Tuesday 20 July 2021

DIO BULDANA NEWS 20.7.2021

 

चिखली तालुक्यातील महिला समुपदेशन केंद्रासाठी प्रस्ताव सादर करावे

  • 22 जुलै 2021 अंतिम मुदत

बुलडाणा,(जिमाका) दि.20 : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी महिला समुपदेशन केंद्र सुरू करणे, त्यांना संरक्षण किंवा मदत मिळवून देणे या दृष्टीने राज्य शासनामार्फत महिला समुपदेशन केंद्र चालविण्यात येतात. ज्या स्वयंसेवी संस्थांना समुपदेशन केंद्राचे प्रस्ताव सादर करावयाचे असल्यास जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयास सादर करावेत. सदर प्रस्ताव चिखली तालुक्यातील केंद्रासाठी मागविण्यात येत आहेत.  या योजनेतंर्गत मान्यता व अनुदान मिळविण्यासाठी संस्था ही नोंदणी अधिनियम 1860 व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत संस्था महिला व बाल विकास क्षेत्रात किमान तीन वर्ष कार्यरत असावी. संस्थेस महिला व बालकांच्या क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असावा.

   अर्हता असणाऱ्या पात्र इच्छुक संस्थांनी विहीत नमुन्यातील अर्ज, संस्थेची संक्षिप्त माहिती, संस्थेच्या योजना व कार्याबाबतचा मागील तीन वर्षाचा वर्षनिहाय अहवाल, संस्थेचा मागील 3 वर्षाचा सनदी लेखापालाची स्वाक्षरी असलेला वर्षनिहाय लेखा परीक्षण अहवाल, संस्थेने समुपदेशनाचे कार्य केल्याबाबतचा कार्याचा स्वतंत्र अहवाल, सांख्यिकी माहिती, संस्थेचे मागील तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट, संस्था नोंदणी अधिनियम 1860 व मुंबई सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडाव्यात, संस्थेची घटना व नियमावलीत महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे हा उद्देश असावा, प्रत जोडावी, कर्मचारी वर्गाची शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडाव्यात, संस्थेने वेळोवेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे छायात्रिचे, कागदपत्रे, वृत्तपत्रातील कात्रणे जोडावी, संस्थेच्या कार्यरत पदाधिकारी व कार्यकारीणीचे नाव, पत्ता, व्यवसाय व दुरध्वनी क्रमांकासह यादी जोडावी, सदर प्रस्ताव 22 जुलै 2021 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत सादर करावे. इच्छूक संस्थांनी विहीत नमुन्यातील अर्ज व योजनेच्या तपशीलवार माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, डॉ जोशी नेत्रालय जवळ, मुठ्ठे ले आऊट, बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी केले आहे.

*****

   

शासकीय व खासगी आस्थापनांनी त्रैमासिक ई- आर विवरण पत्र सादर करावे

• 31 जुलै 2021 अंतिम मुदत

बुलडाणा ,(जिमाका) दि. 20: सर्व शासकिय, निमशासकिय कार्यालये, खासगी आस्थापना औद्योगीक आस्थापना तसेच अनुदानीत विना अनुदानीत शाळा महाविद्यालये यांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता संचालनालय, नवी मुंबई (पुर्वीचे रोजगार व स्वयंरोजगारसंचालनालय) यांनी विकसित केलेल्या www.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर रोजगार विषयक सेवा ऑनलाईन पध्दतीने देण्यात येत आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणीकृत सर्व उद्योजक/आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालये यांना रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे कायदा 1959 अन्वये या कार्यालयास सादर करावयाची आहे.

