Sunday 6 June 2021

DIO BULDANA NEWS 6.6.2021


 छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेलं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न       

- पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे 
*शिवराज्यभिषेक दिनानिमित्त जिल्हा परिषदेत उभारली गुढी
*पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले पूजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 6: सतत महाराष्ट्रावर कोणते ना कोणतं संकट येत आहे, अतिवृष्टी आहे, वादळ आहे, कोरोना सारखी महामारीतून आपली अर्थव्यवस्था सावरत असताना आज आपण महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत.  छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेलं रयतेचं राज्य महाराष्ट्रात निर्माण करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज केले. 
     हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद आवारात पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली व पूजन करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री डॉ शिंगणे बोलत होते. 
  ते पुढे म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यातील रयतेचे राज्य ज्या पद्धतीने सुरू होतं,  त्याच पद्धतीने राज्यात शासनाचे काम सुरू आहे. कोरोना सारख्या संकटातून बाहेर पडण्याचे काम राज्य सरकार करत आहे. महाराष्ट्र मध्ये उत्तम आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याचे काम केल्या जात आहे. देशात सर्वात पारदर्शक काम कोरोनाच्या काळात राज्य सरकार करत आहे. 
तांब्याचा कळस, भगवी पताका आणि त्यांना आंब्याच्या पानांचे तोरण बांधून ही गुढी उभारण्यात आली होती. तर गुढीच्या पायथ्याशी आकर्षक अशी पुष्प सजावट आणि आकर्षक रांगोळी काढण्यात आली. सुरुवातीला राष्ट्रगीत आणि त्यानंतर महाराष्ट्र गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला.  कार्यक्रमाला  जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार, उपाध्यक्ष कमलताई जालींदर बुधवत,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. तसेच बुलडाणा जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयवर सुद्धा गुढी उभारण्यात येऊन हा दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून सामाजिक अंतर राखून प्रशासनाच्या वतीने साजरा करण्यात आला. 
***********

जिल्ह्यात बरेच निर्बंध शिथील; काही कायम
*किराणा, भाजीपाला व फळे, सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहणार
*सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्व नोंदणी पद्धतीने 50 टक्के क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी
बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत  जिल्ह्यात 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 15 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. तसेच मुख्य सचिव यांच्या ४ जून च्या आदेशानुसार जिल्ह्यातील पॉझीटिव्हीटी रेट, ऑक्सिजन बेडची उपलब्धता तसेच दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. सदर श्रेणी नुसार जिल्हा श्रेणी ३ मध्ये समाविष्ट आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती त्यांनी 7 जून रोजी सकाळी 7 वाजेपासून ते पुढील आदेशापर्यंत निबंधासह सुट देण्यात आलेल्या सेवांबाबत प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहे. 
     या आदेशानुसार सर्व किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, मिठाई दुकाने, खाद्य पेय विक्री दुकाने, पिठाची गिरणी, तसेच सर्व प्रकारची खाद्य पदार्थाची दुकाने (चिकन,मटन,पॉल्ट्री,मासे आणि अंडी दुकाने), पाळीव प्राणी खाद्य पदार्थांची दुकाने, तसेच दुध व दुग्धजन्य विक्री पदार्थ (डेअरी) आदी दुकाने,कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने, कृषि प्रक्रिया, उद्योग गृहे, शेती अवजारे व शेतातील उत्पादनाशी निगडीत दुकाने, ५० टक्के आसन क्षमतेसह शिव भोजन केंद्र, दररोज सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील.   सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक सेवा अंतर्गत येत असलेली दुकाने, प्रतिष्ठाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. ही दुकाने शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील. मॉल्स, चित्रपटगृहे पूर्णतः बंद राहतील. 
    हॉटेल्स, रेस्टॉरंट व खानावळ 50 टक्के आसन क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार  तसेच अन्य दिवशी दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत केवळ घरपोच सेवेला परवानगी राहील. सार्वजनिक ठिकाणे,  खुले मैदान, फिरणे व सायकलिंग साठी सकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत परवानगी असेल. सर्व प्रकारची खाजगी कार्यालये दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.  सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये एकूण उपस्थिती क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील. दररोज सकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत खेळांना परवनगी असेल. सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रम स्थानिक प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीने व 50 टक्के क्षमतेसह घेण्यास परवानगी असेल. असे कार्यक्रम शनिवार व रविवार बंद असतील. 
         सर्व केशकर्तनालये,सलुन,स्पा,ब्युटी पार्लर एकूण क्षमतेच्या 50 टक्के पूर्व नोंदणीसह सुरू राहतील. वातानुकूलित सेवेस परवानगी नाही. लग्न समारंभ बँड पथक, कॅटरिंग आदींसह पूर्व परवानगीने 50 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. अंत्यसंस्काराला 20 व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी असेल.सभा, बैठका आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीमध्ये घेता येतील.बांधकामावर जर बाहेरून मजूर असतील तर दुपारी 4 वाजेपर्यंत करता येतील. ई कॉमर्स व वस्तू सेवा नियमितपणे सुरू राहतील. सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण आसन क्षमतेसह सुरू राहील, मात्र उभे राहून प्रवास करण्यास मनाई राहील. जास्तीत जास्त तीन व्यक्तींच्या परवानगीसह मालवाहतूक नियमितपणे सुरू राहील. आंतर जिल्हा व जिल्ह्याबाहेर प्रवाशी वाहतूक सुरू राहील. मात्र स्तर 5 मधील जिल्ह्यात जाणे येणे होत असल्यास ई पास आवश्यक राहील. 
  सर्व खाजगी व सार्वजानिक वैदयकीय सेवा, पशु चिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील. मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास सुरु राहतील. सर्व प्रकारचे सहकारी संस्था, खाजगी व शासकीय बँका, विमा व वैद्यकीय सेवा कंपन्या, नॉन बँकिंग वित्तीय संस्था सुरू राहतील.  जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहील. तसेच  सायंकाळी 5 नंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. सदर कालावधीत नागरिकांना मुक्त संचार करण्यास मनाई राहील. सर्व नागरिक, आस्थापना, दुकाने यांनी मास्क असणे, हात सॅनीटाईज करणे आणि सामाजिक अंतर राखणे या कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे.  
. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदर नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था,संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिका-यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे

No comments:

Post a Comment