Tuesday 30 August 2016

बातमी 30.8.2016 जीमाका बुलडाण


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती लाभासाठी आधार कार्ड अनिवार्य
बुलडाणा दि. 30 - प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला अंतर्गत जिल्हयातील महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, उच्च महाविद्यालय, जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालयातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयासाठी इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान विभागाने सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीकरीता नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल तयार केले आहे. सन 2016-17 या वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रीक प्री मॅट्रीक शिष्यवृत्तीचा लाभ ऑनलाईन प्रणालीव्दारे प्रदान करणेसाठी विद्यार्थ्याचे आधारकार्ड काढणे अनिवार्य केले आहे. तेव्हा केंद्र शासनाकडील प्राप्त निर्देशानुसार विद्यार्थ्याचे आधर कार्ड काढणे अनिवार्य केले आहे. तेव्हा केंद्र शासनाकडील प्राप्त निर्देशानुसार विद्यार्थ्याचे आधार कार्ड त्वरित सर्व महाविद्यालयांनी आधार कार्ड क्रमांक ऑनलाईन शिष्यवृत्ती फार्म मध्ये नोंद करावी. या बाबत कार्यवाही न केल्यास किंवा विद्यार्थी आधार कार्डमुळे शिष्यवृत्तीपासुन वंचीत राहिल्यास त्याची सर्व जबाबदारी महाविद्यालयाची राहील. अधिक माहिती प्रकल्प अधिकरी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला या कार्यालयाशी 0724-2425068 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
*********
विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक वैधतेची तपासणी आवश्यक
बुलडाणा दि. 30- सर्व ऑनलाईन शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा होते. शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या आधार कार्डाच्या वैधतेबाबत सुचना निर्गमित केलेल्या आहेत. सदरच्या योजनेचा लाभ योग्य विद्यार्थ्यापर्यंत पाहोचावा यासाठी लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याचा आधारकार्ड क्रमांक संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकाने संकलीत करुन योग्य असल्याची तपासणी करावी.
सदर आधारकार्ड क्रमांक हा बँक खात्याच्या क्रमांकाबरोबर लिंक करण्याबाबतच्या सुचना (बँक आधार सिलींग) विद्यार्थ्याना मुख्याध्यापकांनी लेखी सुचना दयाव्यात. ज्यांनी आधारकार्ड क्रमांक दिला आहे परंतु वैध नाही असे आढळुन आले आहे. त्याबाबत पुन्हा वैध आधारकार्ड क्रमांक संकलित करण्याची कार्यवाही संबंधित शाळेनी करावी. ज्या विद्यार्थ्याचा आधारकार्ड क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक झाला आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी http://resicent.uidai.net या पोर्टलवर जाऊन मुख्याध्यापक यांनी खात्री करावी. ज्या विद्यार्थ्यांनी यापुर्वी ई- पोर्टलमध्ये आधारकार्ड क्रमांकाची माहिती दिली आहे. तो Master adhar database सोबत वैध असल्याची खात्री मुख्याध्यापक यांनी करुन घ्यावी. ज्या विद्यार्थ्याचा आधारकार्ड वैध आहेत. त्यांची यादी संबंधित शाळेच्या लॉगीनवर पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी.
सर्व शाळेच्या मुख्याध्यापक/लिपीक यांनी सन 2016-17 या शैक्षणिक वर्षाचे ई-स्कॉलरशिप प्रणालीत विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती अर्ज भरतांना योग्य ती खबरदारी घेऊन काळजीपुर्वक आधार क्रमांक वैध असल्याची दक्षता घ्यवी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत करीत आहे.
*************
अनूसुचित जमातीच्या लाभार्थी करीता दुधाळ जनावरे व शेळी गट वाटप
* अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा दि. 30- जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत अनु.जमातीच्या लाभार्थीना 75 टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे व शेळी गट मिळणे करिता अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागा मार्फत सुरु झाली आहे. सदर अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचयकडे ठेवण्यात आलेला आहे. या अर्जाच्या व्यतीरिक्त दुसऱ्या अर्जाचा नमुना स्वीकारण्यात येणार नाही.
