Saturday 17 July 2021

DIO BULDANA NEWS 17.7.2021


 नविन महामार्गाचे काम सुरू असतानाच ब्लॅक स्पॉट शोधावे

               - खासदार प्रतापराव जाधव
*रस्ता सुरक्षा समिती बैठक
बुलडाणा, (जिमाका) दि. १७: राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये जंक्शन मिळवताना त्रुटी असल्याचे दिसून येत आहे. तसेच रस्त्याची 'लेव्हल मेंटेन'  करताना अडचणी आलेल्या आहेत.  त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. तरी महामार्गाचे काम सुरू असतानाच ब्लॅक स्पॉट शोधून आताच त्यात दुरुस्ती करून घेण्यात यावी, अशा सूचना केंद्रीय ग्राम विकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी दिल्या. 
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीचे आयोजन १६ जुलै रोजी करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना खासदार बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, बुलडाणा कृऊबास सभापती जलींधर बुधवत, जि. प सभापती राजेंद्र पळसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे आदी उपस्थित होते. 
  मराठवाड्यातून येणाऱ्या  शेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मेहकर - जानेफळ दरम्यान अपघाती वळण असल्याचे सांगत खासदार श्री. जाधव म्हणाले, हे वळण आत्ताच अपघात मुक्त करण्यात यावे. येथील  स्लोप देखील दोषपूर्ण आहेत. सदर स्लोपही व्यवस्थित करावा. तसेच चिखली - मेहकर मार्गावर लव्हाळा नजीक पुलावर वाहन आदळते.  परिणामी, वाहन पुला खाली जाऊ शकते. इतका दोष त्या पुल निर्मितीच्या कामांमध्ये झाला आहे. त्याचप्रमाणे अमडापुर वरुन साखरखेर्डा कडे जाताना  अंडर ब्रिज मधून मोठे वाहन  मुख्य रस्त्यावर येऊ शकत नाही. हीच परिस्थिती साखरखेर्डा वरून चिखली कडे येताना मोठी वाहने वळण घेतानाही अडचणी आहेत. त्यामुळे एखादे वेळेस मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी या ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. 
    राष्ट्रीय महामार्गामधून शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यात उतरतानाही चुका आहेत. लेवल व्यवस्थित केलेली नाही. यासंबंधी एक समिती नेमून त्याचा अहवाल मागवावा. यात पीडब्ल्यूडी, पोलीस आणि आरटीओ यांचे अधिकारी नेमावेत असेही निर्देश खासदार प्रतापराव जाधव यांनी दिले. बैठकीत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी माहिती दिली. बैठकीला संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
***********

एस. टी च्या आरक्षणासाठी स्वाईप सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा
*महामंडळाचे आवाहन 
बुलडाणा, (जिमाका) दि १७: एस.टी.महामंडळाव्दारे प्रवाशांच्या सेवेसाठी विविध सेवा उपक्रम राबवत असते. प्रवाशांना प्रवास सुखकर व सोपा होण्यासाठी अशीच एक सुविधा एस.टी.महामंडळाकडुन सुरू करण्यात आली आहे. ती सुविधा आहे,  स्वाईप मशिन व्दारे पासेसची व आरक्षण काढताना  आर्थिक व्यवहारासाठी स्वाईप मशिन सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी या सेवेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संदिप रायलवार ,विभाग नियंत्रक व अमृतराव कच्छवे,विभागीय वाहतुक अधिकारी,रा.प.बुलडाणा यांनी केले आहे.
*****

 भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा
बुलडाणा, (जिमाका) दि १७: भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा  दिनांक 16 जुलै 2021 रोजी सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त या कार्यालयामार्फत विविध कार्यक्रम तसेच वेबिनारस चे आयोजन करण्यात आले. वेबिनार मार्फत जल साक्षरता अभियान सर्व स्तरावर पोहचविण्यासाठी  गट विकास अधिकारी, तहसीलदार, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, जलसुरक्षक, भूगोल व भुगर्भशास्त्र विषयाचे विदयार्थी तसेच राष्ट्रीय सेवा सुरक्षा दल/नेहरु युवा केंद्राचे विदयार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, व शेतकारी यांना यु-टयूबवर वेबिनार, झुम ऑप याच्या माध्यमातून जल साक्षरता, भूजलाचे पुनर्भरण, पाण्याचा ताळेबंद, भूजल अधिनियम कायदा व त्यांचे विनियमण या संबंधी सर्व माहिती देण्यात आली.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्याने जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती, तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषाताई पवार , जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांना भेट देवून विभागातर्फे पुष्पगुच्छ  देण्यात आले. सर्व सन्माननिय पदाधिकारी/अधिकारी यांनी यंत्रणेस भावी वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या . 
या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिना निमित्त या कार्यालयातुन सेवा निवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी यांना अमंत्रीत करुन पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आल्या.सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ भूवैज्ञानिक विश्वास वालदे, यांचे मार्गदर्शनानुसार करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ए.डी.मंगरुळकर, सहाय्यक भूवैज्ञानिक, श्रीमती. पाटील, कनिष्ठ भूवैज्ञानिक, एस.एन. डव्हळे, कनिष्ठ भूवैज्ञानिक व श्रीमती. एस.जी बैनाडे, कनिष्ठ भूवैज्ञानिक तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी प्रयत्न केले.  

No comments:

Post a Comment