माहे जुन 2021 अखेरचे त्रैमासिक इ आर-1 विवरण पत्र संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे व त्याबाबतचे ऑनलाईन प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. सदर विवरण पत्र सादर करण्याची अंतीम 31 जुलै 2021 आहे. तरी सर्व आस्थापना /उद्योजक यांनी विहीत मुदतीत आपले विवरण पत्र ऑनलाईन पध्दतीन संकेतस्थळावर सादर करावे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. ऑनलाइन ई आर-1 सादर करण्यात काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्र .07262- 242342 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त सु. रा झळके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

**********

सोयाबीनवरील खोडमाशी व चक्रीभुगा किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करावे

बुलडाणा ,(जिमाका) दि. 20: जुन महिण्याच्या पहिल्या पंधरवाड्यातील पाऊस मानानंतर ज्या शेतक-यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. त्यांचे पिक सद्यस्थितीत 25 ते 30 दिवसांचे आहे. या सोयाबीन पिकांवर खोडमाशींचा प्रादुर्भावास सुरूवात झाली आहे. अमरावती व नागपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ज्या शेतक-यांनी जुलै महिण्याच्या दुस-या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर सोयाबिनची पेरणी केली आहे. अशा सोयाबीन पिकांवरसुद्धा पुढील काही दिवसात या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच या दरम्यान सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडींच्या प्रादुर्भावांची सु्द्वा शक्यता आहे. तसेच या दरम्यान सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडीच्या प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी बंधूंनी जागरूक राहून किडीचे व्यवस्थापन करावे.

   किडींची ओळख व नुकसान:  खोडमाशी लहान चमकदार काळ्या रंगाची असून त्यांची लांबी 2 मि.मि. असते. अंड्यातुन निघालेली अळी पाय नसलेली, फिक्कट पिवळ्या रंगाची, 2-4 मि.मि. लांब असते. ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते. अळीनंतर पानाचे देठातुन झाडांचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतिल भाग पोखरुन खाते. प्रादुर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास पांढूरक्या रंगाची अळी किंवा कोष लालसर नागमोडी भागात दिसते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे सुरूवातीच्या अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते.  मोठ्या प्रमाणात नुकसान होते. खोडमाशी अळी तसेच कोष फांद्यात,खोडात असतो. अशा किडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते.  शेंगातील दाण्याचे वजन कमी हाकवून उत्पादनात 16-30 टक्के घट होते.

   चक्रीभुंगाची मादी पानाच्या टेठावर, फांदीवर किंवा मुख्य खोडावर साधारण: 1 ते 1.5 से.मी. अंतरावर एकमेकास समांतर दोन गोल काप तयार करून त्याध्ये अंडी टाकते. त्यामुळे चक्रकापाचा वरचा भाग सुकतो. अंड्यातुन निघालेली अळी पानाचे देठ आणी फांदीतुन आत जाते. मुख्य खोडाचा भाग पोखरते. या किडींचा प्रादुर्भाव मुंग, उडीद,चवळी या पिकावर सुद्धा होऊ शकतो. पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत झाल्यास झाडाची पाने, फांद्या व मुख्य खोडाचा भाग वाळतो. पिक साधारण: दिड महिन्याचे झाल्यावर चक्र भुंग्याचा प्रादुर्भाव असलेले झाड वाळत नाही. पण किडग्रस्त झाडास कमी शेंगा लागतात, परिणामी उत्पादनात घट येते. पिवळे चिकट सापळे लावून नियमीत माशांचा प्रादुर्भाव पाहणे (25/हे), खोडमाशी व चक्रिभुंगा प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात अशी किडग्रस्त झाडे, पाने फांद्या यांचा आतील किडसह नायनाट करावा.    

   खोडमाशी व चक्रीभुंग्याने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर ( सरासरी 10 टक्के किडग्रस्त झाडे) या दोन्ही किडींचे नियंत्रणसाठी इथियॉन 50 टक्के 30 मिलि किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के 6.7 मिली किंवा क्लोरॅट्रॅनिपोल 18.5 टक्के 3.0 मिली किंवा थायोमेथॅक्झॉम 12.6 टक्के + लँब्डा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेडसी टक्के 2.5 मिली यापैकी कोणतेही एक किटकाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व सोयाबीन पिकाचे संरक्षण करावे, असे

आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी यांनी केले आहे.

