Monday 24 April 2023

DIO BULDANA NEWS 24.04.2023

 आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी 8 मेपर्यंत मुदतवाढ

बुलडाणा, दि. 24 : शिक्षणाचा हक्क अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सन 2023-24मध्ये निवड यादीतील बालकांना प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पालकांना प्रवेशासाठी दि. 8 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम सन 2009 नुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. प्रक्रियेअंतर्गत प्रवेशाची ऑनलाईन सोडत बुधवारी, दि. 5 एप्रिल 2023 रोजी काढण्यात आली. लॉटरीमध्ये निवड पात्र यादीतील बालकांना प्रवेश घेण्यासाठी दि. 13 ते 25 एप्रिल 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी लक्षात घेता, तसेच निवडपात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी प्रवेशासाठी दि. 8 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील पालकांनी rte25admission.mahrashtra.gov.in या पोर्टलवरुन आपल्या पाल्याचे अॅडमीट कार्ड आणि हमीपत्राची प्रिंट काढुन तालुकास्तरावरील कागदपत्र पडताळणी समितीकडे जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. याबाबत अडचण असल्यास पालकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. विहित मुदतीत प्रवेश करणे अनिवार्य असून, त्यानंतर प्रवेश निश्चित करता येणार नाही, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

00000

ऊसतोड कामगारांची आज आरोग्य तपासणी

बुलडाणा, दि. 24 : समाज कल्याण विभागातर्फे समता पर्वानिमित्त योजनांचा थेट जनतेपर्यंत संवाद साधण्यासाठी विविध उपक्रम जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने मंगळवार, दि. 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी तसेच ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे. 

समता पर्वाच्या निमित्ताने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करून त्यांना ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे. शिबिरात जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी आरोग्याची तपासणी करावी, असे आवाहन समाज कल्याण  सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

*प्रस्ताव सादर करण्यासाठी ३० जून २०२३पर्यंत मुदत

बुलडाणा, दि. 24 : राज्य शासनाच्या कृषि विभागातर्फे विविध कृषि पुरस्कार देण्यात येतात. सन 2022 यावर्षीच्या कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कृषि विभागातर्फे राज्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र, तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे, कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरीता योगदान देणारे शेतकरी यांचा, तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट यांना  डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, सेंद्रीय शेती कृषिभूषण, उद्यानपंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

सन 2022 या वर्षामध्ये कृषि आणि संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्थांकडून विविध कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यात शेतकरी, गट, संस्था, व्यक्ती यांना कृषि पुरस्काराचे प्रस्ताव नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दि. ३० जून २०२३ पर्यंत सादर करावे लागणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन  कृषिउपसंचालक अश्विनी भोपळे यांनी केले आहे.

00000

खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची पुरेशी उपलब्धता

बुलडाणा, दि. 24 : येत्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची पुरेशी उपलब्धता आहे. राज्यातील हंगामाच्या गरजेच्या सुमारे 50 टक्के खत सध्या उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळावे, यासाठी कृषि विभाग दक्षता घेत आहे.

खतांचे नियोजन एप्रिलपासून सुरु होते. मात्र शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी मृगाचा पाऊस पडल्यानंतर होते. चालू वर्षी १ एप्रिल २०२३ रोजी राज्यात ५ लाख ३३ हजार मेट्रीक टन युरीया, २ लाख १५ हजार मेट्रीक टन डीएपी, २९ हजार मेट्रीक टन पोटॅश, ८ लाख ३९ हजार मेट्रीक टन संयुक्त खते आणि ५ लाख १५ हजार मेट्रीक टन सुपर फॉस्फेट असे एकुण २१ लाख ३१ हजार मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध आहे. हा खत साठा राज्याच्या खरीप हंगामातील गरजेच्या जवळपास ५० टक्के आहे. त्याच बरोबर खरीप हंगामात राज्याला ४३ लाख १३ हजार मेट्रीक टन आणखी खत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राज्यात मुबलक प्रमाणात खत उपलब्ध राहील याची कृषी विभाग दक्षता घेत आहे.

