Thursday 1 July 2021

DIO BULDANA NEWS 1.7.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 2577 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 62 पॉझिटिव्ह

  • 44 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.1 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2639 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2577 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 62 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 56 व रॅपीड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 682 तर रॅपिड टेस्टमधील 1895 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2577 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 1, बुलडाणा शहर : 3, बुलडाणा तालुका : सागवण 1, जळगांव जामोद तालुका : बोराळा 2, निंभोरा 1, सताळी 1, आसलगांव 1,  टाकळी पारस्कर 1, मोताळा तालुका : टाकळी 1, महाळुंगी 1, पुन्हई 1, नांदुरा तालुका : सानपुडी 1, मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका : उमाळी 1, लासुरा 1,  दे. राजा शहर : 9, दे. राजा तालुका : कुंभारी 1, भिवगण 5, किन्ही पवार 12, गोळेगांव 1, पिंपळगांव चि 1, मंडपगांव 1,  लोणार तालुका : पिंपळनेर 2, चिखली शहर : 3,  चिखली तालुका : मुंगसरी 1, बेराळा 1, सवणा 1, सावरगांव 1, हिवरा खु 1, मनुबाई 1, अमडापूर 1, उत्रादा 1, परजिल्हा  बाळापूर 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 62 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 44 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 576357 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85978 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  85978 आहे.

  आज रोजी 1576 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 576357 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86737 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85978 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 96 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 663 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*******

 

दिव्यांग बांधवांना ‘ई-ट्रायसायकल फिरते विक्री केंद्रा’चे वितरण

  • व्यवसायासाठी साधने देवून रोजगार निर्मिती होणार
  • पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव यांच्याहस्ते प्रतिनिधीक स्वरूपात चावीचे वितरण

बुलडाणा,(जिमाका) दि.1 : महिला आर्थिक विकास महामंडळातंर्गत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 अंतर्गत मंजूर दिव्यांग महिला व कुटुंबीय सदस्यांकरिता " ई-ट्रायसायकल फिरते विक्री केंद्र" चे वितरण आज 1 जुलै रोजी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे व केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांचेहस्ते करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात ट्राय साकलच्या चावीचे वितरण करण्यात आले. तसेच फित कापून फिरत्या विक्री केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी जि.प अध्यक्ष मनिषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सुमेध तायडे आदी उपस्थित होते.

   महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्रा द्वारे बचत गटातील दिव्यांग लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर सदर ट्राय सायकलचे वितरण करण्यात आले. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात एकूण 162 दिव्यांग व्यक्तींना रोजगार निर्मित होणार असून महाराष्ट्र राज्यात प्रथमच अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणाद्वारे या उपक्रमाला 1 कोटी 11 हजार 600 रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. सदर उपक्रमामुळे या दिव्यांग लाभार्थींना रोजगार निर्मिती होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. रोजगार निर्मितीसह उत्पन्नात वाढ या प्रमुख उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. किमान 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या लाभार्थींना यात प्राधान्य देण्यात आलेले आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा समन्वयक सुमेध तायडे यांनी प्रास्ताविकात दिली.

****

रब्बी हंगामातील पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार

  • पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव यांची उपस्थिती

बुलडाणा,(जिमाका) दि.1 : कृषि दिनामित्ताने रब्बी हंगाम 2020-21 मधील पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे व केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांचेहस्ते करण्यात आला. यावेळी .प अध्यक्ष मनिषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत, जि.प कृषि व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, कृषि विकास अ‍धिकारी अनिसा महाबळे आदी उपस्थित होते.  

  रब्बी हंगामात पीक स्पर्धा आदिवासी गट व सर्वसाधारण गट अशा दोन गटात घेण्यात आली. हरभरा व गहू अशा दोन पीकांमध्ये जास्त हेक्टरी उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना यावेळी जिल्हा व तालुका स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देवून सन्मानीत करण्यात आले. आदिवासी गटात हरभरा पिकासाठी हेक्टरी 39 क्विंटल उत्पादन घेणारे टिटवी ता. लोणार येथील शेतकरी संजय ज्ञानेश्वर चिभडे व  हेक्टरी 32 क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी भगवान आश्रुजी कोकाडे यांना अनुक्रमे विभाग स्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांकाने सन्मानीत करण्यात आले. तसेच सर्वसाधारण गटात हरभरा पिकासाठी  विमलताई विजयराव टापरे ता. जळगांव जामोद प्रथम,  विठ्ठल पंढरी पोफळे ता. लोणार द्वितीय व विजयकुमार पुंजाजी अंभोरे ता. चिखली यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यचप्रमाणे सर्वधारण गटात मेहकर तालुक्यातून हरभरा पिकामध्ये हेक्टरी 30 क्विंटल 10 किलो उत्पादन घेतल्यामुळे खासदार प्रतापराव जाधव यांचा प्रथम क्रमांक आला. त्यामुळे त्यांनाही प्रशस्तीपत्र पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते देण्यात आले.