0000

 

बिटी कापूस पिकावरील मावा व तुडतुडे किडींचे एकात्मीक व्यवस्थापन करावे

बुलडाणा ,(जिमाका) दि. 20: सद्या परिस्थितीत कपाशी पिक रोप अवस्थेत आहे. सुरवातीच्या काळात कपाशी पिकावर प्रामुख्याने मावा आणी तुडतुडे ह्या रसशोषक कीडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा ह्या किडींचा प्रादुर्भाव जुलैच्या दुस-या आठवड्यापासून आढळून येतो, तर तुरतुड्यांचा प्रादुर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून आढळून येतो. मावा ही किड रंगाने पिवळसर किंवा फिक्कट हिरवी असून आकाराने अंडाकृती गोल असते. मावा पानाच्या खालच्या बाजुने आणि कोवळ्या शेंड्यावर समुहाने राहून त्यातील रस शोषण करतो. प्रादुर्भाव ग्रस्त पाने प्रथम निस्तेज होवून नंतर कोकडतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते या शिवाय मावा आपल्या शरीरातुन गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यामुळे झाडे चिकट व काळसर होतात.

   तुडतुडे फिक्कट हिरव्या रंगाचे असून पाचरीच्या आकाराचे असतात. तुडतुड्याच्या पिलांना पंख नसतात आणि ते नेहमी लांबीला तिरके चालतात. तुडतुडे नेहमी पानाच्या खालच्या बाजुला राहून त्यातील रस शोषण करतात, अशी पाने प्रथम कडेने पिवळसर होवून नंतर तपकीरी रंगाचे झाढाची वाढ खुंटते आणि अशा झाडांना पात्या, फुले आणि बोंडे कमी प्रमाणात लागतात. या किडींचा प्रादुर्भाव बाबत सर्वेक्षण करावे. सरासरी संख्या 10 मावा/पान किंवा 2 ते 3 तुडतुडे/ पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा.

 एकात्मीक व्यवस्थापन : वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांद्या, पाने, इतर पाला पाचोळा जमा करून किडींसहीत नष्ट करावा, वेळेवर आंतर मशागत करून पीक तण विरहीत ठेवावे त्यामुळे किडींच्या पर्यायी खाद्य तणाचा नाश होईल. तसेच बांधावरील किडीच्या पर्यायी खाद्य तणे तसे अंबाडी, रानभेंडी इ. नष्ट करावी.  मृद परिक्षणाच्या आधारावर खत मात्रेचा अवलंब करून दोन ओळीतील व दोन झाडातील अंतर योग्य तेच ठेवावे आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा. जेणे करून कपाशीची अनावश्यक कायीक वाढ होणार नाही. पिक दाटणार नाही. पर्यायाने अशा पिकावर किडही कमी प्रमाणात राहील, बिटी कपाशीच्या बियाण्याला ईमीडाक्लोप्रीड किंवा थायोमेझो्क्साम किटकनाशकांची बिज प्रक्रीया केलेली असते. त्यामुळे रस शोषक या किडीपासून सर्वसाधारण 2 ते 3 आठवड्यापर्यंत संरक्षण मिळते. म्हणून या काळात किटकनाशकांची फवारणी करू नये. रसशोषक किडींवर उपजिवीका करणारे नैसर्गीक किटक उदा. सीरफीड माशी, कातीन, ढालकीडे, क्रायसोपा, ॲनॅसयीस, प्रजातीचा परोपजीवी किटक ई. संख्या पुरेशी आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास रसशोसक किडींच्या नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा ॲझारीडेक्टीन 0.03 टक्के निंबोळी तेल आधारीत डब्लु.एस.पी.30 मिली किंवा ॲझारीक्टीन 5 टक्के (डब्लू/डब्लू एन.एस.के.ई.) 20 मिली.  सर्व उपाययोजनांचा अवलंब करूनही किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्याचे आढळून आल्यास कोणत्याही एका रासायनिक किटकनाशकांचा 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने त्यांचा वापर करावा. बुप्रोफेजीन 25 टक्के प्रवाही 20 मिली, डॉयफेंथ्युरॉन 50 टक्के पा. मि. भुकटी 12 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करून कपाशी पिकाची संरक्षण करावे असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी बुलडाणा यांनी केले आहे.

