Wednesday 1 July 2020

DIO BULDANA NEWS 1.7.2020

मलकापूर उपविभागात कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू
·        अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद
·       15 जुलैपर्यंत असणार लॉकडाऊन
·        अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत सुरू राहणार
बुलडाणा, दि.1 : जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 76 प्रतिबंधीत क्षेत्र तयार करण्यात आली आहे. त्यापैकी 34 प्रतिबंधीत क्षेत्र एकट्या मलकापूर उपविभागात आहे. मात्र तरीही मलकापूर उपविभागात कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे. हे पाहता मलकापूर हे हॉटस्पॉट ठरत असल्याचे लक्षात येते. त्यामुळे मलकापूर शहर व तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश तातडीने जारी करणे गरजेचे आहे. मिशन बिगीन अगेन च्या 29 जुन 2020 च्या आदेशान्वये जिल्हाधिकारी यांना त्यांचे अधिकार क्षेत्रात स्थानिक परिस्थिती पाहून साथरोग नियंत्रणाकरीता स्थानिक क्षेत्रात निर्बंध घालण्याचे व व्यक्तींच्या हालचालीवर, दुकाने उघडी ठेवणे, खरेदी आदींवर निर्बंध घालण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी मलकापूर उपविभाग अर्थात मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्यात कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून संपूर्ण मलकापूर उपविभागात 15 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू केले आहे.
  अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींना आवश्यकतेनुसार संचार करण्यास मुभा राहील. मात्र ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे. कोणत्याही परिस्थितीत दोन व्यक्तीमध्ये किमान तीन फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. तसेच कर्तव्यावर असणारे शासकीय कर्मचारी / अधिकारी वगळून मलकापूर उपविभागामध्ये येण्यास व जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी इंसीडेंट कमांडर यांची परवानगी आवश्यक राहील.
  पुर्वपरवानगीने अत्यावश्यक वस्तु व सेवा पुरवठा करणाऱ्या सर्व खाजगी संस्था, कार्यकारी यंत्रणा यांनी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होईल याची काळजी घ्यावी. गर्भवती महिला, मधुमेह, उच्च रक्तदाब असणारे व वयोवृद्ध व्यक्तींचा सर्वे करण्यात येणार असून सर्वेदरम्यान कोविड ची लक्षणे आढळून आल्यास संबंधीत व्यक्तीचा स्वॅब टेस्ट करण्यात येईल. यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. उपविभागात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास, मास्क न वापरल्यास, सोशल डिस्टसिंगचे पालन न करणे, दुकाने निर्धारीत वेळेनंतर सुरू ठेवल्यास दंडाची रक्कम नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीकडून स्थानिक स्वराज्य संस्था वसूल करणार आहेत. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस विभाग कार्यवाही करणार आहे. अत्यावश्यक सेवा व वस्तु देणाऱ्या वाहनांवर पासेस, स्टीकर्स वाहनावर लावणे आवश्यक आहे.
 उपविभागीय दंडाधिकारी यांनी परवानगी देण्याकरीता विविध कार्यालयांचे मदतीने पासेस देण्याची व्यवस्था करावयाची आहे. या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
                        आदेशानुसार ही राहणार मनाई
मलकापूर शहर व उपविभागात कोणत्याही व्यक्तीला मुक्त संचार करण्यास मनाई, मलकापूर उपविभागाच्या सर्व सीमा अत्यावश्यक सेवा व वस्तुंशिवाय इतर सर्व बाबींसाठी बंदीस्त करण्यात येत आहे, सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस यांना मनाई, सर्व खाजगी वाहने, दुचाकी, तिनचाकी व चारचाकी वाहनांना परिभ्रमणास मनाई, सर्व शैक्षणिक, प्रशिक्षण, संशोधन विद्यालये, खाजगी कोचिंग क्लासेस यांना मनाई, सर्व मंदीर, मस्जीद, दर्गे, चर्च, गुरूद्वारा आदी धार्मिक स्थळे जनतेकरीता बंद राहणार, सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक, मेळावे, सभा, मोर्चे आदींना संपूर्णत: बंदी, सर्व हॉटेल, रेस्टॉरंट व ढाबे यांना बंदी. रूग्णसंख्येत घट आढळून आल्यास काही निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. 
आदेशानुसार या सेवांना असणार परवानगी
सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने जसे किराणा, दुध, भाजीपाला, बेकरी, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी व त्यांची गोदामे, कृषि निविष्ठा व बांधकाम साहित्याची दुकाने यांना सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मुभा असणार आहे.  शासकीय / निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम / आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, पोलीस, होमगार्ड, अग्नीशमन, विज, पाणी व स्वच्छतेसंबंधी विभाग, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषधी द्रव्ये विभाग, सर्व शासकीय तथा खाजगी रूग्णालये,  पॅथॉलॉजी, लॅबोरटरी, सर्व प्रकारचे वैद्यकीय दवाखाने, नर्सिंग होम, रूग्णवाहिका, जनावरांचे दवाखाने, रेल्वे मालधक्का व  रेक उतरविणे, त्यांची गोदामे, अन्न व नागरी पुरवठा विभागाची गोदामे व वितरण,  सर्व बँक, एटीएम व वित्तीय संस्था, इन्शुरन्स कंपनी, म्युचुअल फंड, पोस्ट ऑफीसेस, टेलिफोन, इंटरनेट सेवा देणारे कर्मचारी, होम डिलीवरी करणारे कर्मचारी,  शासकीय स्वस्त धान्य दुकाने यांना मुभा असेल, तसेच उपविभागीत एमआयडीसी उद्योग सुरू राहतील. शेतकऱ्यांचा शेतमाल व कृषि निवीष्ठा नेणाऱ्या वाहनांना परवानगी असेल. कृषि उत्पन्न बाजार समिती सुरू राहील. परंतु सोशल डिस्टसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. सर्व प्रकारची कृषि माल खरेदी व कापूस जिनींग सुरू राहील.    
***********


