Monday 21 November 2022

DIO BULDANA NEWS 21.11.2022

 


वैध देशी मद्य विक्रीवर राज्य उत्पादन शुल्कचा छापा

*दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

        बुलडाणा, दि. 21 : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सावखेड  भोई, ता. देऊळगावराजा येथे अवैध देशी मद्य विक्री करणाऱ्या एकावर शनिवारी, दि. 19 नोव्हेंबर 2022 रोजी कारवाई केली. यात एका व्यक्तीविरूद्ध गुन्हा नोंद करून एका वाहनासह दोन लाख 3 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चिखली येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आणि दुय्यम ‍निरीक्षक यांच्या पथकाने सावखेड  भोई, ता. देऊळगावराजा येथे एक वारस गुन्हा नोंदवून कारवाई केली. यात एक आरोपी प्रवीण वसंता  हांडे, रा. देऊळगाव राजा याच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली. कारवाईत एक  इंडिका कार क्रमांक एमएच 42  एच 4427 आणि जालना जिल्ह्यातील 138.6 लिटर देशी मद्यासह एकुण 2 लाख 3 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत निरीक्षक जी. आर. गावंडे, दुय्यम निरीक्षक आर. ई. सोनुने, एस. डी. चव्हाण यांच्यासह एस. डी. जाधव, श्री. निकाळजे, श्री. अवचार यांनी सहभाग घेतला.

          राज्य उत्पादन शुल्क विभागार्फत अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 1 जानेवारी 2022 ते दि. 21 नोव्हेंबर 2022 या कालावधीत एकुण 1 हजार 137 गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यात 1 हजार 42 वारस गुन्ह्यासह 1 हजार 83 आरोपी आणि 74 वाहनासह एकुण 1 कोटी 41 लाख 12 हजार 164 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच नोव्हेंबर 2022 मध्ये 77 गुन्हे नोंदवून 73 वारस गुन्ह्यासह 8 वाहने जप्त करण्यात आली आहे. यात 77 आरोपीसह 10 लाख 56 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचा मद्यसेवन परवाना प्राप्त करुन केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी करून सेवन करावे. वैध मद्य ‍विक्री करणाऱ्या ढाबामालक आणि त्याठिकाणी अवैध मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. ढाबा मालकाला 40 हजार रूपये आणि मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येकी 5 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

आतापर्यंत हॉटेल विघ्नहर्ता भानखेड शिवार, हॉटेल रायबा ढाबा खांडवी, ता. जळगाव जामोद, तसेच हॉटेल साईराज आसलगाव, ता. जळगाव जामोद, हॉटेल गारवा ढाबा, वरवंड, ता. जि. बुलडाणा, हॉटेल विराट ढाबा, बोराखेडी, ता. मोताळा, हॉटेल काकाजी ढाबा, पेठ, ता. चिखली, हॉटेल सत्यम ढाबा, नवघरे शिवार, ता. चिखली, हॉटेल न्यू मुंबई स्वाद ढाबा, नांदुरा, ता. नांदुरा, हॉटेल भारत, भाजी मंडी, लोणार, हॉटेल श्रीयोग, मेहकर फाटा, ता. चिखली, हॉटेल सुरज धाबा, मलकापूर पांग्रा, ता. सिंदखेड राजा, हॉटेल राजधानी, लोणार, हॉटेल अन्नदाता, मेहकर, हॉटेल पुर्णामाय ढाबा, मानेगाव शिवार, ता. जळगाव जामोद या ढाब्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे.

आपल्या परिसरात अवैध मद्यविक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800833333 वर किंवा व्हॉटॲप क्रमांक 8422001133 वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी. जिल्ह्यातील किरकोळ व ठोक मद्य अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्तीमध्ये बनावट मद्य आढळून आल्यास त्यांची अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येणार आहे. तसेच मद्य बाळगताना मद्य सेवन, मद्य वाहतूक करताना अथवा मद्य विक्री करताना परवाना असणे आवश्यक आहे. तसेच ढाबा मालकांनी आपल्या जागेचा वापर अवैध मद्यसेवनासाठी दिल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी कळविले आहे.

