Monday 10 April 2023

DIO BULDANA NEWS 10.04.2023

 







शेतपिकाच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे

-कृषी मंत्री अब्दुल सत्तार

*चितोडा, अंबिकापूर, कोलवड येथे पाहणी

*शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही

बुलडाणा, दि. 10 : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विविध शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी यंत्रणांनी दोन दिवसात तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, यातून एकही शेतकरी वंचित राहू नये, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

श्री. सत्तार यांनी आज खामगाव तालुक्यातील चितोडा आणि अंबिकापूर, तसेच बुलडाणा तालुक्यातील कोलवड येथे भेट देऊन नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी केली. यावेळी त्यांचेसमवेत खासदार प्रतापराव जाधव, आमदार आकाश फुंडकर, दिलीपकुमार सानंदा आदी उपस्थित होते.

श्री. सत्तार यांनी नैसर्गिक संकटामुळे शेतपिकाचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने एका पट्ट्यातील शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्याभागात नुकसान झालेले नाही, अशा ठिकाणचे मनुष्यबळ नुकसान झालेल्या क्षेत्रात उपलब्ध करून देण्यात यावे. यामुळे गतीने पंचनामे होण्यास मदत होईल. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्यात येईल. गेल्या काही दिवसांतील अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका शासनाची असल्याचे सांगितले.

यंत्रणांनी तातडीने पंचनामे करावेत. याचा अहवाल सादर झाल्यानंतर शासनाच्या निकषाप्रमाणे मदत देण्यात येईल. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे होणे आवश्यक आहे. या पंचनाम्यापासून कोणताही शेतकरी सुटू नये, त्यानंतर शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीचे क्षेत्रफळ ठरवावे. नुकसानीचे सर्वेक्षण करताना नुकसान झालेल्या शेतीपिकासह शेतकऱ्यांची घरे, जनावरे, झाडे, फळपिकांचे झालेले नुकसान पंचनाम्यामध्ये नमूद करण्यात यावेत. यंत्रणांनी सर्वेक्षण योग्यरित्या करून शासनास सादर करावा, या सादर केलेल्या पंचनाम्यानुसार जी काही शक्य होणारी मदत शासनास करणे शक्य आहे, ती करणे शक्य होईल. शेतीमध्ये असलेले पीक आणि काढणीपश्चात शेतमालाचे नुकसान झाले असल्यास त्याचीही नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. त्यामुळे नुकसानीची सर्वांगीण वस्तुनिष्ठ माहिती समोर यावी आणि त्यानुसार शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी यंत्रणांनी प्रत्येक शिवारात जाऊन सर्वेक्षण करावे, या कामात शासकीय यंत्रणांनी हयगय केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश श्री. सत्तार यांनी दिले.

०००००

समता पर्वात आरोग्य तपासणी

बुलडाणा, दि. 10 : समता पर्व अभियानांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यात शुक्रवार, दि. 7 एप्रिल 2023 रोजी आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यातील तृतीयपंथी, तसेच ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

आरोग्य तपासणीचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले. यावेळी जिल्हा सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक सदाशिव अवचार, समाज कल्याण कार्यालयाचे वरिष्ठ समाज कल्याण अधिकारी प्रदीप धर्माधिकारी, समाज कल्याण निरीक्षक प्रमोद खनवे उपस्थित होते.

श्री. धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक केले. आरोग्य विभागाचे डॉ. नरेंद्र सनान्से, पियूष मालगे, अर्चना आराख, सोनाली वाठोरे यांनी जिल्ह्यातील तृतीयपंथी आणि ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी केली. तालुका समन्वयक सतिष बाहेकर यांनी सूत्रसंचालन केले. सतिश वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी रणजित सोळंके, रविंद्र काळवाघे, संदीप कपले यांनी पुढाकार घेतला.

00000

महात्मा ज्योतिबा फुले शाळेत बुधवारी रोजगार मेळावा

बुलडाणा, दि. 10 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने बुलडाणा येथे बुधवार, दि. 12 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. हा मेळावा मुठ्ठे ले आऊटमधील महात्मा ज्योतिबा फुले शाळेत घेण्यात येणार आहे, या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात नामांकित कंपनीचे प्रतिनिधी गरजू आणि रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन प्राथमिक निवड करतील. तसेच जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर पुरुष, महिला उमेदवारांनी बुलडाणा येथील रोजगार मेळाव्यात प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

 पात्र, गरजू आणि नोकरी इच्छुक महिला आणि पुरुष उमेदवार शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज करु शकतील. मुलाखतस्थळी आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहून नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपनींच्या प्रतिनिधीसमवेत मुलाखत द्यावी. जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. याबाबत अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा, असे कळविले आहे.

0000

शुक्रवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

बुलडाणा, दि. 10 : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात येते. मात्र शुक्रवार, दि. 14 एप्रिल 2023 रोजी तपासणीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे शिबीर रद्द करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी मतिमंद, मनोरूग्ण, कान, नाक, घसा व नेत्रसंबंधित दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र शुक्रवार, दि. 14 एप्रिल 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे या दिवसाचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

00000


No comments:

Post a Comment