Thursday 22 July 2021

DIO BULDANA NEWS 22.7.2021

 


कोरोना अलर्ट : प्राप्त 838 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 4 पॉझिटिव्ह

  • 05 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि. 22 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 842 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 838 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 4 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 3 व रॅपीड टेस्टमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 562 तर रॅपिड टेस्टमधील 276 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 838 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर : 1,  चिखली तालुका : खोर 1, मोताळा तालुका : वाघजळ 1, बुलडाणा तालुका : दहीद 1,  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 04 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 05 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 624139 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86539 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86539 आहे.

  आज रोजी 895 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 624139 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87227 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86539 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 19 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 669 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. 

****

जिल्ह्यात पावसाची संततधार…!

  • सरासरी 36.6 मि.मी पावसाची नोंद
  • लोणार तालुक्यात अतिवृष्टी ; 77.4 मि.मी पाऊस

बुलडाणा,(जिमाका) दि.22 : जिल्ह्यात पर्जन्यराजाने चांगलीच मनसोक्त बरसात केली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून सुर्यदर्शन होत नसून सारखी पावसाची रिपरिप सुरू आहे. कुठे मध्यम तर कुठे तुरळक स्वरूपात बरसणारा पाऊस धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ करीत आहे. जिल्ह्यात लोणार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात अली असून जिल्ह्यातील सर्वात जास्त 77.4 मि.मी पाऊस झाला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 36.6 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे.

  जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची बुलडाणा : 35.5 मि.मी (326.3), चिखली : 41.4 (414.6), दे.राजा : 42.5 (325.2, सिं. राजा : 55.3 (483), लोणार : 77.4 (444.5), मेहकर : 50.3 (549.6), खामगांव : 26.7 (347.2), शेगांव : 43.3 (165.9), मलकापूर : 14.1 (174.2), नांदुरा : 12.8 (210), मोताळा : 15.9 (225.2), संग्रामपूर : 32.3 (292.6), जळगांव जामोद : 28.7 (143.3) जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4101.6 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 315.5 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 143.3 मि.मी पावसाची नोंद जळगांव जामोद तालुक्यात झाली आहे.

जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी – नळगंगा : 19.69 दलघमी (28.41), पेनटाकळी :19.494 दलघमी (32.49), खडकपूर्णा :6.450 दलघमी (6.90), पलढग : 1.17 दलघमी (15.63), ज्ञानगंगा : 23.90 दलघमी (70.44), मन : 21.84 दलघमी (59.31), कोराडी : 15.20 दलघमी (100), मस : 7.35 दलघमी (48.88), तोरणा : 2.68 दलघमी (34.01) व उतावळी : 11.92 दलघमी (60.31).

100 टक्के पाणीसाठा असलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्पांची माहिती

जिल्ह्यात दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे 6 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहे. ते पुढीलप्रमाणे : टाकळी ता. खामगांव, निमखेड ता. खामगांव, शिवणी जाट ता. लोणार, बोरखेडी ता. लोणार,  गांधारी ता. लोणार, गारखेड ता. सिं. राजा,

*****

खरीप हंगाम 2021 साठी पिक स्पर्धा जाहीर

  • शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

बुलडाणा,(जिमाका) दि.22 : राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत खरीप हंगामात पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. 

  या खरीप हंगामापासून पुर्वीच्या पिकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करुन नव्याने स्पर्धा राबविण्यात येत आहे.  पिक स्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभुत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी ), तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल असे एकूण 11 पिके आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 आहे. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या  सर्वसाधारण गटासाठी 05 व आदिवासी गटासाठी 04 आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम रुपये 300 अर्ज असणार आहे.

स्पर्धेत दाखल करण्याची तारीख व बक्षीस

मूग व  उडीद पीकसाठी 31 जुलै, भात, ज्वारी,बाजरी, मका, नाचणी (रागी ), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल पिकासाठी 31 ऑगस्ट असणार आहे. पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, 7/12, 8अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून कृषि कार्यालयात देण्यात यावे.  

  पिक स्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिस स्वरुप : स्पर्धा पातळी सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस तालुका पातळी प्रथम 5 हजार रूपये, द्वितीय 3 हजार रूपये व तृतीय बक्षीस 2 हजार रूपये असणार आहे. जिल्हा पातळीवर प्रथम पारितोषिक 10 हजार रूपये, द्वितीय 7 हजार व तृतीय 5 हजार रूपये आहे.  विभाग पातळीवर प्रथम 25 हजार रूपये,  20 हजार रूपये व  15 हजार रूपये बक्षीस असणार आहे. तसचे राज्य पातळीवर प्रथम बक्षीस 50 हजार, द्वितीय 40 हजार रूपये व तृतीय बक्षीस 30 हजार रूपये असणार आहे.

     पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक / कृषी पर्यवेक्षक / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. रब्बी हंगाम 2020 मध्ये पिकस्पर्धेसाठी राज्यातील शेतक-यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याप्रमाणे खरीप हंगाम 2021 साठी देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकांसाठी 31 जुलै  पुर्वी तर इतर खरीप पिकांसाठी 31 ऑगस्ट पुर्वी अर्ज सादर करुन पिक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन  कृषि विभागाचेवतीने करण्यात आले आहे.

********

--

No comments:

Post a Comment