Thursday 23 July 2020

DIO BULDANA NEWS 23.7.2020,1

कोरोनाबाधीतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या जिजाऊंच्या लेकींची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल…!
  • प्रशस्तीपत्र देवून करणार सन्मान
बुलडाणा,(जिमाका) दि.23 :  आपण सध्या एका आरिष्टयामधून जात आहोत.. ते आरिष्ट्य आहे कोरोना साथरोगाचे.. सर्वांना आसमान दाखविणाऱ्या या साथरोगाने सर्वांना छळले आहे. कोरोना… हा शब्दच आता सर्वांना नकोसा झाला आहे. त्यामध्ये कोरोनाबाधीत म्हटले, तर नकोरे बाबा..मग तो जिवंत असो वा मृत.. असाच प्रकार देऊळगाव राजा नगरीत 21 जुलै रोजी घडला. निमित्त होते कोरोनाबाधीत 78 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूचे.
    या व्यक्तीच्या देहावर कोरोनाच्या भयामुळे कुणीही अंत्यसंस्कार करण्यास तयार होत नव्हते. अशा परिस्थितीत दे.राजाच्या जिगरबाज, निडर मुख्याधिकारी निवेदीता घार्गे व वैद्यकीय अधिक्षक डॉ आसमा शाहीन या जिजाऊ- सावित्रींच्या लेकींनी कोरोनाबाधीत व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले. या कर्तृत्वामुळे, धैर्यामुळे त्यांची सर्व स्तरातून पाठ थोपटली जात आहे. त्यांच्या या कार्याची दखल थेट जिल्हा प्रशासनाच्या प्रमुख असलेल्या जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनीसुद्धा घेतली आहे.
   देऊळगांव राजा शहरात अहिंसा मार्ग भागात राहणाऱ्या कोरोनाबाधीत वृद्ध व्यक्तीचा 21 जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.  कोरोनाने वृद्ध व्यक्तींच्या कुटूंबीयांनाही सोडले नाही. कुटूंबातील व्यक्तीही बाधीत असल्यामुळे दे. राजा येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत होत्या. त्यामुळे बाधीत मृत व्यक्तीच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जवळचे नातेवाईक, कुटूंबीय येवू शकले नाही. मुख्याधिकारी निवेदीता घार्गे यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वर्गरथ पाठवून मृतदेह वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यविधीकरीता नेण्यात आला. कुंटूंबीय कोरोनाबाधीत असल्यामुळे उपचारार्थ दाखल होते. त्यामुळे ते येवू शकले नाही. तसेच नगर पालिकेचे कर्मचारीसुद्धा कोरोनाची धास्ती व भिती असल्यामुळे अंत्यंसंस्कार करायला आले नाही. त्याचप्रमाणे अंत्यसंस्काराला आणण्यात आलेला मृतदेह हा कोरोना बाधीत रूग्णाचा असल्यामुळे स्थानिकांनी सुद्धा विरोध केला.
   अशा सर्व विरोधाभासी परिस्थितीत या दोन्ही सावित्रीच्या लेकी पुढे आल्या. आपल्या जीवाची पर्वा न करता, कुठलेही भय न बाळगता या महिला अधिकाऱ्यांनी पिपिई किट घालून स्वत: मृतदेहावर अंत्यसंसकार केले.  त्यांच्या या धाडसाची चर्चा सर्व जिल्ह्यात होत आहे. या कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा त्यांचा प्रशस्तीपत्र देवून सन्मान करणार आहे. त्यांच्या धाडसाचे कौतुक जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी जिजाऊ, सावित्रीच लेकीचे दर्शन घडविले आहे. त्यांच्यावर चोहोबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत असताना त्यांनी समाजाने कुठे तरी याबाबत आत्मचिंतन करण्याची वेळ आल्याचे दाखवून दिले आहे. कोरोनाच्या या भयावह काळामध्ये या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नेटकऱ्यांकडूनही त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यात आली आहे. तरी अशा या कर्तृत्वाचा सन्मान जिल्हा प्रशासन करणार आहे. त्यामुळे त्यांच्या या कर्तृत्वाला एक उभारी मिळेल.. एवढे मात्र निश्चित..
******
कडबा कटर यंत्राचे 50 टक्के अनुदानावर वाटप..!
बुलडाणा,(जिमाका) दि.23 :  जिल्ह्यात दुध उत्पादन वाढविण्याच्या अनुषंगाने चाऱ्याचा विनीयोग पुर्णपणे होणे गरजेचे आहे. चारा वाया जावू न देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यात महादूध प्रकल्प (एनडीडीबी), राष्ट्रीय कृषि विकास योजना व राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेतंर्गत 50 टक्के अनुदानावर कडबा कटर यंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. सदर योजनेतंर्गत डीबीटी नुसार लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी स्वत: नामांकित कंपनीकडून कडबा कटर यंत्र खरेदी करावे. त्याचे जिएसटीचे देयक, फोटो, पशुसंवर्धन अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करून त्यानंतर लाभार्थ्याचे बँक खात्यात 50 टक्के अनुदानाची रक्कम  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयामार्फत जमा करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रांचा प्रस्ताव पशुधन विकास अधिकारी (वि) संबंधीत पंचायत समिती यांचेकडे सादर करावा. या यंत्राद्वारे चारा कापणी केल्यामुळे चारा वाया जात नाही. चाऱ्यावरील खर्च कमी होतो व चाऱ्याची पौष्टीकता वाढून दुधातील फॅट, एसएनएफ वाढण्यास मदत होते. त्यामुळे दुध उत्पादनात वाढ होते. तरी जास्तीत जास्त पशुपालकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धशाळा विषय समिती सभापती राजेंद्र पळसकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बोरकर व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. के. एम ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *****  

