Wednesday 29 July 2020

DIO BULDANA NEWS 29.7.2020

सोयाबीन पिकावरील चक्रीभुंगा किडीचे व्यवस्थापन करावे

  • कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.29 :  सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्यांचा प्रौढ भुंगेरा फिक्‌क्ट तपकिरी रंगाचा, 7 ते 10 मि.ती लांब असतो. मादी नरापेक्षा मोठी असते. सोयाबीन पिक वाढीच्या सुरूवातीच्या काळात मादी भुंगेरा सोयाबीन पिकाचा देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर अंडी घालण्यासाठी दोन समांतर खापा करून त्यामध्ये अंडी घालते. त्यामुळे जमिनीलगतच्या अन्न पुरवठा बंद होतो आणि खपाच्या वरचा भाग वाळुन जातो. या चक्री कापात चक्री भुंग्याचा मादी भुंगेरा 8 ते 72 अंडी घालतो.

  अंडी अवस्था 4 ते 8 दिवस असते. अंड्यातुन बाहेर पडेलली अळी दंडगोलाकृती , पिवळसर पांढरी, गुळगुळीत असून तिचा डोक्यावरील भाग जड असतो. तीच्या धडाच्या खालील भागावर उभरट ग्रंथी असतात. पुर्ण वाढ झालेली अळी 19 ते 22 मि.मी लांब असते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी सोयाबीनचे देठ, फांद्या व खोड पोखरून पोकळ करते  व अळी अवस्था 32 ते 62 दिवसांची असते. या किडीचा प्रादुर्भाव पीक दीड ते दोन महिन्याचे अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड इतर झाडासारखे दिसत असल्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही. नंतरच्या काळात खापेवरील फांदी वाळलेली दिसते व आतून खोड पोखरल्या गेल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून उत्पादनात लक्षणीय घट येते.

   असे करा व्यवस्थापन : सोयाबीनची पेरणी करतांना अती दाट किंवा अति विरळ पेरणी टाळावी. सोयाबीनच पेरणीकरीता बियाण्याचा दर अंतर शिफारशीप्रमाणेच ठेवावे. चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे आढळणारी किडग्रस्त पाने, वाळलेली फांदी यांचा आतील भाग किडीसह नष्ट करावा. पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पिकात चक्रीभुंगा किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल किंवा सोयाबीन पिकात 3 ते 5 चक्रीभुंगा प्रती मीटर  ओळीत आढळल्यास किंवा सरासरी 10 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त झाडे आढळून आल्यास किटकनाशकाची गरजेनुसार योग्य निर्देशीत प्रमाणात फवारणी करावी.

   प्रोफेनोफॉस 50 टक्के ई.सी 20 मिली अधिक 10 लीटर पाणी किंवा थायक्लोप्रीड 21.4 टक्के एस.सी 2 मिली अधिक 10 लीटर पाणी किंवा क्लोरॅनटानीप्रोल 18.5 एस.सी 2 मिली अधिक 10 लीटर पाणी किंवा इथिऑन 50 टक्के इ. सी 15 ते 30 मिली अधिक 10 लीटर पाणी किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के ई.सी 12.5 मिली अधिक 10 लीटर पाणी किंवा थायोमेथॉझॉम 12.6 टक्के अधिक लॅम्बडा साहेलोथ्रीन 9.5 टक्के 2.5 मिली अधिक 10 लीटर पाणी या प्रमाणात घेवून कोणत्याही एका किटकनाशकाची इतर एकात्मिक किड व्यवस्थापनाच्या घटकाचा वापर करून गरजेनुसार व योग्य निदान करून फवारणी करावी.

