Friday 4 June 2021

DIO BULDANA NEWS 4.6.2021

 कोविड रूग्णांच्या उपचाराकरीता रूग्णांकडून घ्यावयाचे दर निश्चित

·        ग्रामीण भागातील रूग्णाकडूनही समान दर घ्यावेत

·        शासन सुचनेनुसार दर न घेतल्यास रूग्णालयाचा परवाना रद्द करणार

बुलडाणा,(जिमाका) दि.4 : राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार कोविड रूग्णांच्या उपचारासाठी खाजगी कोविड रूग्णालयांना कोविड रूग्णांच्या उपचाराचाकरीता घ्यावयाच्या शुल्काची निश्चिती करण्यात आली आहे.  तरी सर्व खाजगी कोविड रूग्णालयांनी समान दर असल्यामुळे गा्रमीण भागातील रूग्णांकडूनही समान असलेले दर घ्यावे. त्यासाठी दर निश्चित करण्यात आले आहे.

 जिल्ह्याकरीता दर निश्चित करण्यात आले असून त्याबाबतच्या अटी व शर्तीही लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोणत्याही खाजगी कोविड रूग्णालय / नर्सिंग होम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मान्यतेशिवाय 80 टक्के बेडची संख्या कमी करू नये. महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा 2006 मधील तरतुदींना अनुसरून सर्व आवश्यक प्रक्रिया पुर्ण करून खाजगी कोविड रूग्णालयांनी बेड वाढविण्याबाबत कार्यवाही करावी. शासन निर्देशानुसार उपलब्ध बेड संख्येच्या 80 टक्के बेडवर उपचाराकरीता भरती असलेल्या रूग्णांकडून शासकीय दराने उपचार करून आरोग्य सुविधा पुरवाव्यात. आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सर्व नर्सिंग आणि सहाय्यक कर्मचारी यांना संपूर्ण पाठींबा व सहकार्य करावे. कोणत्याही गटाकडून किंवा समुहाकडून सुरळीत आरोग्य सेवा पुरविण्याच्या कार्यात अडथळा निर्माण करणारी कृती झाल्यास दंडात्मक तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल.

  कोणत्याही रूग्णालयात या आदेशातील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास अशा रूग्णालयाचा परवाना रद्द करणे व भारतीय दंड संहीता अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही करण्यात येईल. आरोग्य सेवा प्रदाते यांनी परवानगी असलेली बेड संख्या, कार्यान्वीत बेडची संख्या, रिक्त असलेल्या बेडपैकी व नॉन रेगुलेटेड या वर्गवारीतील बेडची संख्या दर्शविणारे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे. सर्व रूग्णालयांनी  निश्चित करण्यात आलेले दराचे फलक रूग्णालयाच्या दर्शनी भागात लावावेत. सदर दर जिल्ह्यातील सर्व खाजगी कोविड रूग्णालय अथवा नर्सिंग होम यांना लागू असून कोरोना बाधीत रूग्णांकडून यापेक्षा जास्त रक्कम घेवू नये.

    शासन मार्गदर्शक सुचनेनुसार 80 टक्के व 20 टक्के बेड क्षमतेवर भरती असलेल्या रूग्णांच्या उपचारामध्ये कोणताही फरक केल्या जाणार नाही. सदर दर जिल्ह्यात 31 ऑगस्ट 2021 पर्यंत लागू असणार आहेत. निश्चित दर व अटी, शर्तींचे खाजगी कोविड रूग्णालय यामध्ये पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित रूग्णालयाचा परवाना रद्द करून साथ रोग अधिनियम 1987, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियम 2011, महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा 2006, बॉम्बे नर्सिंग होम कायदा 2006, भारतीय दंड संहीता नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एस रामामर्तूी यांनी कळविले आहे.  

असे आहेत दर

 बुलडाणा जिल्हा कोविड दरांबाबत ‘क’ वर्गात येतो. त्यानुसार रूटीन वार्ड अधिक आयसोलेशनसाठी 2400 रूपये प्रति दिवस,  व्हेंटीलेटरशिवाय आयसीयु अधिक आयसोलेशन 4500 रूपये प्रति दिवस, व्हेंटीलेटरसह आयसीयु अधिक आयसोलेशन 5400 रूपये प्रति दिवस.  या दरांमध्ये रक्तातील सीबीसी तपासणी, युरीन तपासणी, एचआयव्ही स्पॉट अँटी एचसीव्ही, सेरम क्रीएटीनाईन, युएसजी, टु डी इको, एक्स रे, ईसीजी, ऑक्सिजन चार्जेस, बेड चार्जेस, नर्सिंग चार्जेस, जेवण आदींचा समावेश आहे.   

******

जुन महिन्यात आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन रद्द

बुलडाणा, दि. 4 (जिमाका) : सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी अडचणी जाणून घेण्यासाठी व तक्रारींचे निरसन करण्यासाठी शासनाने तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर लोकशाही दिन अंमलबजावणीबाबत आदेश दिले आहेत. लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात येतो. मात्र जिल्ह्यात कोविड 19 चा प्रादुर्भाव जास्त वाढत असल्याने माहे जुन 2021 चा सोमवार 7 जुन 2021 रोजी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन रद्द करण्यात येत आहे, असे तहसिलदार (सामान्य प्रशासन) श्री. बंगाळे यांनी कळविले आहे.

********

एसटी महामंडळाच्या महाकार्गो सेवेचा लाभ घ्यावा

·        विभाग नियंत्रक यांचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.4 : राज्य शासनाने एस टी महामंडळास माल वाहतुकीची परवानगी दिली असून या सेवेचा नामकरण महाकार्गो करण्यात आले आहे. तरी एस टी महामंडळाच्या महाकार्गो सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी केले आहे. शासनाच्या विविध विभागामार्फत निवीदा प्रक्रिया राबवून खाजगी मालवाहतूकदार यांच्यामार्फत शासकीय मालाची जी मालवाहतूक करण्यात येते. त्यामध्ये एस टी महामंडळास 25 टक्के मालवाहतूकीचे काम देण्यात यावे. सदर 25 टक्के काम हे विभागाच्या निवीदा प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आलेल्या खाजगी वाहतूकदारांना जो दर अनुज्ञेय करण्यात येईल, त्या दराने देण्यात यावा.  त्यसासाठी महामंडळास निवीदा प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची आवश्यकता असणार नाही, असा धोरणात्मक शासन निर्णय घेण्यात आला आहे. महाकार्गो सेवेतंर्गत मालवाहतूक करण्यासाठी बुलडाणा विभागाच्या कक्ष प्रमुखांच्या 8830279722 क्रमांकावर तसेच संबंधित आगार प्रमुखांकडे संपर्क करावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

*****

शेतकऱ्यांनी 80 ते 100 मि.ली पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये

·        कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.4 : शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. दिनांक 5 जून 2021 रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खाते, कृषी हवामान शास्त्र विभाग, पुणे यांनी वर्तवली आहे.

          सोयाबीन, तूर ,भुईमूग व मका या पिकांच्या नियोजना करता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणी साठी शेतजमीन नांगरणी व वखराच्या पाळ्या देऊन तयार करावी. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या ओलाव्या वर पेरणी केल्या नंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80-100 मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतक-यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागामार्फत  करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment