Wednesday 27 January 2021

DIO BULDANA NEWS 27.1.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 1625 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 44 पॉझिटिव्ह

• 89 रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि. 27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1709 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1625 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 44 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 40 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1561 तर रॅपिड टेस्टमधील 64 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1625 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :   चिखली शहर : 8, चिखली तालुका : अंत्री खेडेकर 1, मुंगसरी 1, चांधई 1,  खामगांव तालुका : जळका भडंग 1, मेहकर शहर : 11, बुलडाणा शहर : 10, मोताळा तालुका : परडा 1, मोताळा शहर : 1, नांदुरा तालुका : अंभोडा 1, जवळा 1, संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, दे. राजा शहर : 2, दे. राजा तालुका : दे. मही 2,  जळगांव जामोद शहर : 1,  मूळ पत्ता जाफ्राबाद जि. जालना  येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 44 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान संभाजी नगर, चिखली येथील 35 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 

      तसेच आज 89 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  बुलडाणा : 8, सिद्धीविनायक हॅस्पीटल 17, स्त्री रूग्णालय 5, अपंग विद्यालय 11, मलकापूर : 8, दे. राजा : 9,  लोणार : 1,  मेहकर : 2, खामगांव : 17, मोताळा : 3, चिखली : 8.   

  तसेच आजपर्यंत 105139  रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13332 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 13332 आहे. 

  तसेच 2072 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 105139आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13745 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 13332 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 246 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 167 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                                        **********



पलढग धरणाच्या जलाशयात दोन इंजिन बोटींचे उद्घाटन

  बुलडाणा,(जिमाका) दि. 27 : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 26 जानेवारी रोजी ज्ञानगंगा अभयारण्यातील पलढग धरणाच्या जलाशयामध्ये दोन इंजिन बोटींचे केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. पर्यटन विकास योजने अंतर्गत ज्ञानगंगा अभयारण्याच्या सर्वागीण विकासासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामधून मौजे तारापूर जवळील पलढग धरणाच्या क्षेत्रामध्ये वनपर्यटकांसाठी 52 लक्ष रु.च्या दोन इंजिन बोटीचे उदघाटन करण्यात आले.  तसेच वन-पर्यटकांसाठी महिला बचत गट अंतर्गत उपहारगृहाचेसुध्दा उदघाटन करण्यात आले.

 

याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित ज्ञानगंगा अभयारण्य क्षेत्रातील बांधवांशी  संवादही साधला. कार्यक्रमासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माधवराव जाधव, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती चे मुख्य वनसंरक्षक एम एस रेड्डी, ज्ञानगंगा अभयारण्य प्रकल्पाचे डि.सी.एफ. श्री. खैरनार, उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, तारापूर चे संरपच प्रविण जाधव, योगेश जाधव डॉ. गोपाल डिके, राहूल सोळंके, प्रविण निमकरडे, बाळु जाधव आदींसह वनपरिक्षेत्र अभयारण्यचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

                                                                        *************


पल्स पोलीओ लसीकरण मोहिम यशस्वीरित्या राबवावी

-          जिल्हाधिकारी

  • जिल्ह्यात 31 जानेवारी 2021 रोजी पल्स पोलीओ लसीकरण
  • 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलीओचा डोस पाजण्यात येणार

  बुलडाणा,(जिमाका) दि. 27 : जिल्ह्यात पल्स पोलीओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत 31 जानेवारी 2021 रोजी पल्स पोलीओ लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना 31 जानेवारी रोजी पोलीओ डोस पाजण्यात येणार  आहे. तरी ही लसीकरण मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पल्स पोलीओ लसीकरण मोहिम जिल्हा समन्वय समितीची सभा आज 27 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

   याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. गोफणे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यात सर्व गावे, वाड्या, वस्ती, तांडे, विटभट्टी, मेंढपाळ, आदिवासी कुठल्याही स्तरावरील बालक वंचित राहणार नसल्याची काळजी घेण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाले, लसीकरण झालेल्या सर्व बालकांच्या डाव्या करंगळीवर मार्कर पेनने खुण करण्यात यावी. यासाठी मोबाईल पथक, ट्रान्सीट टिम आदी सज्ज ठेवाव्यात.

 जिल्ह्यात ग्रामीण भागात 1 लक्ष 95 हजार 387 बालके असून शहरी भागात 59 हजार 120 बालके आहेत. अशाप्रकारे एकूण 2 लक्ष 54 हजार 507 लाभार्थी बालके अपेक्षीत आहे. सर्व बालकांना लसीकरणासाठी 2139 बुथची व्यवस्था करण्यात आली आहे.  लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागासोबतच विविध विभागातून एकूण 5343 कर्मचाऱ्यांचे सहकार्य राहणार आहे. त्यासाठी 412 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 130 मोबाईल टिम, 148 ट्रान्झीट टिम नियुक्त करण्यात आल्या आहेत.

                                                                                ****************

  


आयुष्यमान भारत व जन आरोग्य योजनेत उल्लेखनीय

           कामगिरी केलेल्या रूग्णालयांचा गौरव

  बुलडाणा,(जिमाका) दि. 27 : जिल्ह्यात कोरोना महामारी काळात एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली. या योजनेत संलग्नीत असलेल्या उल्लेखनिय कामगिरी केलेल्या रुग्णालयांना 26 जानेवारी 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हाधिकारी एस. रामामूर्ति  यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

      याप्रसंगी जिल्हा समन्वयक डॉ.विवेक सावके, जिल्हा प्रमुख चेतन जाधव, जिल्हा पर्यवेक्षक कुणाल सुरडकर व संबंधित सर्व रुग्णालयांचे वैद्यकीय  समन्वयक आणि शिबीर समन्वयक उपस्थित होते. कोरोना काळात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या योजनांमध्ये संलग्नीत असलेल्या शासकीय रुग्णालय व खाजगी रुग्णालयांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील सर्व अंगीकृत रुग्णालये राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरण, राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व जिल्हा प्रशासन यांच्या  मार्गदर्शक तत्त्वावर कामगिरी नियमितरित्या करीत असतात.  या योजनांच्या एकत्रित प्रगतीस पुरक  व ईतर  रूग्णालयांचा योजनेमध्ये कामगिरी सुधारण्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे, असे प्रतीपादन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

                                                                                                *************

 

 

 

No comments:

Post a Comment