  रासायनिक किडनाशके वापरण्यापूर्वी लेबलक्लेम शिफारशीची शहानिशा करून लेबलक्लेम शहानिशा शिफारशीप्रमाणे आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेवून योग्य  शिफारशीत प्रमाणात योग्य वेळीच फवारणी करावी. अनेक रसायने एकत्र करून फवारणी टाळावी. मुदत बाह्य झालेली किडनाशके व एक्स्पायरी झालेली किडनाशके यांची फवारणी टाळावी. प्रत्यक्ष तज्ज्ञांचा सल्ला घेवून किडीचे योग्य निदान करून व आर्थिक नुसानीची पातळी लक्षात घेवून लेबलक्लेम शिफारशीप्रमाणे किडनाशकाचा वापर करणे केव्हाही हितावह व योग्य असते. वर निर्देशीत किटकनाशके फवारतांना लेबलक्लेम शिफारशीप्रमाणे फवारणीसाठी निर्देशीत पाण्याची मात्रा प्रति हेक्टर वापरावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.    

********

इयत्ता 10 वीचा जिल्ह्याचा निकाल 96.10 टक्के

  • अमरावती विभागातून जिल्हा प्रथम
  • मुलांचा 95.18, तर मुलींचा 97.24 टक्के निकाल
  • 172 शाळांनी गाठली निकालाची शंभरी

बुलडाणा,(जिमाका) दि.29 :  इयत्ता 10 वी चा निकाल आज जाहीर करण्यात आला. कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निकाल कधी लागणार असा प्रश्न असताना मंडळाने आज लावलेला निकाल महत्वपूर्ण आहे. त्यामुळे इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. जिल्ह्यात इयत्ता 12 वी प्रमाणे मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली असून सर्व निकालात  मुलींचाच बोलबाला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल 96.10 टक्के लागला आहे. निकालामध्ये जिल्हा अमरावती विभागातून प्रथम आहे.

  जिल्ह्यात इयत्ता 10 वीची परीक्षा मार्च 2020 मध्ये पार पडली. या परीक्षेस जिल्ह्यातून एकूण 43 हजार 922 विद्यार्थी प्रवेशित झाले होते. त्यापैकी 43 हजार 669 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 41 हजार 419 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 22 हजार 78 मुले, तर 17 हजार 951 मुली आहेत. त्यापैकी 21 हजार 04 मुले आणि 17 हजार 455 मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत. एकूण 38 हजार 469 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलांची टक्केवारी 95.18  असून मुलींची टक्केवारी 97.24 आहे.

   इयत्ता 10 वीच्या परीक्षेकरीता जिल्ह्यात नियमित विद्यार्थी 40 हजार 250 प्रवेशित झाले होते. त्यापैकी 40 हजार 29 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या नियमित विद्यार्थ्यांपैकी 21 हजार 14 मुले व 17 हजार 455 मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये 16 हजार 87 विद्यार्थी डिस्टीक्शन, 13 हजार 731 विद्यार्थी ग्रेड 1, 7 हजार 109 विद्यार्थी ग्रेड 2 मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.  जिल्ह्यात दहावीच्या निकालात तब्बल 172 शाळांनी निकालाची शंभरी गाठली आहे. तर दोन शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. त्यामध्ये एस.डी पाटील माध्यमिक विद्यालय, डिडोळा बु व सहकार महर्षी स्व. भास्कररावजी शिंगणे विद्यालय गिरोली यांचा समावेश आहे.  त्याचप्रमाणे जिल्ह्यात 3640 विद्यार्थ्यांनी पुर्नपरीक्षा दिली. त्यापैकी 3030 पुर्नपरीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याची टक्केवारी 83.24 आहे.  पुर्नपरीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेस नोंदणी केलेले मुले 2720 व मुली 952 आहेत. त्यापेकी 2696 मुलांनी, तर 944 मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी 2176 मुले व 854 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्णतेची मुलांची टक्केवारी 80.71 व मुलींची 90.47 टक्के आहे. जिल्ह्यात इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हा प्रशासनाने अभिनंदन केले आहे.

                                                                        ******

No comments:

Post a Comment