Friday 15 January 2021

DIO BULDANA NEWS 15.1.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 694 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 36 पॉझिटिव्ह

• 26  रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि. 15 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 730 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 694 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 36 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 29 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 584 तर रॅपिड टेस्टमधील 110 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 694 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 10, बुलडाणा तालुका : भादोला 1, शेलसूर 1,   चिखली शहर : 4, चिखली तालुका : अंत्री खेडेकर 1, नांदुरा शहर : 2,  दे. राजा शहर : 2, मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : सारोळा मारोती 1, मेहकर तालुका : कल्याणा 1, लोणार शहर : 4, सिं. राजा तालुका : दुसरबीड 1,  शेगांव शहर : 7  येथील संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 36 रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे नांदुरा रोड, मोताळा येथील 50 वर्षीय महिला रूग्णाचा उपचारादरम्यान स्त्री रूग्णालय येथे मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 26 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  सिं. राजा : 1, खामगांव : 1, चिखली : 7, नांदुरा : 1, बुलडाणा : अपंग विद्यालय 7, स्त्री रूग्णालय 7, मेहकर : 1, लोणार : 1.  

  तसेच आजपर्यंत 96134 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12720 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12720 आहे. 

  तसेच 556 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 96134 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13205 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12720 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 327 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 158 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                                                    *******

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

  बुलडाणा,(जिमाका) दि. 15 : राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी 2021 रोजी साजरा करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे या दिनाचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोगाचे माहिती, निवडणूक विषयक प्रश्नांवर आधारीत प्रश्न मंजुषा परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रश्नमंजुषा ही गुगल फॉर्मवर ऑनलाईन पध्दतीने राहणार आहे. त्यासाठी 10 प्रश्न असणार आहेत. या गुगल फॉर्मसाठी https://forms.gle/aEBQyPo2CkXkhDJp7 या लिंकचा उपयोग करून प्रथम पानावर आपली वैयक्तीक सर्व माहीती भरण्यात यावी. त्यानंतर आपणास प्रश्नपत्रिका निदर्शनास येईल. त्यानंतर सदर परिक्षा ही आपल्याला योग्य त्या पर्यायावर क्लीक करून ऑनलाईन पध्दतीने सोडवायची आहे.

    सदर परिक्षा आपण दिनांक 24 जानेवारी 2021 पर्यंत सोडवू शकता. ज्यांना या परीक्षेत 50 टक्के किंवा 50 टक्केपेक्षा जास्त गुण मिळतील अशा सर्व स्पर्धकांना सहभागबाबतचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्वाक्षरीचे  प्रमाणपत्र ई मेल वर तात्काळ प्राप्त होणार आहे.  तरी या ऑनलाईन क्वीज स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

                                                            **********


शिजविलेले चिकन व उकळलेली अंडी खा; बर्ड फल्यूला घाबरू नका

  • जिल्हा प्रशासनाचे आवाहन
  • पशुसंवर्धन विभागाने प्रात्याक्षिकातून दिला संदेश

  बुलडाणा,(जिमाका) दि. 15 : पक्ष्यांवर घोंघावत असलेल्या बर्ड फ्ल्यूच्या संकटाला न घाबरता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासन नियमित रित्या करीत आहे. जिल्ह्यात सध्या तरी कुठलाही पक्षी बर्ड फ्ल्यूने बाधीत नाही. या रोगापासून घाबरून जाण्याची गरज नाही. पुर्ण शिजविलेले चिकन व उकळलेली अंडी खाल्ल्याने बर्ड फ्ल्यू होत नाही. हा संदेश देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आज 15 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात शिजविलेले व तयार केलेले चिकन, उकळलेली अंडी खावून प्रात्याक्षिक केले.  यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हाधिकारी भुषण अहीरे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुनील शेळके, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी.जी बोरकर, नायब तहसीलदार श्री. पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ठाकरे, सहा आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सोळंके आदींनी शिजविलेले चिकन व अंडी खावून बर्ड फ्ल्यू न घाबरण्याचे आवाहन केले.

  जनतेने न घाबरता काळजी घेत पुर्ण शिजविलेले चिकन व उकळलेले अंडी खावी. कुठल्याही अफवांना बळी पडू नये. या प्रात्याक्षिकातून पशुसंवर्धन विभागाने जनतेला संदेश न घाबरता सावधगिरी बाळण्याचा संदेश दिला. डॉ. बोरकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.  याप्रसंगी पशुधन विकास अधिकारी डॉ. पाटील, डॉ. चोपडे, डॉ. धिरज सोनटक्के, पशुधन विकास अधिकारी जिल्हा परिषद डॉ. दिवाकर काळे, बायएफ व पोल्ट्री फॉर्मचे डॉ रवींद्र उगले, पशुधन विकास अधिकारी डॉ वैशाली उईके, डॉ. ज्योती गवई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.  

                                                            *************

कौटुंबिक न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा

  बुलडाणा,(जिमाका) दि. 15 : कौटुंबिक न्यायालय येथे 14 ते 28 जानेवारी दरम्यान साजरा केल्या जाणारा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी न्यायाधीश अशोक ढुमणे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख पतसंस्थेचे व्यवस्थापक गजानन राऊत, न्यायालयाचे समुपदेशक जगन्नाथ कांबळे उपस्थित होते.

  यावेळी न्यायाधीश श्री. ढुमणे यांनी न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांना मराठी भाषेत न्यायालयाचे कामकाज समजण्यासाठी न्याय निर्णय मराठी भाषेत देण्यात येत असल्याचे सांगितले. अन्य मान्यवरांनी मराठी भाषेच्या वापराविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कोविड 19 मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात आले. कार्यक्रमासाठी पक्षकार, विधीज्ञ एन. बी साखरे, प्रबंधक डी. सी तोमर, एस एम पिंगळे, एस व्ही मानकर, पी. डी पंडीत, पी. जी भागवत, शेख असलम व पी. डी तायडे उपस्थित होते. संचलन एलएन मोहरीर यांनी केले.

                                                            ***** 



जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 3.30 वाजेपर्यंत 63.84 टक्के मतदान

  बुलडाणा,(जिमाका) दि. 15 : जिल्ह्यात 498 ग्रामपंचायतीसाठी आज 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. या मतदानातून 3 हजार 891 उमेदवारांचे भाग्य मशीनबंद करण्यात आले. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व उत्साहात मतदान पार पडले.  सकाळपासूनच मतदारांचा उत्साह या गावपातळीवरील लोकशाहीच्या उत्सवात दिसला. या मतदानाची मतमोजणी 18 जानेवारी रोजी संबंधीत तहसिल कार्यालयात होणार आहे. आज झालेल्या मतदानात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 63.84 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. मतदानाची वेळ सायं 5.30 पर्यंत असल्यामुळे अंतिम आकडेवारी उशिरा प्राप्त होणार आहे.

  जिल्ह्यात या मतदानासाठी 4 लक्ष 82 हजार 458 स्त्री मतदार तर 4 लक्ष 88 हजार 209 पुरूष मतदार होते. एकूण 9 लक्ष 70 हजार 667 मतदार संख्या होती. त्यापैकी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 3 लक्ष 11 हजार 312 स्त्री मतदारांनी तर 3 लक्ष 8 हजार 323 पुरूष अशा एकूण 6 लक्ष 19 हजार 635 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. या मतदानाची स्त्री मतदारांची टक्केवारी 64.53, पुरूष मतदारांची 63.15 एकूण टक्केवारी 63.84 आहे. 

No comments:

Post a Comment