Friday 2 July 2021

DIO BULDANA NEWS 2.7.2021

 खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू

  • शेतकऱ्यांनी 15 जुलै 2021 पर्यंत योजनेत सहभाग घ्यावा
  • कापूस व सोयाबिनला 45 हजार रूपये विमा संरक्षण
  • प्रति हेक्टरी कापसाला 2250, तर सोयाबीनला 900 रूपये हप्ता
  • जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त

बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2021 साठी लागू करण्यात आली आहे. ही योजना खरीप हंगामातील अधिसुचीत पिकांकरीता लागू करण्यात आली असून या योजनेचा खरीप हंगामातील शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक 15 जुलै 2021 आहे. या योजनेकरीता खरीप ज्वारी, सोयाबीन, मुग, उडीद, तुर, कापूस व मका पिके अधिसुचीत करण्यात आली आहे.

     शेतकऱ्यांना शेतमालच्या अनिश्चित उत्पन्नाची नुकसान भरपाई सामुहिक स्वरूपात मिळावी, या उद्देशाने ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसुचित मुख्य पिकांची अधिसुचीत क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी, लावणी न झाल्यास विमा संरक्षण देय राहणार आहे. सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ, आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षीत उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसुचीत क्षेत्र स्तरावर विमा संरक्षण देय राहणार आहे. टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाते. अधिसुचीत विमा क्षेत्र घटकातील पिक कापणी प्रयोगावरून उपलब्ध झालेल्या सरासरी उत्पन्नाची तुलना उंबरठा उत्पन्नाशी करून नुकसान भरपाई निश्चित केली जाते. जर सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नपेक्षा कमी आले, तर नुकसान भरपाई देय असणार आहे.

गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षीत क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, विज कोसळल्यामुळे लागणाी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचीत पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधुन सुकवणी करणे आवश्यक असते. अशा कापणी / काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचीत पिकाचे काढाीनंतर दोन आठवड्यांच्या आत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे. योजनेत   सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार व कर्जदार शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत. या योजनेसाठी जिल्ह्याकरीता रिलायन्स इन्शुरन्स कंपनी लि. या कंपनीला नियुक्त करण्यात आले आहे.

  शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता येण्यासाठी गावपातळीवर आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्रावर अर्ज भरून  योजनेत सहभागी होता येणार आहे. तरी शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण मिळणेस्तव प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 15 जुलै 2021 पर्यंत सहभागी व्हावे. काढणी पश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखमी अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबरनुसार बाधीत पीक व बाधीत क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत याबबतची सुचना क्रॉप इन्शुरन्स ॲप,  संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक, बँक,  कृषि व महसुल विभाग यांना कळवावे.  तसेच संबंधित रिसायंन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या rgcl.pmfby@relianceada.com या ईमेलवर,  टोल फ्री क्रं 18001024088 या क्रमांकावर कळविण्यात यावे. नुकसान कळविताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक आहे.

   योजनेत सहभागासाठी नजीकच्या उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एन. एम नाईक यांचेवतीने करण्यात येत आहे.

असा आहे विम्याचा हप्ता व संरक्षीत रक्कम

पिक विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता रक्कम प्रति हेक्टर खालीलप्रमाणे – खरीप ज्वारी : विमा संरक्षीत रक्कम 25 हजार, हप्ता 500 रूपये (प्रति हेक्टर), मका : विमा संरक्षीत रक्कम 30 हजार, हप्ता 600 रूपये, तुर : विमा संरक्षीत रक्कम 35 हजार, हप्ता 700 रूपये, मुग : विमा संरक्षीत रक्कम 20 हजार, हप्ता 400 रूपये, उडीद : विमा संरक्षीत रक्कम 20 हजार, हप्ता 400 रूपये, सोयाबीन : विमा संरक्षीत रक्कम 45 हजार, हप्ता 900 रूपये आणि कापूस पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 45 हजार, हप्ता 2250 रूपये राहणार आहे.

कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास घोषणापत्र द्यावे

कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा किंवा न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकरी योजनेत सहभागासाठी इच्छूक नसल्यास तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या आत 7 दिवस आधीपर्यंत देणे आवश्यक आहे. जे शेतकरी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत, त्या सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता कपात करून योजनेत सहभागी करून घेण्याबाबत बँकेमार्फत कार्यवाही केल्या जाणार आहे.

