Wednesday 6 January 2021

DIO BULDANA NEWS 6.1.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 228 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 23 पॉझिटिव्ह

• 29  रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि. 6 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 251 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 228 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 23 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 22 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 162 तर रॅपिड टेस्टमधील 66 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 228 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  सिं. राजा शहर : 1, खामगांव तालुका : पळशी 1,  खामगांव शहर : 2, चिखली शहर : 1,  मोताळा तालुका : दाभाडी 1,  मोताळा शहर : 2, बुलडाणा शहर : 2, नांदुरा शहर :1, नांदुरा तालुका : अवधा बु 1,  शेगांव शहर : 9, शेगांव तालुका : जवळा 1, भोनगाव 1,      संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 23 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चिखली येथील 70 वर्षीय पुरूष व 65 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 29  रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  बुलडाणा : अपंग विद्यालय 12, दे राजा : 3, चिखली : 4, खामगांव : 9,  मोताळा : 1.

  तसेच आजपर्यंत 92283 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12289 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12289 आहे. 

  तसेच 771 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 92283 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12802 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12289  कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 358 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 155 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                            ******

फिट इंडीया मोहिमेअंतर्गत शाळा नोंदणीसाठी 10 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ

         बुलडाणा,(जिमाका) दि. 6 :   नागरीक व विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व बिंबविण्यासाठी केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सुचनेनुसार फिट इंडीया मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्‍यवस्थापनाच्या इयत्ता 1 ली ते 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीबाबत चाचणी होणे आवश्यक असुन, त्यासाठी  10 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.  यापुढे मुदत वाढवुन देण्यात येणार नाही.  त्यामुळे 10 जानेवारी 2021 पर्यंत शाळांनी नोंदणी न केल्यास त्यासाठी शाळा जबाबदार राहील असा इशारा जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी दिला आहे.  राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांतुन पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची तंदुरुस्तीबाबत चाचणी घेऊन शाळांनी त्याबाबत फिट इंडीया पोर्टल किंवा ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 

   याबाबत ॲपच्या माध्यमातुन प्रशिक्षण घेतले जाणार नाही आहे.  https://schoolfitness.kheloindia.gov.in/ stati cpage/landingpage.aspx या पोर्टलवर जाऊन करावी. यासाठी लॅपटॉप किंवा डेक्सटॉपचा वापर करावा. तसेच खेलो इंडीयाच्या ॲपवर इयत्ता 1 ली ते 12 वी च्या सर्व शाळांमधील शारीरिक शिक्षण विषयाच्या एका शिक्षकांनी नोंदणी करावयाची आहे, शाळेत शारीरिक शिक्षक उपलब्ध नसल्यास सबंधित प्राचार्यांनी/मुख्याध्यापक यांनी या कामासाठी एका सहा. शिक्षकाची नियुक्ती करावी. शाळा जर एक शिक्षकी असेल तर त्याच शिक्षकाने आपली नोंदणी करावी. नियुक्त शिक्षकाने Android फोनवर khelo India School Version हे ॲप डाऊनलोड करुन https://Play.google.com/store/apps/ developer?id= sports+athority+of+india या लिंकचा वापर करावा.  विद्यार्थ्यांची क्रीडा विषयक प्रशिक्षणे ॲपच्या माध्यमातुन होणार असल्याने नोंदणी करणे आवश्यक आहे. 

       नोंदणीची प्रक्रीया दि.10 जानेवारी 2021 पर्यंत पुर्ण करावी. नोंदणी करतांना सर्व जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, आय टी शिक्षकांनी यासाठी पुढाकार घेऊन शाळा व शिक्षक नोंदणीसाठी शाळांना सहकार्य करावे.  यापुर्वी शाळांची नोंदणी केली असल्यास पुन्हा करण्याची आवश्यकता नाही.  अशा सुचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्राचे संचालक राहुल व्दिवेदी यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शाळा/महाविद्यालय यांनी दि.10 जानेवारी 2021 पुर्वी नोंदणी कार्यक्रम राबवुन शासनाचा हा उपक्रम यशस्वीरित्या राबवावा असे आवाहन नोंदणी न झाल्यास संबंधीत संस्था / शाळा व मुख्याध्यापक जबाबदार राहतील  असे जिल्हा क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकुंद  यांनी केले आहे.