सदर योजने अंतर्गत अर्ज 1 सप्टेंबर 2016 पासुन स्वीकारण्यात येतील व अर्ज स्वीकारण्याची अंतीम तारीख 30 सप्टेंबर 2016 राहील. या दिनांकानंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
दुधाळ जनावरे/शेळी गटासाठी एका कुटुबातील फक्त एकाच लाभार्थीनी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदार हा अनुसुचित जमातीचा व दारीद्रय रेषेखालील असावा. योजने मध्ये 3 टक्के अपंग व 30 टक्के महिलांचा समावेश असावा. अर्जदाराने किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याने सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा, योजजेचा किंवा तत्सम योजनेचा लाभ घेतला असल्यास अर्ज करु नये. सदर योजना 75 टक्के शासकीय अनुदान व 25 टक्के बँकेचे अर्थसहाय्य अशा स्वरुपाची असल्यामुळे अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा. अर्जदारास 1 मे 2001 नंतर तिसरे आपत्य नसावे, तसा ग्रामसेवकाचा दाखला अर्जासोबत जोडावा. अर्जासोबत नुकताच काढलेला पासापोर्ट फोटो जोडावा. अर्जदार सुशिक्षित बेरोजगार असल्यास तसे प्रमाणपत्र जोडावे. वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी कोणत्याही दलाला किंवा खाजगी व्यक्ती मार्फत संपर्क साधण्याची आवश्यकता नसुन अशा प्रवृतीपासुन सावध राहण्याचे आवाहन पशुसंवर्धन सभापती श्रीमती सुलोचनाताई शरदचंद्र पाटील व जिल्हा पशुसंर्धन अधिकारी डॉ. एस. सी पसरटे यांनी केले आहे. तसेच लाभार्थीस या योजनेचा लाभ सन 2016-17 च्या प्राप्त तरतुदीस अधिन राहुन देण्यात येईल. तसेच निवड झाल्यापासुन ते लाभ मिळाल्या नंतर कोणत्याही क्षणी लाभार्थीच्या अर्जामध्ये किंवा लाभा नंतर त्रुटी किंवा गैर प्रकार आढळल्यास निवड रद्द करण्यात येईल, योजनेची आर्थिक वसुली करण्यात येईल.
********
अवयवदान अभियानानिमित्ताने बुलडाण्यात जनजागृती रॅली
• रॅलीचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ
बुलडाणा दि. 30- अवयव निकामी झालेल्या रूग्णांची सद्यस्थिती विचारात घेवून अशा रूग्णांना सत्वर नवजीवन मिळावे. या उद्देशाने समाजात अवयवदानाबाबत व्यापक जनजागृतीची आवश्यकता लक्षात घेवून राज्य शासनाने 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 दरम्यान महाअवयवदान जनजागृती अभियान राबविण्याचे ठरविले. त्यानुसार बुलडाण्यात अवयवदान जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीचा शुभारंभ जिल्हा सामान्य रूग्णालय येथे हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोफने आदी उपस्थित होते.
रॅलीमध्ये नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, नागरिक आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी श्रीमती मुधोळ यांनी अवयवदानाचे महत्व विषद केले. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नोडल अधिकारी श्री. चिंचोले, पुनम बगाडे व सौरभ हिवाळे यांनी प्रयत्न केले.
***********
25 टक्के ऑनलाईन प्रवेशाला मुदतवाढ
* 5 सप्टेंबर 2016 पर्यंत अर्ज करावेत
* www.rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करा अर्ज
बुलडाणा, दि.30: आरटीई अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून खाजगी विना अनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये पहिल्या वर्गाचे 25 टक्के प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्याअनुषंगाने शाळा नोंदणीचे काम पूर्ण झालेले आहे. बऱ्याच शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर केलेले नाहीत. त्यामुळे शाळांमध्ये आजही 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या जागा रिक्त आहेत. या ऑनलाईन प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून पालकांनी 5 सप्टेंबर 2016 पर्यंत www.rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावयाचे आहे.
