Monday 22 August 2016

news 22 augest 2016


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जिल्ह्यात  2304 परीक्षार्थी
  • रविवार, 28 ऑगस्ट 2016 रोजी परीक्षा
  • 7 परीक्षा केंद्रांचे नियोजन
  • सहायक कक्ष अधिकारी पदाची पूर्व परीक्षा
बुलडाणा दि. 22 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कर सहायक परीक्षा-2016  रविवार, 28 ऑगस्ट 2016 रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा सकाळी 10.30 ते 1 वाजे दरम्यान होणार आहे. या परीक्षेला जिल्ह्यातून 2304 उमेदवार बसणार आहे. तसेच परीक्षेसाठी बुलडाणा येथील सात  परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.
    यामध्ये शिवाजी विद्यालय, सुवर्ण नगर येथील परीक्षा केंद्रात 480 परीक्षार्थी, एडेड हायस्कूल चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात 360, सहकार विद्यामंदीर चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात 336, शारदा ज्ञानपीठ चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात 336, रामभाऊ लिंगाडे पॉलीटेक्नीक कॉलेज चिखली रोड परीक्षा केंद्रात 312, जिजामाता महाविद्यालय चिखली रोड परीक्षा केंद्रात 240 व भारत विद्यालय चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात 240 परीक्षार्थी परीक्षेस बसणार आहे.
     परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षा कक्षात सकाळी 10.30 वाजता प्रवेश देण्यात येणार असून परीक्षा कक्षात प्रवेश प्रमाणपत्र व काळ्या शाईचे बॉल पॉईंट पेन आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कॅलक्युलेटर, भ्रमणध्वनी, वह्या, पुस्तके, पेजर, मायक्रोफोन, डिजीटल डायरी आदी आक्षेपार्ह वस्तू व साहित्य परीक्षा कक्षात आणण्यास व स्वत:जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे. याबाबत सर्व परीक्षार्थी उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच संबंधीत परीक्षार्थींनी त्यांचेसोबत स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा चालक परवाना यापैकी एकाची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे, असे केंद्र प्रमुख तथा आरडीसी नरेंद्र टापरे यांनी कळविले आहे.
******
गणेशोत्सवामध्ये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर करण्यासाठी दिवस निश्चित
बुलडाणा दि. 22 - जिल्ह्यात 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2016 दरम्यान  गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात ध्वनीप्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 अंतर्गत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर विशिष्ट दिवशी सुनिश्चित करण्यात आलेला आहे. गणेशोत्सवामध्ये गणेश चतुर्थी 5 सप्टेंबर 2016, गणेशोत्सवाचा नववा दिवस 13 सप्टेंबर, गणेशोत्सवचा दहावा दिवस 14 सप्टेंबर आणि अनंत चतुर्दशी 15 सप्टेंबर 2016 रोजी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर करण्यासंदर्भात दिवस निश्चित करण्यात आले आहे. या दिवशी गणेशोत्सवादरम्यान ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर करून कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केले आहे.
********
मृतक संजय तायडे या विद्यार्थ्याचा शिष्यवृत्तीचा अर्ज महाविद्यालयाकडे प्रलंबित
बुलडाणा दि. 22 शिष्यवृत्तीचे पैसे न मिळाल्यामुळे सरस्वती महाविद्यालय, शेगांव येथील संजय मधुकर तायडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त झळकले होते. सदर वृत्तामध्ये शिष्यवृत्तीचे पैसे न मिळाल्यामुळे संजयने आत्महत्या केल्याचे नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात सन 2013-14 या शैक्षणिक वर्षात विशेष मागास प्रवर्गात शेगाव येथील सरस्वती महाविद्यालयात एम.सी.ए अभ्यासक्रमात शिकणाऱ्या संजयच्या अर्जाची हार्ड प्रत आवश्यक कागदपत्रासह तसेच प्रपत्र ब सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास विहीत कालावधीत पडताळणीसाठी महाविद्यालयाने सादर केले नाही.
      याबाबत महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित असलेली प्रकरणे पडताळणी करून ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्जाच्या हार्ड प्रती प्रस्ताव या कार्यालयास सादर करणेबाबत वेळोवेळी सहायक आयुक्त कार्यालयाकडून निवेदनाद्वारे, लेखी पत्राद्वारे कळविले. परंतु या बाबीचे गांभीर्य महाविद्यालयाकडून लक्षात न घेता विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याचे अर्ज व प्रपत्र ब या सहायक आयुक्त कार्यालयास अद्यापपावेतो पडताळणीसाठी सादर करण्यात आलेले नाही. त्यामुळे सहायक आयुक्त कार्यालयाकडून फ्रीशीप अदा करण्यात आलेली नाही, असे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.

*****

No comments:

Post a Comment