगितले. ही योजना टाकळी आणि कोराडी धरणावरून पाणी पुरवठ्यासाठी घेण्यात येणार आहे. यामुळे सात गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. येत्या दोन वर्षात हे काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

जानेफळ येथील ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांशी संवाद साधताना श्री. पाटील म्हणाले, जानेफळ गावासाठी 13 कोटी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. कळंबेश्वर जानेफळ ही योजना मंजूर करण्यात आली आहे. ही योजना सौर उर्जेवर चालणारी असणार आहे. तसेच जानेफळ शहरासाठी वळण रस्ता ही मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या