  त्याचप्रमाणे आदिवासी गटात जिल्हास्तरावर हरभरा पिकासाठी वच्छला नारायण कोकाटे ता. लोणार प्रथम, लक्ष्मण महादु घाटे ता. लोणार द्वितीय व गोदावरी भगवान कोकाटे ता. लोणार यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. जिल्हास्तरीय सर्वसाधारण गटात गहू पिकासाठी वसुधा विजय चांगडे ता. मेहकर, रोहीत शरद ठाकरे ता. मेहकर व दिपाली गजानन फराटे ता. मेहकर यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यांचाही  गौरव यावेळी करण्यात आला. यावेळी पीक स्पर्धेविषयी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी माहिती दिली.

*****

गुटखा माफियांच्या मुसक्या आवळा

-         पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्रजी शिंगणे

  • अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे दिले आदेश

बुलडाणा,(जिमाका) दि.1 : आरोग्यास हानिकारक असलेल्या गुटखा विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातलेली असतांना देखील मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून गुटखा विक्री करणाऱ्या गुटखा माफियांच्या मुसक्या आवळा अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

  स्थानिक विश्राम गृह येथे अमरावती विभागाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अमरावती विभागाचे सह आयुक्त अन्न एस जी अण्णापुरे , अकोल्याचे सहाय्यक आयुक्त एस डी तेरकर, अमरावती व यवतमाळचे सहाय्यक आयुक्त  के आर जयपूरकर, बुलडाणा सहायक आयुक्त एस डी केदारे यांच्यासह विभागातील सर्व अन्न सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.

  यावेळी अमरावती विभागात केलेल्या कारवायांचा आढावा मंत्री महोदयांनी घेतला.  त्यानंतर अमरावती, अकोला, बुलडाणा येथील गुटखा माफिया गुटख्याची तस्करी करून गुटख्याची मोठया प्रमाणात विक्री करत आहेत. मध्यंतरी कोरोनामुळे याकडे विभागाचे दुर्लक्ष झाले. परंतु आता याकडे दुर्लक्ष होता कामा नये, गुटखा माफियांच्या मुसक्या आवळा, अशा सूचना मंत्री श्री. शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

     तसेच जनतेला हायजेनिक अन्न पदार्थ मिळावे यासाठी अन्न पदार्थ तपासण्याचे प्रमाण वाढविण्यात यावे. खवा, मिठाई यामध्ये प्रामुख्याने भेसळ होत असते त्याची देखील तपासणी करण्यात यावी. काही व्यावसायिक खाद्यपदार्थ तळण्यासाठी एकाच तेलाचा वारंवार वापर करतात. सदर तेलामध्ये तळलेले खाद्यपदार्थ खाल्यास ते शरीरासाठी हानिकारक आहेत. त्यामुळे एकाच तेलाचा वारंवार वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाही करावी. किराणा दुकानाच्या देखील नियमित तपासण्या कराव्या. यामध्ये कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर यापुढे कारवाही करण्यात येईल असा इशारा मंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी दिला.

*****

 

शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतून शेवटच्या घटकाचा विकास साधावा

- खासदार प्रतापराव जाधव

दिशा समिती बैठक

* बिहार पॅटर्नप्रमाणे वृक्षलावगड करावी

* जल जीवन मिशनची अपूर्ण कामे पूर्ण करावी

* मनरेगा कामांमध्ये ‘पाहिजे ते काम’ या शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करावी

बुलडाणा,(जिमाका) दि.1 : केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वीत आहेत. तसेच बऱ्याच राज्य शासनाच्या योजनांमध्ये केंद्राचा हिस्सा आहे. तरी अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी केंद्रीय योजनांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास साधावा, अशा सूचना केंद्रीय ग्रामीण विकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी आज दिल्या.

  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात दिशा (जिल्हा विकास समन्वयन व सनियंत्रण समिती) समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना खासदार श्री. जाधव बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जि.प अध्यक्ष मनिषा पवार, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, बुलडाणा कृउबास सभापती जालींधर बुधवत,  निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते उपस्थित होते. तसेच सभागृहात कृषि सभापती राजेंद्र पळसकर आदींसह लोकप्रतिनिधी, विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

   रस्ता निर्मिती करताना सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सुचना करीत खासदार म्हणाले, रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. दर्जाबाबत कुठलीही तडजोड चालणार नाही. चिखली– मेहकर रस्ता कामामध्ये लव्हाळा फाटा येथील उड्डाण पुलावर अपघात होण्याची शक्यता असणारे काम दुरूस्त करावे. त्यासाठी भूसंपादनाची आवश्यकता असल्यास करून घ्यावे. नागरिकांच्या गरजेनुसार व मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावर बस थांबे बनवावे. तसेच काम सुरू असलेल्या कामे विहीत कालावधीत पूर्ण करून घ्यावी. रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर त्याची पाहणी करावी, कुठे दुरूस्ती करायची असल्यास ती करून घ्यावी, त्यानंतरच कंत्राटदाराला 100 टक्के काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र द्यावे.

