Thursday 14 January 2021

DIO BULDANA 14.1.2021

      


संत चोखामेळा यांना पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले अभिवादन

बुलडाणा,(जिमाका) दि. 14 : संत चोखामेळा यांच्या जयंतीनिमित्ताने 13 जानेवारी रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी मेहुणा राजा येथे त्यांच्या शिल्पाला अभिवादन केले.  कोरोनाच्या  संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संत चोखामेळा यांचा जन्मोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होत आहे.

      यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, मेहुणा राजा विकास आराखड्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. विकास आराखड्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, अशा सूचनाही संबंधीतांना दिल्या. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जन्मोत्सव कमीत कमी गर्दीत व साधेपणाने साजरा होत असल्याबद्दल आभार मानले.  

*********

 


  जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री यांची आरोग्य मंत्र्यासमवेत मंत्रालयात बैठक

बुलडाणा,(जिमाका) दि. 14 : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या पायाभूत सोयी सुविधा व वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषयांसाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मुंबई स्थित मंत्रालयातील समिती सभागृहात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लवकरच मार्गी लावला जाईल,  असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.

   यावेळी आरोग्‍य मंत्री यांनी साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालयासाठी निधी वितरित केला  असल्याचे सांगितले. तसेच या ग्रामीण रूग्णालयासाठी निविदा काढण्यात यावी असेही संबंधीत अधिकाऱ्यांना सुचीत केले.  त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शासकीय निवासस्थाने बांधण्यासाठी लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता दिली जाईल, असेही सांगितले.

    ज्या प्रा आरोग्य केंद्रासाठी जागेची अडचण आहे,  त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांना अवगत करावे. तसेच जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या जागेचा  प्रश्न मार्गी लावावा. असा निर्णय घेण्यात आला.

    जिल्ह्यात 9 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व 58 उपकेंद्र  स्थापित करण्याचत येणार आहे. या सर्वांचे प्रस्ताव 31 जानेवारी 2021 पूर्वी सादर केले जातील, असे सहसंचालक आरोग्य यांनी बैठकीदरम्यान सांगितले. बैठकीला आरोग्य विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.

**********

   बर्ड फ्ल्यू प्रादुर्भावाबाबत घाबरून जावू नका

  • प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि. 14 : सध्या बर्ड फ्ल्यू आजाराबाबत घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र याबाबत काळजी घेतली पाहिजे. जिल्ह्यात एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्ष्यांना उघड्या हाताने स्पर्श करू नये. असे निदर्शनास आल्यास जिल्हा किंवा विभागीय नियंत्रण कक्षास तातडीने कळविण्यात यावे. काळजी घेताना कुणीही पक्षी स्त्रावासोबत स्पर्श करू नये. पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे व ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जंन्ट पावडरने धुवावी. शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावावी. कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना हात पाणी व साबणाने वारंवार धुवावे, व्यक्तीगत स्वच्छता राखावी  व परिसर स्वच्छ ठेवावा. कच्चे चिकन / चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करावा. पुर्ण शिजविलेल्या अर्थात 100 डिग्री सेल्सीअसला शिजविलेल्या मांसाचाच खाण्यात वापर करावा. आपल्या परीसरात तलाव असेल व त्या तलावात पक्षी येत असतील तर या ठिकाणी सुयोग्य प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी वन / पशुसंवर्धन विभागस कळविण्यात यावे.

  या काळात कच्चे चिकन अथवा कच्ची अंडी खावू नका. अर्धवट शिजलेले चिकन, अर्धवट उकडलेले अंडी खावू नका, आजारी दिसणाऱ्या, सुस्त्‍ पडलेल्या पक्षाच्या संपर्कात येवू नका, पुर्णपणे शिजलेले मांस व कच्चे मांस एकत्र ठेवू नका, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

                    ***************

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावलीसाठी सुचना आमंत्रित

बुलडाणा,(जिमाका) दि. 14 : शिवछत्रपती राज्य पुरस्कार प्रतीवर्षी शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती खेळाडू/साहसी/दिव्यांग खेळाडू पुरस्कार देण्यात येतात.  याबाबत नियमावली शासन निर्णय दि. 24 जानेवारी 2020 नुसार निर्गमित केलेले आहे.  यामध्ये नियमावलीमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे.

       शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांच्याकडून सुचना व अभिप्राय दि.22 जानेवारी 2021 पर्यंत मागविण्याचे शासनाने निर्देशित केलेले आहे.  पुरस्काराच्या प्रस्तावित सुधारणा नियमावलीची प्रत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. पुरस्कार नियमावलीच्या प्रस्तावित सुधारणांबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांनी आपल्या सुचना /अभिप्राय  dsysdesk14@gmail.com किंवा desk14.dsys-mh@gov.in या मेलवर दि. 22 जानेवारी 2021 रोजी पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालय  यांचेमार्फत करण्यात येत आहे.

        अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालीय, विभागीय उपसंचालक कार्यालय अथवा  क्रीडा व युवक सेवा संचवालनालय, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे यांचेशी संपर्क साधवा असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                                                **********

कोरोना अलर्ट : प्राप्त 425 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 53 पॉझिटिव्ह

• 55  रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि. 14 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 478 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 425 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 53 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 45 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 324 तर रॅपिड टेस्टमधील 101 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 425 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मलकापूर शहर : 9, बुलडाणा शहर : 10, बुलडाणा तालुका : पाडळी 1, चिखली शहर : 3,  चिखली तालुका : चंदनपूर 2, अंत्री खेडेकर 1, मोताळा शहर  : 1,  खामगांव शहर : 14,  खामगांव तालुका : पाटोदा 1, शेगांव शहर : 1, सिं. राजा शहर : 2, सिं. राजा तालुका : गिरोली 1, नसिराबाद 1, दे .राजा शहर : 5, दे. राजा तालुका : दे. मही 1 येथील संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 53 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 55 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  जळगांव जामोद : 2,  चिखली : 2, लोणार : 1,  सिं. राजा : 3, संग्रामपूर : 3, खामगांव : 19, दे. राजा : 12, शेगांव : 12, मलकापूर : 1,  

  तसेच आजपर्यंत 95440 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12694 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12694 आहे. 

  तसेच 840 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 95440 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13169 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12694 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 318 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 157 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

*********

खरीप हंगाम 2021 मध्ये शेतक-यांनी स्वतः कडील सोयाबीन बियाणे वापरावे

  • कृषि विभागाचे आवाहन

      बुलडाणा,(जिमाका) दि. 14 : सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातुन येणारे बियाणे पुढील 2 वर्षापर्यंत वापरात येते. शेतक-यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. मागील दोन वर्षात शेतकयांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासुन उत्पादित झालेले सोयाबीन चालु वर्षी बियाणे म्हणून शेतकरी वापरु शकतात.

    तसेच ग्रामबिजोत्पादन,पीक प्रात्याक्षिके योजनांतर्गत शेतकरी समूह यांचेकडून आलेल्या उत्पन्नातुन बियाण्यांची निवड करता येते. प्रमाणित बियाण्यांपासून आलेल्या उत्पादनातून चाळणी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजुक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते. त्यामुळे त्याची उगवण क्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळतांना काळजी घ्यावी, बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्क्यापेक्षा जास्त नसावे. साठवणुकीसाठी प्लास्टीक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवतांना त्याची थप्पी 7 फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्‍यावी, बियाणे हाताळतांना जास्त प्रमाणात आदळ आपट होणार नाही, याची दक्षता घ्यावी.  प्रति हेक्टरी बियाणे दर कि 50 ते 55 किलोवर आण्यासाठी टोकन पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. तसेच  75 ते 100 मि.मि. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. त्याचप्रमाणे सोयाबीन बियाण्याची पेरणी 3 ते 4 सेंटी मीटर खोलीपर्यंत करावी.

      पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणु संवर्धकाची प्रत्येकी  200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे नंतर त्याची पेरणी करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

000000

                                               

कोविड लसीकरण मोहिमेत नोंदणीकृत लाभार्थ्यांनी लस घ्यावी

-         जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

  • 16 जानेवारीपासून 6 लसीकरण केंद्रावर लसीकरण
  • कोविशिल्ड लसीचे दोन डोस मिळणार
  • पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील घटकांना लसीकरण

    बुलडाणा,(जिमाका) दि. 14 : जिल्ह्यामध्ये कोवीड 19 प्रतिबंधात्माक उपायोजना अंतर्गत कोवीड 19 तपासणी,  रुग्णावर उपचार करणे व कोवीड 19 विषाणूचा पार्दुभाव होऊ नये याकरीता त्रिसुत्री म्हणजे मास्क लावणे, वारंवार साबणाने हात धुणे व सामाजिक दुरी ठेवणे यामुळे जिल्ह्यामध्ये कोवीड 19 विषाणूचा पार्दुभाव नियंत्रणामध्ये ठेवण्यात यश आले. परंतु कोवीड 19 विषाणूचा नायनाट करणे हे आपले ध्येय आहे. त्या दुष्टीने जिल्ह्यामध्ये कोविशिल्ड लसीचे लसीकरण टप्प्या टप्प्याने करण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेत नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. तरी टप्प्याटप्प्यानुसार नोंदणीकृत लाभार्थ्यांनी लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे.  

    जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.

      पहिल्या फेरीमध्ये शासकीय व खाजगी आरोग्य संस्थेमध्ये कार्यरत मनुष्यबळ यांना लसीकरण करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या सुचनेनुसार जिल्ह्यामध्ये लसीकरण सत्रामध्ये को विन ॲपवर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांच्या नोंदणीची पडताळणी करण्यासाठी प्रतिक्षा कक्ष,  प्रत्यक्षात लस देण्यासाठी लसीकरण कक्ष  व लसीकरणानंतर 30 मिनीटे थांबण्यासाठी निरीक्षण कक्ष अशा त्रिस्तरीय रचनेमध्ये  लसीकरण केंद्र असणार आहे.