                                                            *******

कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करावे

· महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना

· जिल्हा उपनिबंधक यांचे आवाहन

बुलडाणा, दि. 6 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019 ही महत्वाकांक्षी योजना घोषित केलेली असून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या गावनिहाय याद्या टप्याटप्याने प्रसिध्द होत आहे. योजनेच्या निकषानुसार यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी महा ई-सेवा केंद्र/ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करणे गरजेचे आहे.

  आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिेया पुर्ण झाल्यानंतर योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही होते. आजरोजी जिल्हयामध्ये योजने अंतर्गत 1 लक्ष 78 हजार 683 शेतकऱ्यांच्या विशिष्ट क्रमांकासह याद्या प्रसिध्द झालेल्या आहेत. यापैकी 1 लक्ष 70 हजार 576 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरणाची कार्यवाही पुर्ण झालेली आहे. उर्वरीत 8 हजार 106  शेतकऱ्यांची अद्यापही आधार प्रमाणिकरण पुर्ण न केल्यामुळे योजनेच्या निकषानुसार सदरचे शेतकरी प्रलंबित आहेत.

   तरी ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेले असून अद्यापही आधार प्रमाणिकरण केलेले नाही अशा शेतकऱ्यांनी महा ई-सेवा केंद्र / ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टंन्सिग चे पालन करून तात्काळ आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पुर्ण करावी. तसेच कर्जमुक्तीच्या यादीमधील जे शेतकरी मयत आहेत, अशा शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचे वारसाने संबधीत बँकेमध्ये जावून त्यांची कर्जखात्यात वारस लावण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ महेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

*******

बुलडाणा उपविभागात संभाव्य 177 गावांमध्ये पाणीटंचाई घोषीत

• महाराष्ट्र भुजल अधिनियम या गावांमध्ये लागू

• बुलडाणा तालुक्यातील 65 व चिखलीमधील 112 गावांचा समावेश

बुलडाणा, दि. 6 (जिमाका) : बुलडाणा उपविभागातील बुलडाणा व चिखली तालुक्यात पाणी टंचाई भासण्याची शक्यता असणाऱ्या संभाव्य 177 गावांमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी पाणीटंचाई घोषीत केली आहे. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील 65 व चिखली तालुक्यातील 112 गावांचा समावेश आहे. सदर गावांमध्ये महाराष्ट्र भुजल अधिनियम 2009 लागू करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार अधिसूचित सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे 500 मिटरच्या अंतरामध्ये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रयोजनासाठी कोणत्याही विहीरीचे खोदकाम करणार नाही.

   भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतांभोवती निश्चित व अधिसुचित केलेल्या प्रभाव क्षेत्रात कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रयोजनासाठी विहीरीचे खोदकाम करणार नाही. प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून एक किलोमीटर अंतरामध्ये यापैकी जे अधिक असेल अशा क्षेत्रातील अशी विहीर तात्पुरती बंद करणे, भूजल काढण्यासाठी विहीत करण्याच्या दृष्टीने विनीयम करण्यात येईल. भूजल पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होईल अशी कोणतीही कृती कुणीही करणार नाही. या अधिनियमनातील विविध तरतुदींचा भंग झाल्यास दंड व शिक्षेकरीता संबंधित तहसिलदारांनी त्वरित अहवाल सादर करावयाचा आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे कायम व्यवस्थापन करण्यामध्ये आणि पाणी टंचाईच्या काळात स्त्रेातांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत जिल्हा प्राधिकरणास मदत करेल, असे उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांनी कळविले आहे.

*********

जळगांव जामोद उपविभागात ग्रामपंचायत निवडणूकीची आदर्श आचारसंहीता लागू

  • उमेदवारांना प्रचारवेळी वाहन ताफ्यात एकाच वाहनाची परवानगी
  • मतदान केंद्रांपासून 200 मीटर आत कोणताही मंडप, कार्यालय उभारण्यास बंदी
  • जागा मालकाच्या लेखी संमतीशिवाय पोस्टर्स, बॅनर लावू नये

बुलडाणा,(जिमाका) दि.6 : जळगांव जामोद उपविभागात जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने 18 जानेवारी 2021 पर्यंत आदर्श आचार संहीता लागू करण्यात आली आहे. आचार संहीतेचा भंग होवू नये या दृष्टीकोनातून फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 उपविभागात लागू करण्यात आले आहे. त्यानुसार जळगांव जामोद उपविभागात निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे कालावधीत उमेदवारांना प्रचाराचेवेळी त्यांचे वाहन ताफ्यात एकापेक्षा जास्त वाहन वापरता येणार नाही. तसेच निवडणूकीचे प्रचारासाठी वापरायचे वाहनांची परवानगी संपूर्ण ग्राम पंचायत क्षेत्रासाठी संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून घेणे आवश्यक आहे.