खरीपासाठी खत उपलब्ध असले तरी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला माती तपासणी अहवालाप्रमाणे खताची मात्रा द्यावी. प्रमाणापेक्षा अधिक खत दिल्यास खर्च वाढून सूक्ष्म अन्नद्रव्यांची पिकाला कमतरता भासून उत्पादन घटते. आवश्यक ते खत मिळाले नसल्यास उत्पादन आणि गुणवत्ता घसरते. रासायनिक खतांसोबत कुजलेले शेणखत, कंपोस्ट, जैविक खत (बायो फर्टिलायझर्स), नॅनो युरिया यांचाही वापर आवश्यकतेप्रमाणे करावे.

कृषी विभागाने कृषी विज्ञान केंद्र, बारामतीच्या मदतीने ‘कृषिक ॲप’ तयार केले आहे. या ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यासाठी, माती तपासणी अहवालानुसार प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या खतांची मात्रा आणि त्यासाठी लागणारी किंमत समजण्यास मदत होत आहे. याच ॲपमधून आपल्या तालुक्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रात उपलब्ध असलेल्या खतांची माहिती मिळते. केंद्र शासनाने पीएम प्रणाम ही योजना सुरु केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी खतांचा वापर मृद तपासणीप्रमाणे केल्यामुळे एकूण खतांच्या अनुदानाच्या रकमेमध्ये बचत होणार आहे. हे वाचलेले अनुदान केंद्र सरकारकडून राज्याच्या कृषी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी माती तपासणी अहवालाप्रमाणे खतांचा समतोल वापर करावा, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

000000



समूह विकास कार्यक्रमात जिल्ह्याचा गौरव

बुलडाणा, दि. 24 : रेशिम संचालनालयातर्फे बुलडाणा, अकोला आणि वर्धा या तीन जिल्ह्यात समूह विकास कार्यक्रम राबविण्यात येतो. हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल बुलडाणा जिल्ह्याचा गौरव करण्यात आला.

समूह विकास कार्यक्रमाचा सन २०२२-२३ मधील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था, म्हैसूर येथे सभा घेण्यात आली. यात बुलडाणा जिल्ह्याला उत्कृष्ट कामकाजासाठी केंद्रीय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. एस. गांधी यांच्या हस्ते समूह विकास अधिकारी सु. प्र. फडके यांचा गौरव करण्यात आला.

केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, म्हैसूर अंतर्गत संशोधन व विस्तार केंद्र, अमरावती तर्फे समूह विकास कार्यक्रमात रेशीम उद्योजकांना तांत्रिक मार्गदर्शन आणि विशेष प्रशिक्षण दिले जाते. क्षेत्रिय भेटी देऊन तांत्रिक मार्गदर्शन, तसेच वेळोवेळी किटक संगोपनातील नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती देण्यात येते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी बायव्होल्टीन प्रजातीचे अंडीपुंज संगोपन घेण्यासाठी विशेष प्रयत्न केंद्रीय रेशीम मंडळाकडून केले जाते. राज्यात आता १०० टक्के बायव्होल्टीन प्रजातीचे किटक संगोपन घेतले जाते. बायव्होल्टीन कोष उत्पादनामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रेशीम सुत उत्पादनात वाढ होत आहे.

00000

नांदुरा तालुक्यातील जप्त केलेल्या रेतीचा गुरूवारी लिलाव

बुलडाणा, दि. 24 : नांदुरा तालुक्यातील विविध कारवाईमध्ये जप्त केलेला रेतीचा गुरूवार, दि. 27 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता लिलाव करण्यात येणार आहे.

नांदुरा तालुक्यातील मौजे भोटा येथील पुर्णा नदीपत्रातील गट नं. 191 जवळील 594.23 ब्रास, महादेव मंदिराजवळील बरडेश्वर येथे 322.18 ब्रास असा एकूण 916.41 ब्रास रेतीचा दि. 27 एप्रिल 2023 रोजी नांदुरा येथील तहसिल कार्यालयात जाहिर लिलाव करण्यात येणार आहे. तसेच नांदुरा तालुक्यातील रेतीसाठा जप्त करण्यात आलेल्या मौजे पातोंडा येथील 174.29 ब्रास, मौजे पतोंडा गावानजीक विटभट्टी विरुद्ध बाजुला 696.98 ब्रास, गअ नं. 1 मधील गावनदीपत्रातील 218.16 ब्रास, पूर्णा नदीपात्रातील 87.23 ब्रास असा एकुण 1176.66 ब्रास रेतीचाही लिलाव यात करण्यात येणार आहे.

000000


No comments:

Post a Comment