Wednesday 31 August 2016

news 31.8.2016 dio buldana


‘महाराष्ट्र माझा’ संकल्पनेवर आधारित छायाचित्र स्पर्धा
 निवडक छायाचित्रांचे भरणार मंत्रालयात प्रदर्शन
 पंधरा, दहा व पाच हजार रुपयांची पारितोषिके
 एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीस
बुलडाणा, दि. 31 : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे दि. 1 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2016 या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे 15 हजार रूपये, 10 हजार रूपये, 5 हजार रूपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी छायाचित्रकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
‘महाराष्ट्र माझा’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा, मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, स्मार्ट सिटी, कुशल महाराष्ट्र्, भाग्यश्री योजना, पर्यटन महाराष्ट्र, आपले सरकार आणि दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालय आणि मुंबईतील छायाचित्रकारांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय येथे हाय रिझॉल्युशन (एचडी) छायाचित्रे dgiprnews01@gmail.com या ई मेल पत्यावर दिनांक 10 सप्टेंबर 2016 पर्यंत पाठवावीत.
राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी 5 तज्ज्ञांची समिती गठित केली असून समितीत ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, ज्येष्ठ पत्रकार आशुतोष पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा. त्यासाठी समन्वयक वरिष्ठ सहायक संचालक अजय जाधव (9702973946), (dloajayjadhav2012@gmail.com), सहायक संचालक सागरकुमार कांबळे (8605312555), (ksagar1983@gmail.com) यांच्याशी संपर्क साधावा.
****
शासकीय तंत्र माध्यमिक शाळेत तासिका तत्त्वावर अर्ज आमंत्रित
बुलडाणा दि. 31 - शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र, खामगांव या संस्थेत तासिका तत्वावर सत्र 2016-17 करिता वर्ग 11 व 12 करिता अंशकालीन शिक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इंग्रजी, मराठी, पर्यावरण व पायाभूत अभ्यासक्रम या विषयांसाठी तासिका तत्वावरील एक पदाकरिता अंशकालीन शिक्षक हवे आहेत. मराठीसाठी एम.ए, बी.एड द्वितीय श्रेणी, इंग्रजीसाठी एम.ए, बी.एड द्वितीय श्रेणी, पर्यावरणसाठी पर्यावरण विषय घेवून पदवी प्राप्त किंवा समकक्ष अर्हता आणि पायाभूत अभ्यासक्रमासाठी एम. कॉम द्वितीय श्रेणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्हताप्राप्त शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. वरील पात्रता असलेल्या उमेदवारांनी 7 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र, खामगांव येथे मुळ कागदपत्र व छायांकित प्रतीसह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित रहावे. सदर पदांवरील उमेदवारास शासकीय नियमानुसार मानधन देय राहील, असे मुख्याध्यापक यांनी कळविले आहे
*****
कृषि व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांचा दौरा
बुलडाणा, दि. 31 - कृषि व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर 1 सप्टेंबर 2016 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा खालीलप्रमाणे : दि. 1 सप्टेंबर 2016 रोजी पहाटे 5.28 वाजता शेगाव रेल्वेस्थानक येथे आगमन व खामगांवकडे प्रयाण, सकाळी 6 वाजता खामगांव येथे आगमन व राखीव, दुपारी 12 ते 2 दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे राखीव आहे.
****
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक यांना मिळणार विशेष गौरव पुरस्कार
बुलडाणा दि. 31 –राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वाद्य, नृत्य आदी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजक पुरस्कार प्राप्त, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, देश व राज्याची प्रतिष्ठा वाढविणारे जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय कार्याबद्दल 25 हजार, राज्यस्तरीय कार्याबद्दल 10 हजार स्वरूपाचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
तसेच इयत्ता 10 वी आणि 12 वीमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या विभागीय शिक्षण मंडळातील 10 वी चे प्रथम पाच, 12 वी चे गुणानुक्रमे पाच पाल्यांना एकरकमी 10 हजार रूपयांचा विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरी पात्र माजी सैनिक, विधवा पत्नी व त्यांचे पाल्यांना सदर गौरव पुरस्कार मिळण्यासाठी लागणारी कागदपत्रे तसेच केंद्रीय शिक्षा बोर्ड नवी दिल्ली येथून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रेड शिट निष्पादन प्रमाणपत्रामध्ये प्राप्त गुण व टक्केवारी दर्शवित नसल्याने संबंधित विद्यालयाचे गुणपत्रक टक्केवारीसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, येथे 16 सप्टेंबर 2016 पूर्वी सादर करावेत. अधिक माहितीसाठी किशोर मुडे यांचेशी व 07262-242208 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलींदकुमार बडगे यांनी केले आहे.
*******
महाअवयदान अभियान सोहळ्याचे आज आयोजन
बुलडाणा दि. 31 – महाअवयदान अभियानातंर्गत विविध कार्यक्रम जिल्हाभरामध्ये आयेजित करण्यात येत आहे. या अभियानाच्या सोहळ्याचे आयोजन उद्या 1 सप्टेंबर 2016 रोजी परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रूग्णालय, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.
या सोहळ्यात अवयवदानाचे महत्व समजावून सांगण्यात येणार आहे. तसेच अवयवदान करताना कुठली काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने अवयवदान केले पाहिजे, या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार आदी उपस्थित राहणार आहे.
*****
व्यवसाय कर नाव नोंदणीसाठी अभय योजना जाहीर
* योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 31 - राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य अंतर्गत व्यवसाय कर नाव नोंदणी करण्यासाठी अभय योजना 2016 जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय कर अधिकारी विणा कुमरे यांनी केले आहे.
व्यवसाय कर कायद्यान्वये कर भरणा करण्यास पात्र असणाऱ्या व्यक्ती, संस्था, कार्यालये, सोसायटी, कारखाने, यांनी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केले नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. ज्या व्यक्ती व्यवसाय कर भरण्यास पात्र आहेत. परंतु अद्याप त्यांनी व्यवसायकर नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केले नाही, अशा सर्व व्यक्ती अभय योजनेसाठी पात्र ठरतील. ही योजना केवळ अनोंदणीकृत व्यावसायिकांसाठी लागू असून 1 एप्रिल 2013 पूर्वीचा व्यवसाय कर, व्याज व दंड पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. या योजनेत केवळ मागील तीन वर्षाचाच करभरणा करावयाचा आहे. तसेच अभय योजना संपल्यानंतर व्यवसायकर नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त न करून घेतलेल्या अनोंदणीकृत व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्या व्यक्तींकडून मागील आठ वर्षांचा कर भरण्यासह व्याज व शास्तीची आकारणी केली जाणार आहे.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी विक्रीकर भवन, टॉवर चौक, खामगांव या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
****

शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड बंधनकारक
• महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक संकलीत करावे
• शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती संबंधित महाविद्यालयाच्या बँक खात्यात जमा
• विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक बॅक खात्याशी संलग्नित करावा
बुलडाणा दि. 31 - शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्ता हा त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करण्यात येतो. तर शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्ती ही ज्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी शिकत आहे, त्या महाविद्यालयाच्या बँक खात्यात जमा होते. या योजनेचा लाभ योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी संकलित करून योग्य असल्याची तपासणी करावी.
आधार क्रमांक हा बँक खात्याच्या क्रमांकाबरोबर लिंक करण्याबाबत विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रमुख यांनी लेखी सूचना द्याव्यात. ज्यांनी आधार कार्ड क्रमांक दिला आहे, परंतु तो वैध नाही असे आढळून आले आहे. त्याबाबत पुन्हा वैध आधार क्रमांक संकलित करण्याची कार्यवाही संबधित महाविद्यालयांनी करावी. ज्या विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक संकलित झाला आहे, त्याचे वैधताकरण एक महिन्याच्या आत महाविद्यालयांनी करावे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक झाला आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी https://resicent.uidai.net या पोर्टलवर जावून खात्री मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी करून घ्यावी.
ज्या विद्यार्थ्यांचा आधार कार्ड वैध आहेत, त्याची यादी संबंधित महाविद्यालयाच्या लॉगीनवर पाठविण्याची व्यवस्था करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी ई-स्कॉल पोर्टलमध्ये आधारकार्ड क्रमांकाची माहिती दिली आहे. तो मास्टर आधार डाटाबेस सोबत वैध असल्याची खात्री प्राचार्य यांनी करून घ्यावी.
******
जिल्हाधिकारी कार्यालयात
6 सप्टेंबर रोजी लोकशाही दिन
बुलडाणा, दि. 31 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन यावेळी सोमवार, दि. 5 सप्टेंबर 2016 रोजी गणेश चतुर्थीची शासकीय सुट्टी असल्यामुळे मंगळवार दि. 6 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे. अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.


****

No comments:

Post a Comment