Monday 4 January 2021

DIO BULDANA NEWS 4.1.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 456 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 46 पॉझिटिव्ह

       19  रूग्णांना मिळाली सुट्टी

  बुलडाणा,(जिमाका) दि. 4 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 502 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 456 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 46 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 39 रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 409 तर रॅपिड टेस्टमधील 47 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 456 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव शहर : 7, खामगांव तालुका : हिवरा बु 1, बुलडाणा शहर : 11, बुलडाणा तालुका : येळगांव 1, पोखरी 1,  मलकापूर शहर : 1, दे. राजा शहर : 6, चिखली शहर : 1, चिखली तालुका : खंडाळा 1, देऊळगांव मुंढे 1, टाकरखेड 1, मेंडगांव 1,  मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : पिं. देवी 2, सिं. राजा तालुका: दे. कोळ 1,  शेगांव तालुका : जवळा 2, पाळोदी 1,  शेगांव शहर : 3,  मेहकर तालुका : कल्याणा 1,  जळगांव जामोद शहर : 1,  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 46 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 19  रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 1, दे. राजा : 7, खामगांव : 3, नांदुरा : 2, चिखली : 3, मेहकर : 1, शेगांव : 2.

  तसेच आजपर्यंत 91788 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12251 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12251 आहे. 

  तसेच 535 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 91788 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12725 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12251  कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 322 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 152 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

                                                            ******

सावित्रीबाई फुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

      बुलडाणा,(जिमाका) दि.4 :  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त आज 3 जानेवारी 2021 रोजी अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते  आदी उपस्थित होते.

******

जिजाऊ व संत चोखामेळा जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यास परवानगी

  • उपस्थितांनी मास्क वापरणे बंधनकारक

  बुलडाणा,(जिमाका) दि. 4 : कोविड 19 या आजाराचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सर्व सामाजिक, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व मोठ्या प्रमाणावर गर्दी  होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात 12 जानेवारी 2021 रोजी साजरा होणारा जिजाऊ जन्मोत्सव व 14 जानेवारी रोजी असणारा संत चोखामेळा जन्मोत्सव सोहळ्याला साध्या पद्धतीने साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये 20 लोकांच्या उपस्थितीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

   सदर सोहळ्याकरीता उपस्थितांना मास्क वापरणे बंधनकारक राहणार असून थर्मल स्क्रिनींगद्वारे तपासणी करणे अनिवार्य आहे. कार्यक्रम स्थळी येणाऱ्या व्यक्तींची 48 तासापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट निगेटीव्ह अहवाल प्रमाणपत्र सोबत असावेत. उपस्थित व्यक्तींनी आरोग्य सेतू डाऊनलोड करावे. जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित व्यक्तींना आयोजन समितीकडून ओळखपत्र देण्यात यावे. जन्मोत्सव दरम्यान होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्‍ प्रत्येक ठिकाणी ओळखपत्र हे स्वतंत्र असावेत. ओळखपत्राशिवाय कोणत्याही कार्यक्रम स्थळी प्रवेश देऊ नये. जिजाऊ जन्मोत्सव दरम्यान सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी. प्रतिकात्मक जिजाऊ जन्मोत्सवासाठी व्यक्ती, आयोजक, निमंत्रीत, सदस्य, सहाय्यक सेवेकरी, खाजगी सुरक्षा रक्षक व बंदोबस्तावरील लोक यांच्यासह कोणत्याही परिस्थितीत गर्दी, जमाव संख्या 50 पेक्षा जास्त होणार नाही याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या उत्सवादरम्यान कोरोना या विषाणूच्या प्रसारावर प्रतिबंध घालण्यासाठी गर्दी न करणे, सोशल डिसटसिंगचे पालन करणे, मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड करणे याबाबतची कारवाई नगर पालिका व पोलीस विभाग करणार आहेत, असे जिल्हादंडाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी कळविले आहे.