 

0000

 

आरोग्य विभागाअंतर्गत 22 जुलै रोजी सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन

बुलडाणा ,(जिमाका) दि. 20:  सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्याच्या प्रत्येक जिल्हा मुख्यालयी 22 जुलै 2021 रोजी सर्व रोग निदान शिबीर घेण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालय बुलडाणा येथे दि 22 जुलै रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भव्य सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या 2 वर्षापासून उद्भवलेली कोरोना रोगाची परिस्थिती आतापर्यंत आरोग्य विभागाने अत्यंत काळजीपुर्वक हाताळलेली आहे. कोरोना रोगाचा सामना यशस्वीरित्या पार पाडला आहे. परंतु ज्याप्रमाणे कोरोना हा एक रोग आहे, त्याचप्रमाणे मनुष्याला त्याच्या आरोग्याशी निगडीत अजुन ब-याच समस्या असतात. परंतु कोरोना काळ असल्यामुळे त्याला त्याच्या अन्य रोगावर पाहीजे, त्याप्रमाणात लक्ष देता आले नाही. त्यासाठी सर्व रोग निदान आरोग्य शिबीराचे आयोजन केले,  तर तळागळातील जनतेला त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण करता येईल.

    याच हेतुने जिल्हा रुग्णालय, बुलडाणा येथे सर्व रोग निदान आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात जिल्हाभरातील आरोग्य संस्था मधील विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी सेवा देणार आहे.या शिबीरात ॲलोपॅथी, हामिओपॅथी, आयुर्वेदिक व युनानी पद्वतीने रोगाची चिकित्सा व निदान करण्यात येणार  आहे. शिबीरामध्ये रोगनिदान करण्यासाठी आवश्यक असणा-या विविध चाचण्या जसे क्ष किरण तपसणी, सी.टी. स्कॅन, सोनोग्राफी, ई.सी.जी. व प्रयोगशाळेशी निगडीत चाचण्या सुद्वा लगेच करण्यात येणार आहे. सदर शिबीराचा लाभ जिल्ह्यातील जनतेने आपल्या आरोग्य विषक समस्या सोडविण्यासाठी घ्यावा,  असे आवाहन जिल्हा शल्यचिहित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.

******

शिकाऊ उमेदवारांनी आस्थापनेशी संपर्क साधून आवेदन भरावे

बुलडाणा ,(जिमाका) दि. 20:  शिकाऊ उमेदवारी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 111 वी ची कार्यवाही करण्यात येणार आहे. परीक्षेसंबंधी करावयाच्या कार्यवाहीबाबतचे सविस्तर वेळापत्रक संस्थेच्या सुचना फलकावर लावलेले आहे. तसेच 15 एप्रिल 2021 पर्यंत शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या शिकाऊ उमेदवारांनी सदर वेळापत्रकात दिलेल्या विहीत मुदतीत विहीत कार्यवाही पुर्ण करावी. शिकाऊ उमेदवारांनी ज्या आस्थापनेमधून शिकाऊ उमेदवारी पूर्ण केली आहे. त्या आस्थापनेशी संपर्क साधून परीक्षा आवेदनपत्र भरण्यात यावे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक संबंधित आस्थापनेस पाठविण्यात आलेले आहे, असे अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्र, खामगांव यांनी कळविले आहे.

*******

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 1585 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 7 पॉझिटिव्ह

  • 05 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि. 20 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1592 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1585 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 7 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1 व रॅपीड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 539 तर रॅपिड टेस्टमधील 1046 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1585 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 1, बुलडाणा तालुका: हतेडी बु 1, चौथा 1, जळगांव जामोद शहर : 1, दे. राजा तालुका: नागणगांव 1, नांदुरा तालुका : पातोंडा 1, मेहकर शहर : 1,  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 07 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान अंबोडा ता. नांदुरा येथील 67 वर्षीय महिला व जळगांव जामोद येथील 65 वर्षीय पुरूष रूग्णाचा स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 05 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 620651 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86528 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86528 आहे.

  आज रोजी 1329 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 620651 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87216 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86528 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 19 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 669 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. 

No comments:

Post a Comment