   लसीसाठी नोंदणीकृत लाभार्थ्याच्या मोबाईल क्रमांकावर लसीकरणाची तारिख, वेळ व ठिकाणचा एसएमएस पाठविला जाणार आहे.  त्यानंतर सदर लाभार्थ्याच्या  नोंदीची खात्री लसीकरण केंद्रावर करण्यात येणार आहे. त्यानंतर ओळखीचा पुरावा तपासून नंतर प्रत्यक्ष लस देण्यात येणार आहे.  जिल्ह्यात 19 हजार लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. या लसीकरणाचे उद्घाटन 16 जानेवारी रोजी जिल्ह्यात जिल्हा सामान्य रूग्णालय बुलडाणा, सामान्य रूग्णालय खामगांव, ग्रामीण रूग्णालय दे. राजा, उपजिल्हा रूग्णालय मलकापूर, शेगांव व चिखली येथे या सहा ठिकाणी लसीकरणाला सुरूवात होणार आहे.

      लस ही उजव्या दंडाच्या वरील बाजूस देण्यात येणार आहे. लसीचे इंजेक्शन हे ऑटो डिजीबल आहे. त्यामुळे एका इंजेक्शनने एकाच व्यक्तीला लस दिली जाईल. पहिली लस दिल्यानंतर दुसरी लस 28 दिवसानंतर देण्यात येणार आहे. दुसऱ्या डोससाठीही लाभार्थ्यांना एसएमएस पाठविण्यात येणार आहे. दुसऱ्या डोसनंतर 15 दिवसांनी कोविड आजाराशी लढण्यासाठी प्रति पिंड शरीरात तयार होणार आहेत. त्यामुळे लस घेतल्यानंतर कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजना जसे मास्क वापरणे, सामाजिक अंतर व हात धुणे किंवा सॅनीटाईज करणे या त्रिसुत्रींचा अवलंब करावा लागणार आहे.  

         जिल्ह्यामध्ये एकूण 646 आरोग्य संस्थामध्ये 13960 डॉक्टर व आरोग्य सेविका आरोग्य कर्मचारी यांना पहिल्या फेरीमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणानंतर काही गुंतागुंत निर्माण झाल्यास त्वरित रूग्णवाहिकेद्वारे संबंधीत शासकीय किंवा खाजगी रूग्णालयात उपचाराची सुविधा असणार आहे.

अफवा पसरविल्यास गुन्हा दाखल करणार

लसीकरणादरम्यान कुणीही सोशल मिडीयावर अफवा पसरविली, खोट्या बातम्या किंवा जाणुन बुजून लसीची नकारात्मकता असणाऱ्या पोस्ट व्हायरल केलया तर, त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे कोविड लसीकरणादरम्यान कुणीही सोशल मिडीयावर आलेल्या पोस्ट खात्री न करता फॉरवर्ड किंवा पसरवू नये. लसीकरण हे राष्ट्रीय कार्य आहे, या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे.

                                                            **********

मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्य विक्री बंद

  बुलडाणा,(जिमाका) दि. 14 : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. तसेच 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. तरी आचार संहीतेच्या प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरूपयोग टाळणे व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तुंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवणे आवश्यक आहे.

   महाराष्ट्र देशी दारू नियमावली 1973 व मुंबई विदेशी मद्य नियमावली 1969 चे नियमानुसार जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूका असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. तरी मतदानाच्या दिवशी 15 जानेवारी रोजी व मतमोजणी दिवशी 18 जानेवारी रोजी संपूर्ण दिवस मद्य विक्री बंद असणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिले आहेत.

                                                *************




ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज

  • पोलींग पार्टी मतदान केंद्राकडे रवाना
  • 1803 मतदान केंद्र, 2516 पथके, 6919 कर्मचारी

   बुलडाणा,(जिमाका) दि. 14 : गावपातळीवरील  लोकशाहीचा उत्सव ग्रामपंचायत निवडणूकीच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. या मतदानाची पुर्वतयारी प्रशासनाने पूर्ण केली असून या उत्सवासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.  मतदानासाठी जिल्हाभर 1803 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात 2171 मतदान केंद्राध्यक्षाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रनिहाय 2516 पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. राखीव मतदान पथकांची संख्या 300 असून मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांची संख्या एकूण 6916 आहे. तसेच मतदान केंद्रावर 2029 शिपायांचीसुद्‌धा नेमणूक करण्यात आली आहे.

    जिल्ह्यात एकूण 527 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार होती. मात्र 29 ग्रामपंचायती अविरोध निवडल्यामुळे 498 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. यासाठी जिल्ह्यात एकूण 9 लक्ष 70 हजार 671 मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे. यामध्ये 4 लक्ष 86 हजार 010 स्त्री मतदार असून 4 लक्ष 84 हजार 661 पुरूष मतदार आहेत. सर्वात जास्त खामगांव तालुक्यात 67 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. मतदानावेळी कुठलाही एक ओळखीचा पुरावा सोबत असावा लागणार आहे. मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून मतदारांना निर्भिड वातावरणात मतदान करता यावे, यासाठी पोलीस विभाग सज्ज आहे. तरी मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडून भरघोस मतदान करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  

                                                                                                **********

  

 

No comments:

Post a Comment