शासनाचे शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य
                                                                                                                        - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
कृषि संजीवनी सप्ताहाचे पालकमंत्री यांच्याहस्ते उद्घाटन
बुलडाणा, दि.1 : कोरोनाच्या संकट काळात कृषि विभागाच्यावतीने शेतकऱ्यांचा शेतमाल गटांच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचला आहे. अशा कठीण काळात शेतकऱ्यांचे कार्य कौतुकास पात्र आहे. शेतकरी हित हेच शासनाच्या अजेंड्यावरील महत्वाचा विषय आहे. शासन शेतकरी हिताचे निर्णय वेळोवेळी घेत आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.
   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषि संजीवनी सप्ताहाचे ऑनलाईन उद्घाटन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पालकमंत्री यांच्याहस्ते आज करण्यात आले. त्यावेळी शेतकऱ्यांना ऑनलाईन संबोधीत करताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ आर. जी पुरी, उपजिल्हाधिकारी भुषण अहीरे, गौरी सावंत, कृषि उपसंचालक विजय बेतीवार, आत्मा प्रकल्प उपसंचालक बिपीन राठोड, पोकरा प्रकल्पाचे विशेषज्ज्ञ उमेश जाधव आदी उपस्थित होते.
   यावर्षी राज्यात 1 ते 7 जुलै दरम्यान कै. वसंतराव नाईक यांचे जन्मदिनी कृषी दिनापासून  कृषि संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन आज पालकमंत्री यांच्याहस्ते ऑनलाईन करण्यात आले. कोरोना संसर्ग पार्श्वभूमी असल्यामुळे सदर उद्घाटन ऑनलाईन पार पडले. या कार्यक्रमाचे दोन हजार पेक्षा जास्त ठिकाणी शेतकरी व अधिकारी, कर्मचारी यांनी ऑनलाईन प्रक्षेपण पाहीले. यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यामध्ये तयार होणारा शेतमाल इतर जिल्ह्यात, राज्यात आणि देशपातळीवर पोहोचविण्यासाठी एक डिजीटल प्लॅटफॉर्म करीत असल्याचे सागितले. त्याचे काम सुरू झाले असून येत्या खरीप हंगामातील शेतमाल या डिजीटल प्लॅटफॉर्मवरून विक्री करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. या सप्तहामध्ये शेतकऱ्यांनी कोरोना संसर्ग खबरदारी पाळत उपस्थित राहून सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवानही जिल्हाधिकारी यांनी केले.
*************
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना पालकमत्र्यांकडून अभिवादन
बुलडाणा, दि.1 : राज्याचे माजी मुख्यमंत्री, हरीत क्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांची आज 1 जुलै रोजी जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातही कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी अभिवादन केले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पुरी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, उपजिल्हाधिकारी श्री. अहीरे, गौरी सावंत आदी उपस्थित होते.
                                                            ***********

            कोरोना अलर्ट : प्राप्त 97 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 18 पॉझिटिव्ह
  • दोन रूग्णांची  कोरोनावर मात
बुलडाणा,(जिमाका) दि.1 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 115 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 97 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 18 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये नांदुरा येथील 28 वर्षीय पुरूष, दाल फैल खामगांव येथील 43 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरूणी, 23 वर्षीय पुरूष, 13 वर्षीय मुलगी व 26 वर्षीय पुरूष, तसेच कदमपूरा खामगांव येथील 52 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरूष, 24 वर्षीय महिला व 18 वर्षीय पुरूष रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. अशाप्रकारे खामगांव तालुक्यात 9  रूग्ण आढळले आहे.
    तसेच पारपेठ मलकापूर येथील 8 वर्षीय मुलगा, अमोना ता. चिखली येथील 30 वर्षीय पुरूष, साखरखेर्डा ता. सिं.राजा येथील  19 वर्षीय तरूण, 55 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय पुरूष, मूळ पत्ता देऊळगांव ता. जामनेर, जि. जळगांव असलेल्या 65 वर्षीय महिला आणि  बुलडाणा येथील 19 वर्षीय तरूण संशयीत रूग्ण पॉझीटीव्ह आले आहे. अशाप्रकारे 18 अहवाल पॉझीटीव्ह प्राप्त झाले आहे.
  तसेच आज 2 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये हाश्मी नगर मलकापूर येथील 35 वर्षीय महिला व धामणगांव बढे ता. मोताळा येथील 9 वर्षीय मुलाचा समावेश आहे.  तसेच आजपर्यंत 2698 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 154 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 154 आहे.  तसेच आज 1 जुलै रोजी 115 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 18 पॉझीटीव्ह, तर 94 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी 219 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2698 आहेत.
      जिल्ह्यात आजअखेर एकूण 253 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 154 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 87 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 12 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*******

No comments:

Post a Comment