000000 








जिल्हास्तर शालेय बुद्धीबळ स्पर्धा उत्साहात

बुलडाणा, दि. 21 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दि. 18 ते 19 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हास्तर शालेय 14, 17, 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या बुद्धीबळ स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात उत्साहात पार पडल्या.

बुद्धीबळ स्पर्धेचे उद्घाटन तहसिलदार रुपेश खंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. खेळाडूंनी खेळाडू वृत्ती बाळगून आणि कौशल्यपणाला लावून खेळ खेळावा. खेळाडूंनी उच्च पातळीचा खेळ दाखवून देशाचे, राज्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन श्री. खंडारे यांनी केले.

या स्पर्धेत जिल्ह्यातून 180 खेळाडू उपस्थित होते. जिल्हास्तर मुले 14, 17, 19 वर्षे वयोगटाच्या स्पर्धा पार पडल्या. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर उपस्थित होते. अनिल इंगळे सूत्रसंचालन करून आभार मानले. स्पर्धेसाठी मुख्य पंच अमोल इंगळे, प्रसाद पत्की, विष्णू राजगुरु आणि विश्वजीत लहाने, आर्बिटर पंचाधिकारी म्हणून गोपाल जाधव यांनी कामगिरी पार पाडली.

सदर स्पर्धेकरीता वरिष्ठ लिपीक विजय बोदडे, व्यवस्थापक सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे, सुहास राऊत, ओम राऊत यांनी पुढाकार घेतला.

स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे. 14 वर्षे मुले इशांत संदीप घट्टे (बुलडाणा) प्रथम, देवेश सुभाषसिंग चव्हाण (खामगाव) द्वितीय, सोहम सुरेश चव्हाण (मेहकर) तृतीय, राज रामचंद्र पवार (चिखली) चतुर्थ, अश्वजित प्रमोद वानखडे (खामगाव) पाचवा क्रमांक पटकाविला. 17 वर्षे मुले लेख राजेश गोयनका (मलकापूर) प्रथम, आर्यन किशोर मलेकर (बुलडाणा) द्वितीय, अचल अजय जैन (खामगाव) तृतीय, आदित्यनारायण मोहन भादुपोता (मेहकर) चतुर्थ, आयुष गजानन कवडकार (शेगाव) पाचवा क्रमांक पटकाविला. 19 वर्षे मुले यश अजय वाघ (मलकापूर) प्रथम, विनित नितीन तोलंबे (बुलडाणा) द्वितीय, कार्तिक अजय चिपडे (बुलडाणा) तृतीय, गणेश रमेश तेलकर (नांदुरा) चतुर्थ, देवेश दयानंद कुबडे (शेगाव) पाचवा क्रमांक पटकाविला.

00000




जिल्हास्तर शालेय वूशू क्रीडा स्पर्धा संपन्न

बुलडाणा, दि. 21 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि बुलडाणा जिल्हा वूशू असोसिएशनच्या वतीने दि. 19 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हास्तर शालेय 14, 17, 19 वर्षे मुलामुलींच्या वूशू स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात घेण्यात आल्या.

क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर वाघ प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी खेळाडूंना 5 टक्के आरक्षणाची माहिती देण्यात आली. स्पर्धेसाठी वूशू संघटनेचे पदाधिकारी आणि पंच म्हणून अरविंद अंबुसकर, अनिल अंबुसकर, रोशनी अंबुसकर, नियती अंबुसकर, श्वेता अंबुसकर, क्रीडा शिक्षक विशाल सपकाळ उपस्थित होते.

राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले. सदर स्पर्धेकरीता वरिष्ठ लिपीक विजय बोदडे, व्यवस्थापक सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे, सुहास राऊत यांनी पुढाकार घेतला.

00000

No comments:

Post a Comment