Friday 8 January 2021

DIO BULDANA NEWS 8.1.2021

 

वस्तू व सेवा कर कायद्यान्वये नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी नोंदणी प्रमाणपत्र प्रदर्शीत करावे

*कायद्यान्वये आवश्यक बाबींचे पालन करण्याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 8:  महाराष्ट्र वस्तू व सेवकर कायदा 2017 अन्वेय नोंदीत सर्व व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कराच्या नियम 18 व आपसमेळ योजनेअंतर्गत असलेल्या व्यापाऱ्यांनी नियम 5 (1) (च) नियम 5 (1) (छ) नुसार आवश्यक बाबीची पुर्तता करावी नियमानुसार शर्तीचे अनुपालन करणे आवश्यक आहे. नियम 18 धंदा, व्यवसायाच्या मुख्य ठिकाणी आणि प्रत्येक अतिरिक्त ठिकाणी ठळक जागी नोंदणी प्रमाणपत्र प्रदर्शित करणे बंधनकारक आहे.

   तसेच नामफलकावर वस्तू व सेवाकर ओळखपत्र क्रमांक प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. नियत 5 (1) (च) आपसमेळ योजनेतील व्यापाऱ्यांनी(composition taxpayer) पुरवठा देयकाच्या शिर्ष भागात आपसमेळ करपात्र व्यक्ती (composition taxpayer) पुरवठयावर कर गोळा करण्यास पात्र नाही, असे नमुद करणे अनिवार्य आहे. नियम 5 (1) (छ) आपसमेळ योजनेतील व्यापाऱ्यांनी धंदयाच्या मुख्य ठिकाणी किवा प्रत्येक अतिरिक्त ठिकाणी ठळक जागेवर प्रदर्शित केलेल्या प्रत्येक सुचनेत किंवा नामफलकावर आपसमेळ करपात्र व्यक्ती असा मजकुर नमुद करणे आवश्यक आहे.

     तसेच तरतुदीचे पालन न करणारी नोंदीत व्यक्ती महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा 2017 कलम 122 (1) (एक) अन्वये रुपये 10 हजार  व कलम 125 अन्वेय रुपये 25 हजार  इतक्या शास्तीस (दंड) पात्र असेल. तसेच शास्तीची अप्रिय कार्यवाही टाळण्यासाठी सर्व नोंदीत व्यक्तींनी बाबींची तातडीने पुर्तता करावी, असे राज्यकर उपआयुक्त वस्तू व सेवाकर कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

**********


पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत कोविड लसीकरणाची रंगीत तालीम

  • लाभार्थ्यांना दिली लस

बुलडाणा, (जिमाका) दि. 8:  शासनाच्या निर्देशानुसार लवकरच कोविड 19 या साथरोगाची लस उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय व खाजगी आरोग्य संस्था येथील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे.  ही लस देण्यासाठीची पुर्वतयारी म्हणून जिल्ह्यात चार ठिकाणी आज 8 जानेवारी 2021 रोजी रंगीत तालीम करण्यात आली. जिल्हा सामान्य रूग्णालयातील लसीकरण कक्षामध्ये राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत कोविड लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली. यावेळी पालकमंत्री  यांच्याहस्ते लसही देण्यात आली. याप्रसंगी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते.

     त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, डोणगांव ता. मेहकर येथे प्र. जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या उपस्थितीत कोविड लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली.  तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सोनाळा ता. संग्रामपूर, ग्रामीण रूग्णालय दे. राजा येथेही कोविड लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. कोविड लसीकरणासाठी सर्व ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली. वेंटींग रूम, लसीकरण कक्ष व निरीक्षक कक्ष या त्रीस्तरीय रचनेतून लसीकरण सत्राच्या रंगीत तालमीला सुरूवात करण्यात आली. नोंदणीकृत लाभार्थ्यांच्या मोबाईल क्रमांकावर लसीकरण तारिख, वेळ व ठिकाणचा मॅसेज पाठविण्यात आला. त्यानंतर वेटींग रूममध्ये मॅसेची पडताळणी केल्यानंतर लाभार्थ्याची खात्री करण्यात आली. दुसऱ्या कक्षात प्रत्यक्ष लस देण्यात आली तर तिसऱ्या कक्षात 30 मिनीटांसाठी लाभार्थ्याला निरीक्षणासाठी बसविण्यात आले. अशा पद्धतीने लसीकरण पार पडले.  लसीकरण रंगीत तालीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी  प्रयत्न केले.

  रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून समाज ऋण फेडण्याची संधी

-          पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

  • पत्रकार भवन येथे रक्तदान शिबिर

बुलडाणा, (जिमाका) दि. 8:  समाजाचे वेगवेगळे ऋण प्रत्येकावर असतात. कोविडच्या काळात या ऋणांचे महत्व अधिकतेने पुढे आले. आपण समाजाला काही देणे लागतो. या भावनेतून हे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच भावनेतून पत्रकारांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून या माध्यमातून समाज ऋण फेडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, असे प्रतीपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. बुलडाणा टिव्ही जिल्हा टिव्ही जर्नालीस्ट असोसिएशनच्यावतीने जिल्हा पत्रकार भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

   सदर शिबिर उद्घाटन कार्यक्रमाला उद्घाटक पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उपसिथत होते. कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  याप्रसंगी व्यासपीठावर आमदार संजय गायकवाड, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, बुलडाणा अर्बन सोसायटीचे राधेश्याम चांडक, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरूण जैन, टिव्ही जर्नालीस्ट असोसिए शनचे अध्यक्ष वसीम शेख, सचिव युवराज वाघ, संदीप शेळके आदी उपस्थित होते.

    पालकमंत्री पुढे म्हणाले, कोविड काळात पत्रकारांनी  उत्कृष्ट काम करीत समाजाला जागृत करण्याचे काम केले.  त्यामुळे कोरोना विषाणू विरोधात जनजागृती  होण्याचे मोलाची मदत झाली. पत्रकारांकडून रक्तदान शिबिरासारखा स्तुत्य उपक्रम आयोजित केलेला आहे. मागील काळात  रक्ताचा तुटवडा राज्यात होता . त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत चांगल्या प्रकारे रक्त संकलन राज्यात होत आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने सातत्याने प्रयत्न केले. त्यामध्ये यशही मिळत आहे.

   आमदार संजय गायकवाड यावेळी म्हणाले, कोविड काळात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या व माणुसकी जिवंत असणाऱ्या घटना सातत्याने अनुभवास आल्या. कोविडने मृत्यू झालेला असल्यास त्याचे प्रेतही नातेवाईक घेत नव्हते. आपलेस आपल्या दूर सारत असल्याचा हृदयद्रावक अनुभव आला. मात्र काहींनी या कठीण काळात माणुसकी जागविणारे काम केले. रक्तदान करून कोविड रूग्णांना आवश्यकतेनुसार रक्तही त्याकाळात पुरविल्या गेले.

    रविकांत तुपकर यावेळी म्हणाले,  अगदी तुटपुंज्या पगारावर किंवा मानधनावर पत्रकार काम करीत असतात. कोविडच्या परिस्थितीत केवळ पगारासाठी काम न करता व आपले आरोग्य धोक्यात घालून पत्रकारांनी वार्तांकन केले. हे खरेच कौतुकास्पद आहे. केवळ चरितार्थासाठी काम न करणारे पत्रकार हे खरोखरच समाजसेवकच आहेत. राधेश्याम चांडक यावेळी म्हणाले, बुलडाणा अर्बन भविष्यात रूग्णसेवेसाठी चॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मिती करणार आहे. या माध्यमातून गरीब रूग्णांची सेवा करण्याची संधी संसथेला मिळेल. रक्तदान हे महत्वाचे दान आहे. या दानामुहे लोकांचे जीव वाचतात. असे पवित्र कार्य पत्रकारांनी हाती घेतले ही स्तुत्य बाब आहे.

   यावेळी असोसिएशनच्यावतीने नगर परिषद आदर्श उर्दू शाळेचे मुख्याध्यापक रयसोद्दीन काजी, संचेती हृदयालयाचे डॉ. संचेती, पत्रकार गजानन धांडे यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सचिव युवराज वाघ यांनी केले. प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष वसीम शेख यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन संदीप वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी, टि व्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                                                                    **********     

कोरोना अलर्ट : प्राप्त 523 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 21 पॉझिटिव्ह

• 35  रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि. 8 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 544 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 523 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 21 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 19 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 432 तर रॅपिड टेस्टमधील 91 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 523 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  दे.राजा शहर : 1, सिं. राजा तालुका : पळसखेड चक्का 1, खामगांव शहर : 6, खामगांव तालुका : हिवरा 1, सुटाळा खु 1, मांडका 1, बुलडाणा शहर : 1, चिखली तालुका : कोलारा 1, चंदनपूर 1, काटोडा 1,  चिखली शहर : 4, लोणार शहर : 1, संग्रामपूर तालुका : वसाडी 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 41 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान कल्याणा ता. मेहकर येथील 69 वर्षीय पुरूष  रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 35 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  दे. राजा : 11, जळगांव जामोद : 2, लोणार : 1, शेगांव : 9, बुलडाणा : स्त्री रूग्णालय 1, अपंग विद्यालय 4,  आयुर्वेद महाविद्यालय 2,  मोताळा : 1, सिं. राजा : 3,  खामगांव : 2,   

  तसेच आजपर्यंत 93148 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12382 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12382 आहे. 

  तसेच 730 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 93148 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12864 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12382 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 325 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 157 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

*********

                                               

 

 

No comments:

Post a Comment