*******

                   दुध प्रकिया व पशुसंवर्धन उद्योगांना 90 टक्के कर्ज; 3 टक्के व्याजात सूट

  • पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना
  • लाभ घेण्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ठाकरे यांचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : सन 2020-21 वर्षापासून केंद्र शासनाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना या नवीन योजनेस मंजुरी दिली आहे. सन 2021-22 या वर्षात योजनेसाठी 15 हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. योजनेच्या मार्गदर्शक सूचना, योजनेसंदर्भात वांरवार उपस्थित होणारी प्रश्नोत्तरे, योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचा अर्जाचा नमुना आणि यादी आदी माहिती http://dahd.nic.in/ahdf या केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी संकेतस्थळावर तसेच राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडील पोर्टलवर उपलब्ध आहे. योजनेतंर्गत दूध प्रक्रिया व पशुसंवर्धन क्षेत्रात आईस्क्रीम, चीज निर्मिती, दूध पाश्चरायझेशन, दूध पावडर, मांस निर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती व प्रक्रिया, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना 90 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्याजदरांमध्ये तीन टक्के सूट देण्यात येणार आहे.

    या सोबतच लिंग निश्चिती वीर्यमात्रा निर्मिती,  बाह्य फलन केंद्र (आयव्हीएफ), पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातींचे संवर्धन या बाबींचा समावेश केलेला आहे. जिल्ह्यातील व्यक्तीगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्या आदींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी http:// dahd.nic.in/ahdf या केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी संकेतस्थळावर तसेच राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडील पोर्टलवर  ऑनलाईन प्रस्ताव सादर करावे, तरी इच्छूक शेतकरी उत्पादक संस्था, व्यक्तीगत व्यावसायिक, खाजगी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्या आदींनी ऑनलाईन प्रस्ताव सदर संकेतस्थळावर पाठवावे व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. के. एम ठाकरे यांनी केले आहे.

*******

कोरोना अलर्ट : प्राप्त 2169 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 89 पॉझिटिव्ह

  • 32 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.2 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2258 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2169 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 89 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 71 व रॅपीड टेस्टमधील 18 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 440 तर रॅपिड टेस्टमधील 1729 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2169 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 7, शेगांव तालुका : येऊलखेड 2, आडसूळ 1, दे. राजा शहर : 4, दे. राजा तालुका : पिंप्री आंधळे 1, चिंचखेड 1, मेहकर शहर : 1, मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका : उमाळी 2,  खामगांव शहर : 1, खामगांव तालुका : किन्ही महादेव 1,लोखंडा 1, गोंधनापूर 1, अंत्रज 1, सुटाळा 2, नांदुरा शहर : 1,  जळगांव जामोद तालुका : सावरगांव 2, वडगांव गड 1, खेर्डा बु 1, जामोद 1, बोराळा बु 2, सुनगांव 1, मांडवा 1, माहुली 4, सिं. राजा शहर : 1, सिं. राजा तालुका : कंडारी 1, चिंचोली 1, राहेरी 1, रूमणा 1, कि. राजा 17, चांगेफळ 1, दिग्रस 1, उमरद 2, निमगांव वायाळ 3, हिवरखेड 3, पि. लेंडी 1, दुसरबीड 4, संग्रामपूर तालुका : भोन 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : भालगांव 1, नायगांव 6  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 89 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 32 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 578526 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86010 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86010 आहे.

  आज रोजी 1713 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 578526 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86826 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86010 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 153 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 663 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*******

कृषि दिनानिमित्त तालुकास्तरीय पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान

  • बुलडाणा पंचायत समिती सभागृहात कार्यक्रम

बुलडाणा,(जिमाका) दि.2 :कृषि दिनी 1 जुलै रोजी पंचायत समिती, बुलडाणा यांच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. तसेच तालुका स्तरीय रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त शेतकरी श्रीकांत आत्माराम पवार रा. पाडळी, द्वितीय क्रमांक प्राप्त शेतकरी विजय कचरू जाधव रा. कोलवड व तृतीय क्रमांक प्राप्त शेतकरी सतिश पांडुरंग उबाळे रा. बोधेगांव यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानीत करण्यात आले.

    याप्रसंगी प्रथम क्रमांक प्राप्त शेतकरी श्रीकांत पवार यांनी पिक उत्पादन वाढीसाठी केलेले नियोजन व आधुनिक शेती बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती सौ. उषाताई पंडीतराव चाटे, प्रमुख उपस्थितीत उपसभापती सौ. अरूणा श्रीकांत पवार, गटविकास अधिकारी श्री. सावळे, सहा. गटविकास अधिकारी श्री. चव्हाण, तालुका कृषि अधिकारी श्री. मेरत, कृषि अधिकारी श्री. इंगळे होते. सदर कार्यक्रमात  पिक स्पर्धा व शेतकऱ्यांचे पीक उत्पादन वाढीबाबत व कृषाी संजीवनी सप्ताहाबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. संचलन कृषी विस्तार अधिकारी पुरूषोत्तम काकडे यांनी तर आभार प्रदर्शन कृषी विस्तार अधिकारी अनंत जाधव यांनी केले, असे सहा. गट विकास अधिकारी, पं. स बुलडाणा यांनी कळविले आहे.

******

 

 

No comments:

Post a Comment