Wednesday 16 June 2021

DIO BULDANA NEWS 16.6.2021

 हरभरा खरेदी सुरळीत सुरू ; 18 जुनपर्यंत नोंदणी

·         25 जुन पर्यंत खरेदी सुरू राहणार

बुलडाणा,(जिमाका) दि.16 : नाफेडच्यावतीने हमीदराने हरभरा खरेदी करण्यात येत आहे. हरभरा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची 15 फेब्रुवारी ते 17 मे 2021 पर्यंत नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर लॉकडाऊन लागल्यामुळे शेतकऱ्यांची नोंदणी होऊ न शकली नाही. शासनाने 8 जुन ते 18 जुन 2021 पर्यंत पुन्हा एकदा शेतकऱ्यांची हरभरा विक्री करण्यासाठी नोंदणी करण्यात मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार नोंदणीचे कामकाज सुरू असून खरेदीही सुरळीत सुरू आहे. 

  ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती. अशा सर्व 17 हजार 421 शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसएमएस देण्यात आलेले आहे. मात्र बाजारपेठेतील दर जास्त असल्यामुळे 25 मे 2021 पर्यंत हमीदराने 78 हजार 714 क्विंटल हरभरा शेतमालाची 4 हजार 499 शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आली होती. नंतर शासनाने 25 जुन 2021 पर्यंत शेतकऱ्यांची खरेदी करण्यासाठी मुदतवाढ दिल्याने परत खरेदीस सुरूवात करण्यात आली. मात्र मध्यंतरीच्या काळात हमीदरापेक्षा जास्त दर मार्केटमध्ये असल्याने महिनाभर शेतकरी हमी दराचे केंद्रावर माल विक्रीसाठी आले नाही. सद्यस्थितीत बाजारपेठेतील दर कमी झाल्याने शेतकऱ्यांनी परत हमीदर केंद्राकडे विक्रीसाठी माल आणावयास सुरूवात केली आहे. त्यासाठी आवश्यक असणारा बारदानासुद्धा केंद्रावर पुरवठा करण्यात आलेला असून खरेदी केंद्र सुरळीत सुरू झाले आहेत. लॉकडाऊनमुळे बारदाना मिळण्यास थोडा उशिर होत आहे. मात्र जसजसा बारदाना प्राप्त होईल. त्याप्रमाणे खरेदी केंद्र 25 जुन 2021 पर्यंत सुरूच राहणार आहेत. तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस शिंगणे यांनी केले आहे. 

 

*********

महाआवास अभियान अंतर्गत लाभार्थ्यांचा ई गृहप्रवेश

* प्रतिनिधीक स्वरूपात चावीचे वितरण

बुलडाणा,(जिमाका) दि.16 : ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात महाआवास अभियान राबविण्यात आले. या अभियानातंर्गत भूमीहीन पात्र लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करणे, घरकुलाचे बांधकाम पूर्ण करणे, मनरेगा अंतर्गत प्रशिक्षण, जल जीवन मीशन, स्वच्छता मिशन व सौभाग्य योजनेचा घरकुल लाभार्थ्यांना लाभ देणे आदी कामे करण्यात आली. घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना 15 जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिनिधीक स्वरूपात चावी देवून ई गृहप्रवेश कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी जि.प अध्यक्ष मनीषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत, सभापती सर्वश्री रियाजखा पठाण, राजेंद्र पळसकर, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते. 

   ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून राज्यस्तरीय ई गृहप्रवेश कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पार पडला. या सोहळ्यादरम्यान व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे निवडक लाभार्थ्यांना चावी देवून ई गृहप्रवेश करण्यात आला. तर त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी कार्यालयात लाभार्थी दिनकर जाधव खुपगांव, कासाबाई शेळके चांडोळ, सुभाष काकफळे चांडोळ, भाऊराव चित्ते नांद्राकोळी यांना घराची चावी देवून ई गृहप्रवेश करण्यात आला. संचलन चंद्रशेखर जोशी यांनी तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी मानले.

