Tuesday 25 April 2023

DIO BULDANA NEWS 25.04.2023

 


जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजनचा आराखडा करणार

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 25 : जिल्हा नियोजन व विकास योजनेतून जिल्ह्याला 370 कोटी रूपयांचा निधी येत्या वर्षात मिळणार आहे. मात्र यावर्षी शासनाने या निधीमधून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये अमुलाग्र बदल केला आहे. प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या मदतीने विभागांना थेट कामे सुचवावी लागणार आहे. यातून जिल्ह्याचा विकासासाठी नियोजनचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात येत्या वर्षाच्या आराखड्याबाबत घेण्यात आलेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, सांख्यिकी उपसंचालक जयंत अढाव आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी यावर्षी नियोजन विभागास विविध विभागांनी सादर करावयाच्या प्रस्तावाबाबत माहिती दिली. यापूर्वी केवळ गाभा, बिगर गाभा अशा प्रकारे माहिती सादर करण्यात येत होती. आता यात बदल करण्यात आला आहे. जिल्ह्याची बलस्थाने, मागासपणा आणि धोके लक्षात घेऊन अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीची कामे प्रस्तावित करण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. जिल्हा नियोजनमधून तयार करण्यात येणाऱ्या आराखड्यात आता थेट कामे सूचवावी लागणार आहे. याबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेतल्या जाणार आहे.

जिल्ह्याची अवलंबिता कृषि क्षेत्रावर अधिक आहे. त्यामुळे कृषि क्षेत्राच्या विकासासाठी जादा लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. कृषि क्षेत्राचा विकास करताना कृषि पुरक व्यवसायाला चालना देण्यात येणार आहे. जिल्ह्याचे व्हिजन डाक्युमेंट लक्षात घेऊन जिल्ह्यामध्ये करावयाची कामे हाती घेण्यात येणार आहे. यात प्रत्येक कामनिहाय नियोजन केले जाईल. नियोजनमधून करण्यात येणाऱ्या कामाबाबत राज्यस्तरावरील अपेक्षा लक्षात घेऊन कामे करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे डॉ. तुम्मोड यांनी सांगितले.

यावेळी जिल्ह्याच्या विविध मानकाबाबत जिल्हा सांख्यिकीतर्फे सादरीकरण करण्यात आले. यात जिल्ह्याची वेगवेगळ्या क्षेत्रात असलेली कामगिरी आणि येत्या काळात करण्यात येणाऱ्या कामामध्ये असलेल्या संधीबाबत माहिती देण्यात आली.

00000

No comments:

Post a Comment