अर्जासोबत जोडावयाचे कागदपत्रांची यादी संकेतस्थळावर आहे. पालकांनी आपल्या पाल्याचा अर्ज भरण्यासाठी वास्तव्याच्या ठिकाणाहून असलेली नजीकची खाजगी विना अनुदानित व विनाअनुदानित शाळा ज्या शाळेवर जागा रिक्त आहे. ती शाहा निवडायची आहे. तरी जास्तीत जास्त पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी एन. के देशमुख यांनी केले आहे.
********
रोजगार मेळाव्याचे 1 सप्टेंबर रोजी आयोजन
• 202 पदांसाठी होणार भरती
• www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांनी नोंदणी करावी
• हेल्पलाईन क्रमांक 18602330133 वर उमेदवारांनी संपर्क साधावा
बुलडाणा, दि. 30 - खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी हेरून बेरोजगार युवक-युवतींना त्या उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभाग नेहमी तत्पर असतो. त्यानुसार येत्या गुरूवार, 1 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता खामगाव येथे गो.से कला व वाणिज्य महाविद्यालयातेे बेरोजगारांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध कंपन्यांमध्ये 202 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
या मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी उमेदवारांनी www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. त्यासाठी आपल्या ऑनलाईन नोंदणी कार्डवर असलेला युजर आयडी व पासवर्डचा वापर करावा. इच्छूक पात्र उमेदवारांनी स्वखर्चाने संबंधित ठिकाणी उपस्थित राहून नोंद करून या मेळाव्यास उपस्थित रहावे. सहभागाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी काही अडचण आल्यास 07262-242342 या क्रमांकावर, संकेतस्थळावर किंवा 18602330133 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
मेळाव्यासाठी येताना उमेदवारांनी कार्यालयाचे नोंदणी ओळखपत्र, शैक्षणिक अहर्ततेच्या मूळ प्रमाणपत्र, बायोडाटा, आधार कार्ड, 5 पासपोर्ट फोटो सोबत आणावे. तरी मोठ्या संख्येने उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून मेळाव्यात सहभागी व्हावे आणि आपली संधी स्वीकारावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक डी. एल ठाकरे यांनी केले आहे.
********
पोळा सणाला जिल्ह्यात दारूबंदी जाहीर
बुलडाणा, दि. 30 – जिल्ह्यात 1 सप्टेंबर 2016 रोजी पोळा सण साजरा केल्या जाणार आहे. सदर उत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात 1 सप्टेंबर रोजी मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ अन्वये दारूबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, परवानाकक्ष व बिअरबार अनुज्ञप्ती, एफएल/बीआर-2 अनुज्ञप्ती आदी अबकारी अनुज्ञप्त्या बंद राहतील, असे अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी कळविले आहे.
*********
जिल्हास्तर शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेच्या तारखेत बदल
बुलडाणा दि. 30 - क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा. पुणे व जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा व्दारा आयोजित जिल्हास्तर शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा 7 ते 9 सप्टेंबर 2016 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव सदरच्या स्पर्धा सर्व गट मुले 13 सप्टेंबर 2016 रोजी तर सर्वगट मुली 14 सप्टेंबर 2016 रोजी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे आयोजित करण्यात येत आहे. तरी याबाबत सर्व संबंधीत शाळा, महाविद्यालय, खेळाडू यांनी तारखेतील बदलाची नोंद घेऊन आपला संघ वेळेवर उपस्थित ठेवावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, अशोक गिरी यांनी कळविले आहे.
******

No comments:

Post a Comment