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी…!
  • सरासरी 11.9 मि.मी पावसाची नोंद
  • बुलडाणा तालुक्यात सर्वात जास्त 26.1 मि.मी पाऊस
बुलडाणा,(जिमाका) दि.23 :  जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस कमी अधिक प्रमाणात भाग बदलून हजेरी लावत आहे. कुठे दमदार, तर कुठे तुरळक स्वरूपात पाऊस आपले अस्तित्व दाखवित आहे. सध्या शेतीच्या आंतरमशागतीची कामे कोळपणी, निंदणे जिल्ह्यात गतीने सुरू आहे. अनेक भागात खत टाकणे, फवारणी आदी कामेही सुरू आहेत. अशा परिस्थितीत उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना काल दमदार पावसाने सुखावले. जिल्ह्यात बुलडाणा तालुक्यात सर्वात जास्त 26.1 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 11.9 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे.
  जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची
बुलडाणा : 26.1 मि.मी (396.3), चिखली : 15.6 (312.5), दे.राजा : 2.8 (291.8), सिं. राजा : 14.3 (370.8), लोणार : 4.5 (292.3), मेहकर : 11.8 (289.4), खामगांव : 14.3 (251.9), शेगांव : 5.6 (342.4), मलकापूर : 21.8 (436), नांदुरा : 17.7 (350.4), मोताळा : 20.3 (227.9), संग्रामपूर : निरंक (426.8), जळगांव जामोद : निरंक (376.4)
 जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4364.9 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 335.8 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 227.9 मि.मी पावसाची नोंद मोताळा तालुक्यात झाली आहे.
    जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी – नळगंगा : 37.87 दलघमी (54.63), पेनटाकळी : 31.33 दलघमी (52.24), खडकपूर्णा :65.49 दलघमी (70.12), पलढग : 1.63 दलघमी (21.70), ज्ञानगंगा : 21.88 दलघमी (64.49), मन : 22.37 दलघमी (60.74), कोराडी : 8.74 दलघमी (57.80), मस : 11.58 दलघमी (76.99), तोरणा : 3.60 दलघमी (45.63) व उतावळी : 11.56 दलघमी (58.41).          
*******
            जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय सुरू ठेवण्याच्या वेळेत बदल
  • आता सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत मुभा
  • जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश
  • पिक विमा भरण्यासाठी महा ई सेवा केंद्र, सरएससी केंद्र रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार
बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी दि. 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2020 च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण एक महिन्यासाठी 21 जुलै रोजीच्या आदेशानुसार लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी औषधालय, दवाखाने व दुध वितरण, संकलन वगळून इतर सर्व बाबींवर बंदी घालण्यात आली.  या दोन्ही दिवशी संचारबंदी लागू केली.
   सोमवार ते शुक्रवार या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात सर्व उद्योग, व्यवसाय आदी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू होते. या वेळेमध्ये आता बदल करण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व उद्योग, व्यवसाय आता सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्याच दिवशी सायं 5 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत कडक कर्फ्यु लागू असणार आहे. त्याचप्रमाणे सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी कमी वेळ मिळत आहे, परिणामी शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा अर्ज दाखल करण्यासाठी महा ई सेवा केंद्र, सीएससी केंद्र शनिवार व रविवारसह सर्व दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय संचारबंदी लागू असतांना इतर कोणतीही व्यक्ती, वाहने, रस्त्यावर, बाजारामध्ये, गल्लीमध्ये घराबाहेर फिरताना आढळुन आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनीयम 2005, भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र अपराध केला असे समजण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल,   असे आदेशात नमूद आहे.
********

No comments:

Post a Comment