******

 

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 2590 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 37 पॉझिटिव्ह

* 60 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.16 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2627 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2590 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 37 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 23 व रॅपीड टेस्टमधील 14 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 239 तर रॅपिड टेस्टमधील 2351 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2590 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : साखळी बु 1,  संग्रामपूर तालुका : करमोडा 1, शेगांव शहर : 1,    मलकापूर तालुका : दाताळा 1,   चिखली तालुका :  भालगांव 1, दहीगांव 1, अन्वी 1, उंद्री 1, धानोरी 1, कटोडा 1, वरूड 1,    सिं .राजा तालुका : असोला जहा 1, शिवणी टाका 1,  दे. राजा तालुका : भंडारी 1, भिवगण 1,   नांदुरा शहर : 3, नांदुरा तालुका : निमगांव 1, खामगांव शहर : 3, खामगांव तालुका : दिवठाणा 3,    जळगांव जामोद शहर :1 , जळगांव जामोद तालुका :  बोराळा बु 2, धानोरा 2, मडाखेड 1,    लोणार शहर : 1, लोणार तालुका : कापडशिंगी 1, भुमराळा 1,  परजिल्हा मादनी जि. जालना 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 37 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान पिंपळगांव ता. चिखली येथील 84 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 

      तसेच आज 60 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.    

   तसेच आजपर्यंत 537285 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85310 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  85310 आहे. 

  आज रोजी 1476 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 537285 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86080 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85310 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 119 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 651 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*************

ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला आता हेल्पलाईन

* 14567 हा टोल फ्री क्रमांक

* सामाजिक न्याय विभाग व जनसेवा फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम

बुलडाणा,(जिमाका) दि.16 : ज्येष्ठ नागरिकांच्या राष्ट्रीय हेल्पलाईन लवकरच सुरू करण्यात येणारआहे. या हेल्पलाईनचा क्रमांक 14567 राहणार असून ही राष्ट्रीय हेल्पलाईन असणार आहे. सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार मार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सर्व राज्यात हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहे. राज्य शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जनसेवा फाऊंडेशन पुणे व राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन चालविल्या जाणार आहे. 

  या हेल्पलाईनचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे असणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, अत्याचार ग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवांसाठी वेळोवेळी हेल्पलाईनचा उपयोग होणार आहे. हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक 14567 असून हेल्पलाईनची वेळ सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे. हेल्पलाईन केवळ 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर व 1 मे वगळता सर्व दिवस सुरू असणार आहे. हेल्पलाईन मार्फत आरोग्य जागरूकता, निदान, उपचार, निवारा, घरे, डे केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक , अध्यात्मिक, कला व करमणूक माहिती दिल्या जाणार आहे. तसेच कायदेविषयक मार्गदर्शन, विवाद निराकारण, पेन्शन संबंधित मागर्दर्शन व शासकीय योजनांची माहितीही दिल्या जाणार आहे.   

   तसेच चिंता निराकारण, नातेसंबंध व जीवन व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधीत शोक, वेळ, ताण, राग व्यवस्थापन, मृत्यूपुर्वीचे दस्तऐवजीकरण आदी भावनिक समर्थनार्थ मार्गदर्शनही केल्या जाणार आहे. क्षेत्रीय पातळीवर बेघर, अत्याचारग्रस्त, हरविलेले व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी हेल्पलाईन कार्यरत राहणार आहे. या हेल्पलाईनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर क्षेत्रीय प्रतिनिधी नियुक्त केलेले आहे. हेल्पलाईनबाबत जनसेवा फाउंडेशनच्या मिनाक्षी कोळी यांनी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांना अवगत केले. तरी हेल्पलाईन बाबत नागरिकांनी ज्येष्ठांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. 

********

           बुलडाणा तालुक्यात 1259 शेतकऱ्यांनी 27 हजार 938 क्विंटल बियाणे केले तयार

कृयी विभागाच्या घरचे बियाणे वापरा आवाहनाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

बुलडाणा,(जिमाका) दि.16 : कृषी विभागाच्या निर्देशानुसार बुलडाणा तालुक्यामध्ये खरीप हंगाम 2020-21 पासून खरीप हंगाम 2021-22 मध्ये येणाऱ्या संभाव्य बियाणे टंचाईची शक्यता लक्षात घेण्यात आली. त्यानुसार माहे ऑगस्ट 2020 पासुन कृषी विभागाने गाव स्तरावर घरचे सोयाबीन बियाणे उपलब्धता मोहीम सुरु केली होती. त्यामध्ये सोयाबीन पिकामधील वेगवेगळ्या वाणाची झाडे (रोगिग )उपटून टाकणे, सोयाबीन काढणी वेळेस कापणी व मळनी यांची काळजी घेणे व त्याकरिता 400 आर पी एम च्या मळनी यंत्रामधून सोयाबीन मळनी करून तयार झालेले सोयाबीन बियाणे सुकवून योग्य पद्धतीने घरामध्ये साठवून ठेवणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.  त्यानुसार तालुक्यातील एकून 98 गावामध्ये 1259 शेतकऱ्यांनी 27 हजार 938 क्विंटल वेगवेगळ्या वाणाचे बियाणे तयार केले. 

   त्यापैकी 3032 क्विं. बियाण्याचा वापर स्वतः उत्पादित शेतकरी करणार आहेत व 2300 क्विंटल बियाणे जवळपास 1300 शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी केलेले आहे. सदर बियाणे 80-90 रु प्रती किलो या दराने खरेदी करून स्वतः करिता वापर करणार आहेत. बाजारातील दरापेक्षा शेतकऱ्यांकडून कमी किंमतीत बियाणे मिळाल्यामुळे 20-30 रु प्रती कीलो शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे दिसून येते. या व्यतिरिक्त जवळपास 500 क्विं बियाणे शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

या करिता बियाणे उगवण क्षमता चाचणी 1700 प्रात्यक्षिके व बीज प्रक्रिया 1015 प्रात्यक्षिके घेण्यात आली.

   खरीप हंगामाकरिता बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्या करिता जैविक खते, बुरशिनाशके व रासायनिक बुरशिनाशके , किटकनाशके याचा उपयोग करण्यात येत आहे.आता पर्यंत जैविक खते 100 लीटर व रासायनिक बुरशिनाशके 600 किलो शेतकऱ्यांकडून खरेदी करून वापरण्यात आलेली आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी घरच्या बियाण्याचा वापर करून त्याची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. तसेच 80 ते 100 मी मी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये आणि रुंद सरी वरंबा पद्धतीने (बी बी एफ )/ पट्टा पद्धतीने सोयाबीन ची पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी,बुलडाणा यांनी केले आहे. 

************

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

*18 जुन 2021 पर्यंत अंतिम मुदत

*अर्ज swfs.applications@gmail.com ईमेलवर सादर करावा

बुलडाणा,(जिमाका) दि.16: परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. परिपूर्ण अर्ज भरून व आवश्यक कागदपत्रांसह 18 जुन 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकृतीसाठी स्कॅन कॉपी swfs.applications@gmail.com या ईमेल आयडीवर सादर करावा. जे विद्यार्थी ई मेल द्वारे अर्ज पाठवतील त्यांनी ई मेल द्वारे पाठविलेल्या अर्जाची हार्ड कॉपी पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, 3, चर्च रोड, पुणे 41100 येथे सादर करावी.

   योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती / नवबौद्ध घटकातील असावा, राज्याचा रहीवासी असावा, पदव्युत्तर अभ्यास क्रमासाठी 35 वर्ष व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असणार आहे. विद्यार्थ्याच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त नसावे. जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये व लंडन स्कुल ऑफ इकॉनिमिक्स मध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थांना ही उत्पन्न मर्यादा लागू राहणार नाही. परदेशातील शिक्षण संस्थेत प्रवेश घेणाऱ्या वा प्रवेशित असलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे, मात्र द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना पुर्ण केलेल्या अभ्यासक्रम कालावधीची शिष्यवृत्ती अनुज्ञेय असणार नाही. परदेश शिष्यवृत्ती योजनेतंर्गत दोन वर्ष कालावधीचाच एम.बी.ए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहणार आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेत स्थळावरील एमडी व एमएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. यापूर्वी शासनाकडून परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी योजनेचा लाभ घेतलेला आहे. असे विद्यार्थीदेखील पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र असतील. परदेशातील शिक्षणसंस्था ही जागतिक क्रमवारीत 300 च्या आत असावी. अटी व शर्ती या सविस्तर जाहीरातीप्रमाणे व शासन निर्णयाप्रमाणे लागू राहतील.

                          योजनेचा असा मिळणार लाभ

विद्यापीठाने प्रमाणीत केलेल्या शिक्षण शुल्काची पुर्ण रक्कम, तसेच केंद्र शासनाच्या नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्ती योजनेतंर्गत लागू करण्यात आलेले इतर शुल्क, आरोग्य विमा, व्हिसा शुल्क या बाबी परदेश शिष्यवृत्ती धारकासाठी अनुज्ञेय असणार आहेत. विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रासाठी 15,400 युएस डॉलर, तर इंग्लडसाठी 9900 जी बी पौंड इतका अदा करण्यात येतो. विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेणेसाठी आणि अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर भारतात परत येण्यासाठी कमीत कमी कालावधीचा आणि नजीकच्या मार्गाचा इकॉनॉमी क्लास विमान प्रवास दर दिला जाणार आहे. विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी युएसए व इतर देशासाठी 1500 युएस डॉलर व इंग्लडकरीता 1100 जी.बी पौंड इतकी रक्कम देण्यात येते. यामध्ये पुस्तके, अभ्यास दौरा व इतर खर्चाचा समावेश आहे.

         सध्या कोविड – 19 या सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोणतेही कारण न देता सदर योजनेची प्रक्रिया रद्द करणे, प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलणे यासह योजने / निवड, अंमलबजावणीबाबतचे सर्व अधिकार शासन स्वत:कडे राखून ठेवत आहे. यावर्षी 14 जुन 2021 च्या जाहीरातीचे अनुषंगाने ज्या विद्यार्थ्याने अर्ज केलेले आहेत. त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्जाचा नमुना व अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी कळविले आहे.

*****

महाडिबीटी प्रणालीतंर्गत शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यास 30 जुन पर्यंत मुदतवाढ

बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : महाडीबीटी प्रणालीवर सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्क व इतर योजनांचे महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित आहेत. सदर शिष्यवृत्ती, प्रथम हप्ता शिष्यवृत्ती , शिक्षण व परीक्षा शुल्क अर्ज महाविद्यालयास महाडीबीटी प्रणालीवर सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करण्यास 30 जुन 2021 पर्यंत अंतिम मुदत वाढ देण्यात आली आहे.

    महाविद्यालय प्राचार्य यांनी अर्ज तात्काळ अंतिम तारखेपर्यंत महाविद्यालय स्तरावरील महाडीबीटी प्रणालीवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क पात्र अर्ज समाजकल्याण कार्यालयास ऑनलाईन सादर करावे. शासनाकडून अंतिम मुदतीनंतर प्रलंबित अर्ज ऑटो रिजेक्ट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाची राहील, असे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे. 

*****

डाक अदालतीचे 23 जुन रोजी आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.16: बुलडाणा डाक विभागाच्यावतीने बुधवार, 23 जुन 2021 रोजी सकाळी 11 वाजता डाक अधिक्षक यांच्या कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. डाक विभागाच्या कामा संबधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्याच्या आत निराकारण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतल्या जाणार आहे. विशेष टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहे. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. त्यामध्ये तारिख व ज्या अधिकाऱ्यास मुळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा असावा. संबंधीतांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार डाक अधिक्षक ए. के इंगळे यांचे नावे दोन प्रतीसह अधिक्षक डाकघर, बुलडाणा विभाग, बुलडाणा या पत्त्यावर 17 जुन 2021 पर्यंत पाठवाव्यात. तदनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केल्या जाणार नाही, असे अधिक्षक, डाकघर बुलडाणा यांनी कळविले आहे.

*******

 

पाणी टंचाई निवारणार्थ 19 गावांसाठी 23 विंधन विहीरी

* 19 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना

बुलडाणा, दि‍.16 (जिमाका) : पाणीटंचाई निवारणार्थ दे. राजा तालुक्यातील 17, नांदुरा तालुक्यातील व मलकापूर तालुक्यातील 1, अशा एकूण 19 गावांसाठी 23 विंधन विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे.

   विंधन विहीरी दे राजा तालुक्यातील सावंगी टेकाळे, वाकी खु, वाकी बु, किन्ही पवार, पिंपळगाव चीलमखा, शिवणी आरमाळ, सावखेड नागरे, पळसखेड झा., पळसखेड मकर्ध्वज, पिंपळगाव बू, नागनगाव, जुमडा, भिवगाव बू, दे. मही, निमखेड, पिंपरी आंधळे, गिरोली बू, नांदुरा तालुक्यातील धाडी व  मलकापूर तालुक्यातील निमखेड गावांसाठी मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

***"""

No comments:

Post a Comment