Tuesday 26 April 2022

DIO BULDANA NEWS 26.4.2022


 अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करावी

-          जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया

  • जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती बैठक

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 :  जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री, पुरवठा अथवा साठा करणाऱ्यांचा शोध घेण्यात यावा. कुठेही अंमली पदार्थांबाबत विक्री, पुरवठा किंवा साठा निदर्शनास आल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी. गुन्हे दाखल करून आरोपींवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांनी आज दिल्या.  

    जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या दालनात आज 26 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना जिल्हा पोलीस अधिक्षक बोलत होते.  यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे उपायुक्त श्री. राठोड, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक भाग्यश्री जाधव, सहाय्यक आयुक्त (औषधे) अतुल बर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी बळीराम गिते आदी उपस्थित होते.

  शेड्युल्ड ड्रग्ज विक्री करणाऱ्या औषधी दुकानांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना देत जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणाले, शेड्युल्ड ड्रग्ज दुकांने तसेच याबाबत माहिती देण्यासाठी ड्रग्ज असोसिएशनची बैठक बोलवावी.  जिल्ह्यात अफु किंवा गांज्याची लागवड होत असल्याची माहिती आल्यास, निदर्शनास आल्यास तातडीने कारवाई करावी. त्यासाठी पोलीस स्टेशननिहाय आढावाही घेण्यात यावा. कुरीअर किंवा पोस्टाच्या माध्यमातून येणाऱ्या पार्सलची कसून तपासणी करावी. विदेशातून येणारे पार्सल किंवा विदेशात पाठविण्यात येणाऱ्या पार्सलच्या तपासणीसोबतच देणाऱ्या तसेच घेणाऱ्या व्यक्तीचे कागदपत्रेसुद्धा तपासावीत.

ते पुढे म्हणाले, जिल्हास्तरावर अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करावी. जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे  उत्पादन होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. तसेच कारखाने बंद असल्यास त्यावर विशेष लक्ष ठेवावे. एनडीपीएस अंतर्गत गुन्ह्याचे तपासी अधिकारी यांच्याकरीता प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात यावे. यावेळी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा सुचना केल्या.

                                                                                ***********

                  पेरणीसाठी सोयाबीनचे स्वत:कडील चांगले बियाणे उपयोगात आणावे

  • कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षापर्यंत वापरात येते.  शेतक-यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. मागील दोन वर्षात शेतक-यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासुन उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे चालु वर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापरु शकतात. तसेच ग्रामबिजोत्पादन, पीक प्रात्याक्षिक योजनेतंर्गत आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येते.

    प्रमाणित बियाण्यांपासून वरीलप्रमाणे आलेल्या उत्पादनातून चाळणी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजुक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते त्यामुळे त्याची उगवणक्षमता

अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी. बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्कयांपेक्षा जास्त नसावे. साठवणूकीसाठी प्लॅस्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवतांना त्याची थप्पी 7 फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्‍यावी. बियाणे हाताळताना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रति हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरून 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करून पेरणी करावी.

    सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे.तसेच 75 ते 100 मि. मि. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी.  बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत करावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी. तरी पेरणीसाठी सोयाबीनचे स्वत:कडील चांगले बियाणे उपयोगात आणावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

                                                                                                ***********

 

पाच गावांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : बुलडाणा तालुक्यातील चौथा, गिरडा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गोंधनखेड, डोंगरखंडाळा, वरवंड ग्रा.पं अंतर्गत असलेल्या गोंधनखेड व चिखली तालुक्यातील कोलारा गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. चौथा येथील लोकसंख्या 2250 असून येथे दररोज 64 हजार 920 लीटर्स पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. गोंधनखेड ग्रा.पं गिरडा येथील लोकसंख्या 445आहे. येथे दररोज 23 हजार 400 लीटर्स पाणी पुरविण्यात येणार आहे. तसेच डोंगरखंडाळा येथील लोकसंख्या 7544 असूल येथे दररोज 1 लक्ष 60 हजार 970 लीटर्स पाण्याचा पुरवठा होणार आहे.  गोंधनखेड ग्रा.पं वरवंड येथील लोकसंख्या 102 आहे. येथे दररोज 12 हजार 40 लीटर पाणी पुरविण्यात येईल. तसेच कोलारा येथील 4640 लोकसंख्येला दररोज 1 लक्ष 72 हजार 800 लीटर पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी,  बुलडाणा यांनी कळविले आहे.

*********

 

No comments:

Post a Comment