    ते पुढे म्हणाले, जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे दर्जेदार करावी. प्रादेशिक पाणीपुरवठा योजना करताना सर्व समाविष्ट गावांना पाणी मिळेल, याची खात्री करावी. योजनेचे पाणी वितरणाच्या कालमर्यादेचे पालन करावे, योजनेमधून निश्चित केलेल्या कालमर्यादेपर्यंत पाणी पुरवठा करण्यात यावा. खारपाणपट्टयातील उर्वरित गावांसाठी एकत्र प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करावी. निमखेडी 9 गावे, तिव्हाण 10 गावे व चिंचोली 30 गावे पाणी पुरवठा योजना एकत्र करावी. त्यामुळे वेळ व खर्चामध्ये बचत होईल. खारपाण पट्टयातील खारे पाणी असलेले एकही गाव योजनेतून सोडू नये. राष्ट्रीय आरोग्य मिशन मध्ये सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची कामे दर्जेदार करावी. या कामांच्या तक्रारी यायला नको. जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत शासनाच्या नवीन धोरणानुसार पाहिजे ते काम संकल्पनेची अंमलबजावणी करावी. यासठी गाव स्तरावर माहिती द्यावी. वृक्षलागवडीची मनरेगा अंतर्गत होणाऱ्यया कामांमध्ये बिहार पॅटर्नचा अचलंब करावा. तसेच या वृक्षांमध्ये फळझाडांचा समावेश करावा. कुशल कामांमध्ये गावांमध्ये मोठी कामे घेण्यात यावी.    

    पीक विमा योजनेमध्ये पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पन्नानुसार जोखीम स्तर ठरवून विमा मंजूर करण्याच्या सूचना देत खासदार श्री. जाधव म्हणाले, पिक विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना देण्यासाठी पाठपुरवा करावा. फळपीक विमा योजनेत पपई, सिताफळ या फळपिकांचा समावेश करावा. मसाला पिकांनाही विम्याचे संरक्षण देण्यात यावे. शेतातील शेडनेट, पॉली हाऊस यांना देखील विमा संरक्षण प्राप्त करून द्यावे. शेततळे जमिनीच्या प्रकार व परिस्थितीनुसार अधिक खेालीचे घेण्यासाठी परवानगी द्यावी. त्यामुळे कमी जागेत चांगली पाणी साठवण क्षमता असणारे शेततळे तयार होतील. पीक कर्ज वितरणामध्ये पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा. नियमित परतफेड करणाऱ्या व 1 लक्ष रूपये कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना 6 टक्के व्याज माफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. शासनाने दिलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात टाकावे, जेणेकरून पुढील वर्षात व्याज सवलतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल. पीक कर्जासाठी कुणाच्या कर्जाचा साक्षीदार असलेल्या शेतकऱ्याचा सीबील बघू नये. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुले पुर्ण करावी .जागा नसलेल्या लाभार्थ्यांना जागेसाठी मदत करावी. यावेळी संबंधित विभागाच्या विभागप्रमुखांनी योजनेची माहिती दिली. बैठकीला पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

सांसद आदर्श ग्राम योजना

सांसद आदर्श ग्राम योजनेत घाटबोरी ता. मेहकर, घाटपुरी ता. खामगांव, पिंप्री गवळी ता. मोताळा, शेलूद ता. चिखली व धानोरा ता. जळगांव जामोद या गावांचा समोवश करण्यात आला आहे. या योजनेतंर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध विभागाच्या समन्वयाने विकासकामे केल्या जाणार आहे. तरी या गावांमधील कामांचा डिपीआर (विस्ततृ प्रकल्प अहवाल) सादर करावा, अशा सूचना यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी संबंधित गावातील ग्रामसेवक यांना  दिल्या. यावेळी संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

*****

 

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

बुलडाणा,(जिमाका)  दि.1 : राज्याचे माजी मुख्यमंत्री, हरीत क्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांची आज 1 जुलै रोजी जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी एस रामाममूर्ती यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गिते, नायब तहसिलदार विजय पाटील आदी उपस्थित होते.

****** 

 

No comments:

Post a Comment