***********


काँग्रेस नगर येथील तरूण घरून निघून गेला

  बुलडाणा,(जिमाका) दि. 4 : काँग्रेस नगर, बुलडाणा येथील विश्वनाथ लक्ष्मण सोनुने वय 65 यांचा मुलगा सतिष विश्वनाथ सोनुने वय 37 हा 21 डिसेंबर 2020 रोजी त्यांचे राहते घरातून कोणालाही न सांगता निघून गेला आहे. त्याचा शोध घेतला असता तो मिळून आलेला नाही. सतिष सोनुने यांचा रंग गोरा असून उंची 5 फुट 9 इंच आहे. अंगामध्ये बदामी रंगाचे चौकडीचे शर्ट, लालसर कथीया रंगाचे जॅकेट, गळ्यात पांढरा रूमाल,डोक्यात वूलनची काळसर रंगाची टोपी, काळ्या रंगाची पँन्ट व पायात भुरकट रंगाची सँण्डल घातलेली आहे. या वर्णनाचा तरूण इसम कुणालाही आढळून आल्यास किंवा दिसल्यास त्वरित बुलडाणा शहर पोलीस स्टेशनच्या 07262-242327 व 7972502295 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बुलडाणा शहर पोलीस स्टेशनकडून करण्यात आले आहे.  

                                                                        **************

                     मतदान व मतमोजणीच्या दिवशी येणारे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी भरणार

  • ग्रामपंचायत निवडणूक

  बुलडाणा,(जिमाका) दि. 4 : जिल्ह्यात 527 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणकीसाठी शुक्रवार, 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तसेच सोमवार 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये शुक्रवार, दि. 15 जानेवारी 2021 रोजी व सोमवार 18 जानेवारी रोजी तालुक्याच्या ठिकाणी भरविण्यात येणारे आठवडी बाजार त्या पुढील दिवशी अर्थात दुसऱ्या  दिवशी भरविण्यात येणार आहे, याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                        **********

बुलडाणा तालुक्याला 464 घरकुलांचे उद्दिष्ट

  • प्रपत्र ब यादीनुसार लाभार्थ्यांनी कागदपत्रे सादर करावी

  बुलडाणा,(जिमाका) दि. 4 : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रपत्र ब मधील यादीनुसार सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी बुलडाणा तालुक्याला एकूण 464 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या यादीनुसार आज रोजी लाभ द्यावयाचे एकूण 464 घरकुल लाभार्थी शिल्लक होते. शिल्लक लाभार्थ्यांचे एकूण 464 म्हणजे 100 टक्के उद्दिष्ट बुलडाणा तालुक्याला प्राप्त झाले आहे.

   तरी 464 घरकुलांचे उद्दिष्ट पंचायत समितीला प्राप्त असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रपत्र ब यादीनुसार लाभार्थ्यांनी स्वत: ची जागा उपलब्ध करून संबंधीत गावचे ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक यांचेशी संपर्क साधावा. प्रस्तावासोबत लागणारे आधार कार्ड, बँक पासबुक प्रत, मग्रारोहयोचे जॉब कार्ड, राहत्या घराचा फोटो, राशन कार्ड, राहत्या जागेचा नमुना 8 आदी कागदपत्रे ग्रामपंचायतीमध्ये तात्काळ सादर करावी. संबंधीत ग्रामसेवक यांनी परिपूर्ण घरकुलांचे प्रस्ताव पंचायत समिती, बुलडाणा या कार्यालयात सादर करावे. ज्या लाभार्थ्यांकडे जागा उपलब्ध नाही. अशा लाभार्थ्यांना पंडीत दिनदयाल उपाध्याय योजनेतंर्गत जागा खरेदी करण्यासाठी ग्रामपंचायत  मार्फत पंचायत समिती येथे प्रस्ताव सादर करावे. घरकुल मंजूरी करीता कोणत्याही व्यक्तीस अथवा कर्मचाऱ्यासोबत आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन गटविकास अधिकारी, पंचायत समिती, बुलडाणा यांनी केले आहे.

                                                            ***********

राज्य शासनाची उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2020 स्पर्धा जाहीर

·        31 जानेवारी 2021 पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

       बुलडाणा,(जिमाका) दि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2021 असा आहे.

         विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिध्दीसाठी, जनतेमधील विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पध्दतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीयस्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमती पत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.

            उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लेखनाचे कात्रण त्याच्या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. मूळ लेखनाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लेखनावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिध्द झाला असेल त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.

            पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदाराने राज्य व विभागीय पताळीवरील प्रवेशिका नागपूर येथील संचालक (माहिती), अमरावती येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.

मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्यपातळीवरील शासकीय गट व विभागीयपातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनंसपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील. ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल       

             प्रवेशिका राज्यस्तर किंवा विभागीयस्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत, अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.

            प्रत्येक गट व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. तरी इच्छूक पत्रकारांनी 31 जानेवारी पर्यंत स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

                                                                                    *******

No comments:

Post a Comment