   प्रचार कार्यासाठी संबंधीत निवडणूक अधिकारी यांच्याकडे नोंदणी न करण्यात आलेले कोणतेही वाहन प्रचार कार्यासाठी वापरता येणार नाही. तसेच उपविभागात ग्रामपंचायत मतदान केंद्र, धार्मिक स्थळे, दवाखाने आणि शैक्षणिक संस्था यापासून 200 मीटरच्या आत कोणताही मंडप तथा कार्यालय उभारण्यास बंदी असणार आहे. तसेच जेथे एकाच मतदान केंद्राच्या ठिकाणी किंवा त्याच्या जागेत एकापेक्षा जास्त मतदान केंद्र असतील तेथे अशा मतदान केंद्रांच्या गटासाठी त्या जागेच्या 100 मीटरचे अंतरापलीकडे उमेदवाराचा केवळ एकच मंडपाला परवानगी आहे. उमेदवाराला ज्या ठिकाणी मंडप उभारावयाचा आहे त्या ठिकाणी 3 x 4.5 फुटाचा एक बॅनर वापरता येणार आहे. ज्या उमेदवाराला असे मंडप उभारावयाचे असतील अशा प्रत्येक उमेदवाराने ज्या मतदान केंद्रावर मंडप उभारावयाचे आहेत, त्या मतदान केंद्राचे नाव, अनुक्रमांक याबाबतची लेखी माहिती संबंधीत निवडणूक अधिकऱ्यांना आगाऊ कळवावी. असे मंडप उभारताना स्थानिक प्राधिकरणाकडून लेखी परवानगी घेतली पाहिजे. मतदारांना मतदान यादीतील अनुक्रमांक देण्याच्या एकमेव प्रयोजनाकरीताच केवळ या मंडपाचा वापर करण्यात आला पाहिजे. अशा मंडपामध्ये कोणत्याही परिस्थितीत गर्दी करण्यास मुभा असणार नाही. मतदान केंद्रातून मत देऊन बाहेर पडलेल्या व्यक्तीस मंडपात येण्याची मुभा असणार नाही. मंडप सांभाळणाऱ्या व्यक्तींनी मतदान केंद्राकडे जाणाऱ्या मतदारांच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण करण्यास किंवा त्यांना दुसऱ्या उमेदवारांच्या मंडपात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

   उपविभागात निवडणूकीत सर्व राजकीय पक्ष, संघ, संस्थाने उमेदवार, प्रतिनिधी यांनी सार्वजनिक जागा, शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे इमारत व जागेवरील लावलेली भिंतीपत्रके, फलक, पोस्टर्स, बॅनर्स कट आऊट त्वरित काढून टाकावीत. तसेच खाजगी जागा, इमारतीवरील संबंधीत जागा मालकाचे लेखी संमतीशिवाय लावलेली भिंतीपत्रके, फलक, पोस्टर्स, बॅनर्स, कट आऊट त्वरित काढून टाकावीत. उपविभागात मतदानाचे दिवशी मतदान केंद्र व परीसरात जमाव करण्यास, मतदारांना घाबरविण्यास, बळजबरीने मतदान करण्यास किंवा मतदान न करण्यास प्रवृत्त करणे, उमेदवाराच्या निवडणूक चिन्हाचे प्रदर्शन करणे, मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करणे, वाहनांचा प्रवेश, मतदान केंद्रामध्ये अनधिकृत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

     उपविभागात ग्रामपंचायत निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिल कार्यालय येथून होणार असल्याने व तहसिल कार्यालयात मतमोजणी केंद्र व सुरक्षा कक्ष प्रस्तावित असल्याने तहसिल कार्यालयाच्या आवारात केवळ 4 व्यक्तींना परवानगी असणार आहे. तसेच मिरवणूकीने येत असल्यास निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयापासून 100 मीटरचे आत मिरवणूक थांबविणे बंधनकारक असणार आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्षात कोविड 19 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार 4 पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेशास बंदी असणार आहे. तथापी हा आदेश मतदानाशी संबंधीत अधिकारी, सर्व पोलीस अधिकारी, सुरक्षा पथकातील कर्मचारी, निवडणूक निरीक्षक यांना लागू असणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, असे जळगांव जामोदचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कु. वैशाली देवकर यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment