Saturday 5 June 2021

DIO BULDANA NEWS 5.6.2021



 बँकांनी पात्र शेतकऱ्यांना गतीने पीक कर्ज वाटप करावे

-         पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

* डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा शेतकऱ्यांना दिलेला लाभ तपासावा

*बँकांनी शेतकऱ्यांना उद्धट वागणूक देवू नये

बुलडाणा, दि. 5 (जिमाका) : खरीप हंगाम सुरू झालेला आहे. मान्सून पूर्व पाऊस जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे शेतकरी आपली शेती पेरणीसाठी सज्ज करीत असून शेतकरी जोमाने खरिप हंगामाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे बँकांनी आता पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी. पीक कर्ज वाटप या बाबीला प्राधान्य देवून पात्र सभासद शेतकऱ्यांना गतीने संपूर्ण पीक कर्ज वाटप करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात खरीप हंगाम पीक कर्ज आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रिय ग्राम विकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, जि.प अध्यक्षा मनिषा पवार, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती,  तसेच सभागृहात आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले, आमदार राजेश एकडे, कृषी सभापती राजेंद्र पळसकर आदी उपस्थित होते.

   डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा काही बँका शेतकऱ्यांना लाभ देत नसल्याचे समोर आले असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना लाभदायी आहे. मात्र काही बँका लाभ देत नाही, त्यामुळे या योजनेचा लाभ दिल्या बाबतचा मागील पाच वर्षाचे रेकॉर्ड तपासण्यात यावे. यामध्ये लाभ न दिलेल्या बँकांवर कारवाई करण्यात यावी.  कर्जमाफी झालेला व पात्र एकही सभासद पीक कर्जापासून वंचित राहू नये. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज वितरण करावे. 

  ते पुढे म्हणाले, बँकांनी पीक कर्जासाठी लागणारे कागदपत्रांची माहिती शाखेच्या दर्शनी भागात फलकावर किंवा बॅनर वर लावावी. जेणेकरुन शेतकऱ्यांना कागद पत्रांची माहिती होईल. कुणालाही विचारायची गरज पडणार नाही. बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण करताना उद्घट वागणूक देवू नये. व्यवस्थित समजावून सांगत शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मदत करावी. खरीप हंगाम तोंडावर आलेला असुन शेतकरी खते, बि बियाणे आदी कृषी निविष्ठा खरेदीत मग्न आहे. त्यामुळे तातडीने पीक कर्ज वितरण करावे. जिल्हा बँकेमार्फत लाभ मिळालेल्या परंतु कर्ज वाटप न झालेल्या प्रत्येक सभासदाला संलग्न राष्ट्रीयकृत बँकेने कर्जवाटप करणे आवश्यक आहे. याबाबत सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी कार्यवाही करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.  

    खासदार प्रतापराव जाधव यावेळी म्हणाले, बँकांनी शेतकऱ्याकडून 'इन्स्पेक्शन' शुल्क अदा करू नये. शेतकऱ्यांनी कर्जासाठी अर्ज व कागदपत्रे सादर केल्यानंतर शेतकऱ्यांना अर्ज दिल्याची पोच पावती द्यावी.  यावेळी आमदार महोदयांनी पीक कर्ज वितरणाबाबत विविध प्रश्न मांडले व पीक कर्ज वितरण गतीने पुर्ण करण्याची मागणी केली.  याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते,  जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. हेडाऊ,  जिल्हा उपनिबंधक श्री. राठोड, जिल्हा बँकेचे श्री. खरात, विविध बँकांचे प्रतिनिधी, नोडल अधिकारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment