Wednesday 12 April 2023

DIO BULDANA NEWS 12.04.2023

 मुख्यमंत्र्यांचा आज लाभार्थ्यांशी संवाद

*आनंदाचा शिधा, शिवभोजन, धान उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद

बुलडाणा, दि. 12 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत वितरीत करण्यात येणाऱ्या शिधाजिन्नसाचे वितरण पात्र लाभार्थ्यांना होण्याबाबत लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणून घेणार आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून 50 लाभार्थी गुरूवार, दि. 13 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून सहभागी होतील.

या संवादात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न, नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण सहभागी होतील. यावेळी आनंदाचा शिधा संचाचे वितरण, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी, शिवभोजन थाळी या योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांपैकी प्रत्येक जिल्ह्यातील सुमारे 50 लाभार्थी जिल्हा ठिकाणावरील राष्ट्रीय सूचना केंद्रामधून व्हीडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून सहभागी होतील. यातील निवडक लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संवाद साधतील.

000000

समता पर्वानिमित्त शुक्रवारी समता दौड

बुलडाणा, दि. 12 : समता पर्वात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. 14 एप्रिल 2023 रोजी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयातर्फे समता दौड आयोजित करण्यात आली आहे.

समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त कार्यालय येथून सकाळी 6 वाजता समता दौडला सुरवात होईल. सर्कुलर रोड, एडेड कॉलेज, तहसिल चौक ते चिखली रोड या मार्गे समाज कल्याण कार्यालय येथे दौड समाप्त होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुख्य कार्यक्रम सामाजिक न्याय भवनात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भीमगीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी नागरीकांनी उपस्थित राहावे, आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

निवासी शाळेतील मोफत प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू

बुलडाणा, दि. 12 : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या पाच अनुसुचित जाती मुला, मुलींच्या शासकीय निवासी शाळा आणि 17 शासकीय वसतिगृहामध्ये शैक्षणिक वर्ष सन 2023-24 साठी सामाजिक आरक्षण आणि रिक्त जागेनुसार मोफत प्रवेशासाठी नाव नोंदणी प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे.

 अनुसूचित जाती मुला, मुलींच्या शासकीय निवासी शाळेमध्ये सहावी, दहावी सेमी इंग्रजी माध्यमासाठी सामाजिक आरक्षण आणि रिक्त जागेनुसार मोफत प्रवेशासाठी नाव नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अनुजाती मुला, मुलींच्या शासकीय निवासी शाळेमध्ये सेमी इंग्रजी माध्यम, प्रशासकीय इमारत, मोफत भोजन आणि निवास व्यवस्था, मोफत पुस्तके आणि स्टेशनरी साहित्य ई-ग्रंथालय, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, डिजीटल क्लासरुम, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टर, मोफत गणवेश आणि शैक्षणिक साहित्य आदी सुविधा पुरविण्यात येतात.

जिल्हा आणि तालुकास्तरावर निवासी शाळा आणि वसतिगृहांच्या माहिती पत्रिकेचे वितरण करण्यात येत आहे. निवासी शाळा आणि शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, तसेच निवासी शाळा आणि वसतिगृहाचे महत्तव पालकांना पटवून देण्यात येत आहे, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment