Wednesday 5 April 2023

DIO BULDANA NEWS 04.04.2023

 सामाजिक न्याय समता पर्वाचे उद्धाटन

* महिनाभर विविध उपक्रमाचे आयोजन 
बुलडाणा, दि. ४ : सामाजिक न्याय विभागातर्फे एप्रिल महिन्यात विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सामाजिक न्याय समता पर्वाचे उद्धाटन सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांच्या हस्ते करण्यात आले .
कार्यक्रमाचे उद्धाटन छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले.
यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य नंदूराम गायकवाड, डॉ. हरीष साखरे, डॉ. अविनाश गेडाम, प्रा. अस्मिता ठोंबरे, राजू व्यवहारे, वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक प्रदीप धर्माधिकारी उपस्थित होते . 
डॉ. राठोड यांनी शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यत पोहोचविण्याबाबत माहिती दिली. तसेच शासकीय योजनांची जत्रा या अभियानाचा उपयोग होणार असल्याचे सांगितले. तसेच महाविद्यालयांतील विद्यार्थी वाहक म्हणून उपयोगी ठरतील याबाबत मार्गदर्शन केले. 
नंदूकुमार गायकवाड आणि अविनाश गेडाम यांनी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची योजनेच्या प्रचार प्रसिध्दीमधील भुमिकेबाबत माहिती दिली. 
दि 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत समता पर्व अभियानात विविध योजनांच्या माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधण्यात येणार आहे. या पर्वात जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी विजाभज आश्रमशाळा, जिल्ह्यातील महाविद्यालय, तसेच समाजकार्य महाविद्यालय आणि समतादूत, तालुका समन्वयक तालुका आणि ग्रामपातळीवर कार्यक्रम आयोजित करणार आहे.
महिनाभरातील विविध उपक्रमात अनुसुचित जाती व नवबौध्द घटकाच्या व मातंग समाजाच्या वस्त्यांना भेटी देऊन सामजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच 
रमाई आवास, विद्यार्थ्यांचे शाळेतून जात प्रमाणपत्र वितरण, 
निवासी आश्रमशाळा शाळा, शासकीय वसतिगृहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारीत वक्तृत्व, निबंध स्पर्धा, पथनाट्य आयोजित करण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आश्रमशाळा, वसतिगृह, निवासी शाळा, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे.
तालुका समन्वयक सतिष बाहेकर यांनी सूत्रसंचालन केले. आस्थापना प्रमुख संदीप कपले यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रविण पांडे, श्री. सोळंके, संदीप धाटोळे, रविंद्र काळवाघे, श्रीमती नरवाडे, श्रीमती सोनुने, श्रीमती तायडे यांनी पुढाकार घेतला.
००००००
जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
बुलडाणा, दि. ४ : जिल्हास्तर युवा पुरस्कारांमध्ये जिल्ह्यातील एक युवक, एक युवती आणि एक नोंदणीकृत संस्थेला गौरवण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील युवक, युवती व संस्थांनी या पुरस्कारासाठी दि. 15 एप्रिल 2023 पर्यंत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 
पात्र युवक आणि संस्थांनी कार्यालयातून अर्ज प्राप्त करुन आवश्यक कागदपत्र आणि निकषाचे पुरावे व मुल्यांकनाच्या पुराव्याचे संपुर्ण कागदपत्र, तसेच युवक - युवतीचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र व संस्थेसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्यांनी सर्व सदस्यांचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्रासह परिपुर्ण प्रस्ताव दि. 15 एप्रिल 2023 पर्यंत दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, जांभरुन रोड, बुलडाणा येथे सादर करावे लागणार आहे.
जिल्ह्यातील युवक व संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
००००००
माजी सैनिकांसाठी कंत्राटी पद्धतीवर पदभरती
बुलढाणा, दि. ४ : जिल्हा सैनिक कार्यालय अंतर्गत असलेल्या सैनिकी सभामंडप आणि सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील दोन पदे माजी सैनिकांमधून कंत्राटी पद्धतीवर भरण्यात येणार आहे.
या पद भरती अंतर्गत चौकीदार एक पद आणि सफाई वाला दोन पदे माजी सैनिकांमधून भरण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक माजी सैनिक व उमेदवारांनी दि. 10 एप्रिल 2023 पर्यंत जिल्हा सैनिक कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी यांनी केले आहे.
०००००
शुक्रवारचे दिव्यांग तपासणी शिबिर रद्द
बुलडाणा, दि. ४ : दर शुक्रवारी नियमितपणे होणारे कान, नाक, घसा, मतिमंद, मनोरुग्ण व नेत्र संबंधित दिव्यांग बोर्डाचे तपासणी शुक्रवार, दि. 7 एप्रिल रोजी बंद राहणार आहे. गुड फ्रायडे निमित्त शासकीय सुट्टी असल्याने या दिवशीचे शिबिर रद्द करण्यात आले आहे.
शासकीय सुट्टी असल्याने नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात कान, नाक, घसा, मतिमंद, मनोरुग्ण व नेत्र संबंधित दिव्यांगांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शिल्लक चिकित्सक यांनी केले आहे.
०००००
मराठा मेळाव्यात उपवधू-वरांना व्यसनमुक्तीची शपथ
बुलडाणा, दि. ४ : गर्दे वाचनालयात घेण्यात आलेल्या मराठा परिचय मेळाव्यात उपवधू-वरांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. मेळाव्यात उपवधू, वर तसेच नातेवाईक, आप्तस्वकीय तसेच उपस्थितांना मानसोपचार व व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉ. लता भोसले-बाहेकर यांनी तंबाखूमुक्तीची शपथ दिली. 
यासाठी जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्हाभर गेल्या पाच वर्षापासून हृद्यरोग, मधुमेह, अर्धांगवायू, कर्करोग या आजारांसाठी कारणीभूत तंबाखू व्यसनावर मार्गदर्शन, प्रशिक्षण, मुख तपासणी, मुख कर्करोगावरील मोफत शस्रक्रिया आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष ओपीडी नंबर 33 व 34 येथे कार्यरत आहे. नागरिकांनी तंबाखूमुक्तीसाठी मोफत टोल फ्री क्रमांक क्र. 1800112356 व मुखस्वास्थासाठी मोफत टोल फ्री क्रमांक क्र. 1800112032 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
000000

No comments:

Post a Comment